रूपगंध : निष्णात फिरकीपटूचा विराम

क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये धावांची बरसात करणार्या महान ङ्गलंदाजांनी ज्याप्रमाणे आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे, तशाच प्रकारे आपल्या भेदक अथवा चकवा देणार्या गोलंदाजांने फलंदाजांची दांडी गुल करणार्या गोलंदाजांनीही इतिहास घडवला आहे. बिशनसिंग बेदी, शेन वॉर्न, मुथैय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे अशा अनेक फिरकीपटूंच्या गुगलीने ङ्गलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. ही परंपरा समृद्ध करण्याचे काम भारताचा महान फिरकीपटून आर. अश्विनने केले. अलीकडेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानिमित्ताने त्याच्या कारकिर्दीचा आढावा…
भारताचा महान ङ्गिरकीपटूंपैकी एक रविचंद्रन अश्विनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हा निर्णय त्याने ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तिसर्या कसोटी सामन्यानंतर घेतला. अर्थात हा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. विशेष म्हणजे या सामन्यात अश्विन नव्हता. निवृत्तीचा निर्णय जाहीर करण्याबाबत तो म्हणतो, हा निर्णय माझ्यासाठी कठीण नव्हता, परंतु अनेकांसाठी भावानत्मक राहिला. कदाचित ही वेळही निघून जाईल. परंतु हा निर्णय समाधानकारक आणि दिलासायक आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोक्यात निवृत्तीचा विचार घोळत होता. म्हणून निवृत्तीचा निर्णय माझ्यासाठी खूपच सोपे ठरला. गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशीच मला ते जाणवू लागले आणि पाचव्या दिवशी त्याची घोषणा केली.
भारताचे दुसर्या क्रमाकांचा सर्वात यशस्वी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही. अर्थात तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जमध्ये दिसेल. अश्विनने भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या उपस्थितीत निवृत्तीची घोषणा केली.
चाहत्यांसाठी हा धक्कादायक निर्णय होता. पण अश्विनने संघातील सहकार्यांशी, व्यवस्थापनाशी अगोदरच चर्चा केली होती. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाण्यापूर्वी त्याने आपल्या कुटुंबीयांना देखील करियरबाबत निर्णय घेऊ, अशी पूर्वकल्पनाही दिली. अर्थात तो फीट आहे आणि अजूनही क्रिकेट खेळू शकतो. परंतु संघात त्याला स्थान न मिळणे हे निवृत्तीमागचे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे.
तो ऑस्ट्रेलियाला देखील जाण्यास तयार नव्हता. माजी कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर अश्विनच्या निवृत्तीवर बोलकी प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, ‘‘मी तुझ्यासोबत चौदा वर्षे खेळलो आणि आज तु निवृत्तीची घोषणा केली तेव्हा आठवणी ताज्या झाल्या. तुझ्यासमवेतच्या प्रवासात प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला आहे. तुझे कौशल्य आणि भारतीय क्रिकेट संघाला जिंकून देण्याचे तुझे योगदान अमूल्य आहे आणि तुला एक दिग्गज खेळाडू म्हणूनच ओळखले जाईल. ’’
रविचंद्रन अश्विन हा अतिशय शांत स्वभावाचा आणि वादापासून दूर राहणारा खेळाडू म्हणून ओळखला जाईल. स्वभावाच्या बाबतीत त्याला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळेच्या श्रेणीत ठेवता येऊ शकते. तो ऑफ स्पिनचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु गरज भासल्यास त्याने गोलंदाजीच्या शैलीतही वेळोवेळी बदलही केला. त्याचा मुख्य उद्देश फलंदाजाला टिपण्याचा असायचा. कुंबळे देखील याच श्रेणीतील गोलंदाज होता. तो कधी वेगाने चेंडू फेकत फलंदाजाची भंबेरी उडवायचा. मध्येच वेगाने चेंडू टाकण्याची आयडिया त्याला टेनिस खेळणार्या शेजार्याला पाहून आली. ते पाहूनच त्याने कॅरम बॉलचा शोध लावला. आपल्या गोलंदाजीला लेग स्पिनची शैलीही जोडली. या वैशिष्ट्यामुळे उजव्या आणि डावखुर्या फलंदाजांना गोलंदाजी करताना त्याला कधीही अडचण आली नाही.
विशेष म्हणजे तो अकरा वेळेस मालिकावीर राहिला आहे. यात त्याने श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली आहे. 37 वेळेस त्याने एकाच डावात पाच बळी टिपले. कसोटी श्रेणीत भारत बराच काळ अव्वल स्थानावर असताना आणि यात अश्विनचे योगदान नाकारता येत नाही. अश्विनची फिरकी जेव्हा चालत नसे, तेव्हा भारतीय संघ अडचणीत आला आहे. पण आता संघ अडचणीत असताना त्याने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याला भारतीय संघाकडून आणि व्यवस्थापनाकडून सामान्यपणे दिलेला निरोप हा अनेकांना निराश करणारा ठरला.चेन्नईत परतल्यानंतर विमानतळावर त्याचे जंगी स्वागत झाले. पुष्पवर्षाव झाला. मनावरचे ओझे दूर झाल्याच्या भावना दूर झाल्याचे त्याने म्हटले आहे.
भारताकडून अनिल कुंबळेनंतर कसोटी सामन्यांत सर्वाधिक 537 गडी टिपणारा गोलंदाज असणारा अश्विन हा अशा दुर्देवी खेळाडूंत आहे की त्याला शेवटचा कसोटी सामना देखील खेळता आला नाही. दहा ते पंधरा वर्षे क्रिकेटची सेवा करणार्या गोलंदाजाचा कसोटीतील शेवटचा सामना आपण पाहत आहोत, हे चाहत्यांना समजावयास हवे होते. पण त्याने ड्रेसिंगरुममध्येच निवृत्तीची घोषणा केली. असाच अनुभव धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग देखील आलेला आहे. तो देखील निरोपाचा कसोटी सामना खेळू शकला नव्हता. चांगल्या खेळाडूंना अशा प्रकारचा निरोप देणे हे क्लेषदायक आहे.
अशावेळी संघ व्यवस्थापनाचा त्यांच्याप्रती असणारा दुजाभावाचा व्यवहार लक्षात येतो. वारंवार संघाबाहेर ठेवण्याचा अनुभव संबंधित खेळाडूंना मानसिक त्रास देणारा राहिला असेल. परंतु अश्विनने याबाबत कधीही टिपणी किंवा मत मांडले नाही. संघ व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय त्याने मान्य केले. अश्विनसारखे खेळाडू दुसर्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहेत. त्याने कधीही बडेजाव केला नाही, लांगुलचालन केले नाही, गटबाजी नाही. केवळ खेळ म्हणजे खेळच. म्हणून त्याने संघात आपल्याला जागा मिळत नसल्याचे पाहून अतिशय शांतपणे सर्वांचे आभार मानले आणि निरोप घेतला.
अलिकडच्या काळात अश्विनला परदेश दौर्यावर खूपच कमी संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन कसोटी मालिकेत त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. पुढे देशार्तंगत क्रिकेट स्पर्धेत सहभागी होताना त्याचे वय 39 होईल.म्हणूनच त्याने निवृत्तीचा मार्ग पत्करला. अश्विन हा 2011मध्ये विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉङ्गी जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे. अश्विनने भारतासाठी 116 एकदिवसीय सामने खेळले आणि त्यात 146 बळी टिपले आहेत. त्याचवेळी 65 टी-20 सामने खेळलेले असताना 72 बळी टिपले आहेत. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात 2010 मध्ये एकदिवसीय सामन्यातूच केली होती. त्यानंतर एक वर्षांनंतर त्याने कसोटीत पर्दापण केले.
अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसेल तर त्याने कधीही जागा अडवून ठेवली नाही आणि व्यवस्थापानलाही ओझे होऊ दिले नाही. साधारणपणे फिरकपटू चांगले फलंदाज नसतात आणि याचा अनुभव अनेकदा आला आहे. परंतु अश्विनच्या बॅटने अडचणीत असलेल्या संघाला अनेकदा बाहेर काढण्याचे काम केले. त्याने एकूण 106 कसोटी सामन्यात 3506 धावा केल्या. दुदेवाने त्याला चांगली साथ लाभली असती तर तो आणखी पंधरा ते वीस कसोटी सहजपणे खेळू शकला असता. भारताला अश्विनसारखा जादुई फिरकीपटू लाभण्याचा प्रसंग रंजक आहे. त्याने ङ्गलंदाज म्हणून करियर सुरु केले.
कधी कधी वेगवान गोलंदाजी देखील करायचा. वयाच्या चौदाव्या वर्षी तो आघाडीचा फलंदाज म्हणून खेळत असे. परंतु एका सामन्यात जायबंदी झाल्याने त्याला आठ महिने मैदानाबाहेर राहावे लागले. अशावेळी अन्य खेळाडूने त्याची जागा घेतली. तो खूप हताश झाला. पण आईच्या म्हणण्यानुसार त्याने फिरकी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तीच ओळख निर्माण झाली. आता चौदा-पंधरा वर्षे भारतीय संघाची सेवा केल्यानंतर त्याने क्रिकेटचा निरोप घेतला. त्याच्या प्रतिभेचा उपयोग देशाच्या क्रिकेटच्या विकासासाठी करून घेणे आवश्यक आहे.
– नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक





