Pune District : रब्बी हंगामातील पिकांसाठी धावपळ
Pune District : पारंपरिक पद्धतीने ऊस तोडणीसाठी अधिक वेळ लागत असल्याने पुढील पिकांच्या पेरणी आणि लागवडीचे नियोजन बिघडण्याची शक्यता असते.

वरवंड : दौंड तालुक्यात ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढत असल्याने ऊस तोडणीच्या कामाला वेग मिळत आहे. हार्वेस्टरच्या साहाय्याने कमी वेळेत ऊस तोडणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकांचे नियोजन करणे सोयीचे ठरत आहे. विशेषतः कांदा लागवड, गहू पेरणी आणि इतर हंगामी पिके घेण्यासाठी शेत लवकर मोकळे होत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
पारंपरिक पद्धतीने ऊस तोडणीसाठी अधिक वेळ लागत असल्याने पुढील पिकांच्या पेरणी आणि लागवडीचे नियोजन बिघडण्याची शक्यता असते. मात्र, हार्वेस्टरमुळे ऊस तोडणीचे काम जलद होत असून, उपलब्ध वेळेत दुसरे पीक घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे.
सध्या काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करून वेळेत दुसरे पीक घेणे महत्त्वाचे ठरत आहे. अशा परिस्थितीत ऊस वेळेत तोडला गेल्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यावर पुढील पीक घेण्याचे नियोजन करता येत आहे.
शेतीतील आधुनिक यंत्रांचा वापर वाढल्याने वेळेची बचत होत असून, हंगामानुसार पिके घेण्याच्या नियोजनालाही मदत मिळत आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.
हार्वेस्टरमुळे माझा ऊस वेळेत तोडला गेल्याने शेत लवकर मोकळे झाले आहे. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने उपलब्ध पाणीसाठा असेपर्यंत दुसरे पीक घेण्याची संधी मिळणार आहे. वेळेत ऊस तोडल्यामुळे कांदा किंवा इतर हंगामी पिकांची लागवड करण्याचे नियोजन करता येत आहे. हार्वेस्टरमुळे ऊस तोडणी लवकर झाल्याचा हा मोठा फायदा झाला आहे.
– संदीप दिवेकर, शेतकरी, वरवंड.





