Russia : रशियाकडून नौदलाचा वार्षिक दिन उत्साहात साजरा

मॉस्को : रशियाने आज आपल्या नौदलाचा वार्षिक दिन उत्साहात साजरा केला. नौदलाचे मुख्यालय असलेल्या सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित समारंभामध्ये अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सहभागी झाले होते. या नौदल दिनाच्या निमित्ताने नौदलाच्या परंपरेनुसार नाविक परेड ऐवजी रशियाने जुलै स्टॉर्म या नावाचा एक युद्धसराव आयोजित केला आहे.
आपल्याला युद्धसरावाचे महत्व नौदलाच्या नाविक परेडपेक्षा अधिक असल्याचे सूचक वक्तव्य पुतीन यांनी यावेळी बोलताना केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव नौदलाची नाविक परेड रद्द करण्यात आली. रशियाच्या नौदलाची सुरक्षितता या परेडपेक्षा सर्वात जास्त महत्वाची असल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. युक्रेनकडून रशियातल्या शहरांवर जोरदार ड्रोन हल्ले केले जात असतानाच जुलै स्टॉर्म हा युद्धसारव घेण्यात आला.
युक्रेनने सेंट पीटर्सबर्गसह अन्य ठिकाणी ड्रोनचा मारा केला होता. या ड्रोन हल्ल्यांमुळे जवळचा पुलकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील बंद करण्यात आला होता. या विमानतळावरील सुमारे १०० विमानांची उड्डाणे एकतर पुढे ढकलण्यात आली किंवा ही विमाने दुसरीकडे वळवण्यात आली होती. रशियाच्या नौदलाने रशियाच्या सुरक्षेचे, सार्वभौमत्वाचे आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
नौदलाच्या ५ मरीन कॉर्प्स ब्रिगेडचे रुपांतर डिव्हिजनमध्ये करण्यात येणार असून त्यातील दोन ब्रिगेडची डिव्हिजन या वर्षातच होणार आहे. त्यामुळे नौदलाच्या मारक क्षमतेत दर्जात्मक सुधारणा होईल, असे पुतीन यावेळी बोलताना म्हणाले. जुलै स्टॉर्म युद्धसरावात १५,००० हून अधिक नौदल कर्मचारी, १५० हून अधिक युद्धनौका आणि जहाजे, १२० विमाने, ९५० लष्करी आणि विशेष हार्डवेअर वस्तू आणि १० तटीय संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश होता, असे रशियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.





