Russia Attack : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील 22 जण ठार

कीव : रशियाने केलेल्या ग्लाईड बॉम्ब आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात युक्रेनमधील २२ सामान्य नागरिक ठार झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध आणि आयात शुल्क लादण्याचा इशारा दिला असला तरी रशियाने युक्रेनमधील नागरी वस्त्यांवरील आपले हल्ले अव्याहतपणे सुरू ठेवले आहेत. रशियाने चार शक्तीशाली ग्लाईड बॉम्ब युक्रेनच्या नैऋकडील झापोरिझझिया भागातल्या एका तुरुंगावर डागले. हल्ल्यात तुरुंगातील १७ कैद्यांचा मृत्यू झाला आणि जवळपास ८० अन्य जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
युक्रेनच्या मध्य भागातील निप्रो भागात रशियाने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे ३ मजली इमारतीचे अंशतः नुकसान झाले आणि जवळच्या काही दवाखान्यांचे नुकसान झाले. यामध्ये एक प्रसुतीगृह आणि सार्वजनिक रुग्णालयाच्या वॉर्डचाही समावेश आहे. या हल्ल्यात किमान चौघे ठार झाले आणि ८ जण जखमी झाले. गंभीर प्रकृती असलेली एक गर्भवती महिलाही या हल्ल्यात जखमी झाली. देशभरातल्या ७३ शहरांवर झालेल्या रशियाच्या हल्ल्यात एकूण २२ जण ठार झाले. हे हल्ले जाणीवपूर्वक रहिवासी वस्त्यांमध्ये करण्यात आले होते, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
रशियाने रात्री युक्रेनवर दोन इस्कंदर-एम बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह ३७ शाहेद-प्रकारचे स्ट्राइक ड्रोन आणि डेकॉय डागले. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ३२ शाहेद ड्रोन रोखले किंवा निष्क्रिय केले. सोमवारी मध्यरात्री रशियाने बिलेन्सकीवस्का दुरुस्ती केंद्रावरही ग्लाईड बॉम्बचा मारा केला असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्धबंदीसाठी दोन आठवड्यांपुर्वी दिलेली ५० दिवसांची मुदत १० ते १२ दिवसांपर्यंत कमी करण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच केली आहे.
युक्रेनबरोबरची युद्धबंदी ७ ते ९ ऑगस्टपर्यंत व्हायला हवी, अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे. ‘ट्रम्प यांनी शांततेसाठी केलेले आवाहन पुतीन यांनी वारंवार धुडकावून लावले असून युक्रेनवरील हल्ले सुरू ठेवले आहेत. पुतीन यांच्यावर आपण नाराज असल्याचे ट्रम्प यांनी काल स्कॉटलंडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
क्रेमलिनने उडवली ट्रम्प यांची खिल्ली
ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी दिलेली १०-१२ दिवसांची मुदत म्हणजे त्यांचा अल्टिमेटम गेम असल्याची खिल्ली क्रेमलिनने काल उडवली आहे. रशिया म्हणजे इस्रायल किंवा इराण नाही, असे रशियाचे माजी अध्यक्ष आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उप प्रमुख दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. प्रत्येक नवीन अल्टिमेटम म्हणजे युद्धाच्या दिशेने टाकलेले एक नवीन पाऊल आहे. हे युद्ध रशिया आणि युक्रेन दरम्यानचे नसून त्यांच्या स्वतःच्याच देशाविरोधात आहे, असे पेस्कोव्ह यांनी टेलिग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला तेंव्हाच या युद्धात पश्चिमेकडील देशांनी हस्तक्षेप केल्यास युद्धाची मर्यादा नाटो देशांच्या सीमा पाळणार नाही, असा इशारा रशियाने दिलेला होता.





