वॉशिंग्टन – रशियाने युक्रेनविरोधातील युद्धासाठी चीनकडे लष्करी सहाय्य मागितले आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. या लष्करी सहाय्यामध्ये लष्करी टेहळणीच्या ड्रोनची मागणीही करण्यात आली आहे, असे अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
युक्रेनविरोधातील युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि युरोपातील इतर अनेक देशांनी रशियातील बॅंका आणि रशियाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. यामध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचाही समावेश आहे. तसेच रशियाला “स्विफ्ट’ या बॅंकिंग प्रणालीतूनही बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळेच रशियाने चीनची मदत मागितल्याचा दावा करण्यात येऊ लागला आहे. मात्र, रशियाने चीनकडे कशाप्रकारची मदत मागितल्याचे आपल्याला माहीत नसल्याचे चिनी दूतावासाचा प्रवक्ता लिउ पेन्ग्यू यांनी म्हटले आहे. युक्रेनला मानवतावादी मदत करणे चीनकडून सुरूच ठेवले जाईल, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.
रशियाला अधिक आधुनिक शस्त्रे पुरवण्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होईल. मानवी हानी रोखण्याचाच चीनचा प्रयत्न असेल, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा प्रादेशिक पातळीवर परिणाम अभ्यासण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलियन आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना रोम इथे भेटणार आहेत.