आयात शुल्काच्या मुद्दयावरून रशियाचा भारताला पाठिंबा

मॉस्को : अमेरिकेकडून बारतावर लावल्या जाणाऱ्या शरमसाठ आयात शुल्काच्या मुद्दयावरून रशियाने भारताची पाठराखण केली आहे. व्यापार आणि आर्थिक सहकार्याबाबत आपल्या देशाचे हित लक्षात घेऊन भागीदार निवडण्याचा सार्वभौम देशांना अधिकार असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे भारतावरील आयात शुल्क आणखी वाढवण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी रशियाने ही पाठराखण केली आहे. अमेरिकेने भारताला दिलेल्या धमकी संदर्भात क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
भारत रशियाकडून स्वस्त दराने तेल खरेदी करतो. याचा फायदा रशियाला युक्रेन विरोधातल्या युद्धामध्ये होतो. तसेच स्वस्त दराने मिळवलेले तेल भारत खुल्या बाजारात विकून मोठा नफाही कमवत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला होता. सोमवारी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकाहरोवा यांनीही अमेरिकेच्या धोरणावर कडाडून टीका केली. अमेरिकेचे प्रशासन अमेरिकेचे वर्चस्व कायम राखण्यासाठी ग्लोबल साऊथच्याविरोधात नववसाहतवादी धोरण अवलंबत आहे. आजच्या ऐतिहासिक टप्प्यातील निर्बंध आणि नियंत्रण हे एक दुर्दैवी वास्तव आहे.
याचा परिणाम सर्व जगाला भोगावा लागतो आहे, असे झाकाहरोवा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. उदयोन्मुख बहुध्रुवीय विश्वामध्ये अमेरिका आपले वर्चस्व गमावत असल्याने अमेरिका इतरांवर अटी लादत आहे. आपले स्थान कायम राखण्यासाठी अमेरिका नववसाहतवादाचे धोरण राबवत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या मागे येण्यास नकार देणाऱ्णांच्याविरोधात आर्थिक दबावाचे राजकीय हत्यार वापरले जाते आहे, असेही त्या म्हणाल्या.





