Russia Earthquake। रशियाला मोठ्या भूकंपाचा धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यानंतर रशियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कामचटका बेटाजवळ ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. या जोरदार भूकंपामुळे रहिवासी घाबरले. भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये फर्निचर, गाड्या आणि दिवे जोरदारपणे थरथरताना दिसत आहेत. एका आठवड्यापूर्वी रशियामध्येही तीव्र भूकंपाचा धक्का बसला होता. कामचटका प्रदेशाजवळ ७.४ रिश्टर स्केलचा हा भूकंप झाल्याने त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. कामचटका प्रदेशाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्रामवर घोषणा केली की पूर्व किनाऱ्यावर त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. त्यांनी सांगितले की स्थानिक रहिवाशांना सतर्क करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोणतेही नुकसान झालेले नाही. शनिवारी कामचटका येथेही भूकंप झाला Russia Earthquake। रशियाच्या कामचटका प्रदेशात यापूर्वीही भूकंप झाले आहेत. शनिवारी ७.४ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला, ज्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, कामचटका प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या पेट्रोपाव्लोव्स्क-कामचटस्की या रशियन शहराच्या पूर्वेस १११ किलोमीटर (६९ मैल) अंतरावर भूगर्भात ३९.५ किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. रशियाला या महिन्यात तीन भूकंप Russia Earthquake। रशियातील कामचटका हा भूकंपाचा सर्वाधिक धोका असलेला प्रदेश आहे. या महिन्यात कामचटका याठिकाणी तीन भूकंप झाले आहेत. १५ सप्टेंबर रोजी ६.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जुलैमध्येही अनेक भूकंप झाले, ज्यामध्ये ३० जुलै रोजी ८.८ रिश्टर स्केलचा भूकंप आणि २० जुलै रोजी ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.