रूपगंध : सिंबॉलिझम

सिंबॉलिझम म्हणजे प्रतीकवाद. एखादी गोष्ट चिन्हानं सूचित करायची असेल तर त्याला सिंबॉलिझम असं म्हणतात. राज कपूरच्या “मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील एका गाण्यात राज कपूर हृदयाच्या आकाराचा फुगा हवेत सोडतो हे दृश्य आहे. हा फुगा एका उंचीवर गेल्यावर जोराने खाली येऊन जमिनीवर आदळतो आणि त्याचे अनेक तुकडे होतात. त्या तुकड्यांत राज कपूरला त्याच्या जीवनात आलेल्या स्त्रियांची प्रतिबिंबं दिसू लागतात.
हे सिंबॉलिझमचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तो फुगा म्हणजेच राज कपूरचं हृदय. त्याचं फुटणं म्हणजे राजचा प्रेमभंग. ज्या प्रेयसीच्या प्रेमाचा भंग झालेला आहे तिचं प्रतिबिंब त्याला तुकड्यांत दिसत असतं. याखेरीज प्रियकरानं प्रेयसीला दिलेलं फूल प्रेयसीच्या हातातून पडून ती ज्या वाहनातून प्रवास करणार असते (बहुधा टांगा) त्याच्या चाकाखाली चिरडलं जाण्याचं दृश्यही सिनेमात अनेक वेळा दाखवलं जातं. यामध्ये प्रतीकात्मकरित्या प्रियकराचा प्रेमभंग झाल्याचं सूचित केलं जातं.
पण सिंबॉलिझम फक्त सिनेमापुरतंच मर्यादित नाही. अनेक कथानकांतून आणि अगदी रोजच्या जीवनात देखील सिंबॉलिझमचा वापर होतो. पंचतंत्रातील कथा म्हणजे प्राण्यांमधील व्यवहारांच्या गोष्टी नसून प्रत्यक्षात माणसानं दुसऱ्याशी कसं वागावं याचा प्रतीकात्मक उपदेश आहे. जॉर्ज ऑर्वेल या सुप्रसिद्ध लेखकाची “ऍनिमल फार्म’ ही संपूर्ण छोटेखानी कादंबरी सिंबॉलिझमचा एक उत्तम नमुना आहे. त्यातील प्राण्यांचं जीवन म्हणजे आधुनिक काळातील राजकीय घडामोडींवर केलेलं उपहासात्मक प्रतीक आहे.
ऑलिम्पिक्स खेळांमध्ये आणि इतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांच्या समारोहांमध्ये विविध खेळांची सूचक प्रतीकं वापरली जातात. रस्त्यावरच्या रहदारीच्या खुणाही प्रतीकात्मकच असतात. उदाहरणार्थ, वाहनाच्या भोंग्याचं चित्र काढून त्यावर फुली मारलेली असेल तर त्याचा अर्थ या ठिकाणी वाहनाचा हॉर्न वाजवू नये, शांतता राखावी असा होतो.
कॉर्पोरेट जगात विविध कंपन्यांचे लोगो हे देखील प्रतीकात्मक असतात. ऍमेझॉन या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या बोधचिन्हामध्ये “ए टु झेड’ हे प्रतीकात्मक रीत्या दाखवलं गेलं असल्यानं त्याचा अर्थ उत्पादनांचा पूर्ण वर्णपट आमच्याकडे उपलब्ध आहे असा होतो. फेडेक्स या वस्तूवाहक कंपनीच्या बोधचिन्हामध्ये अक्षरांच्या पार्श्वभूमीवर दिशासूचक बाणाचं चिन्ह तयार होत असल्यानं कंपनीच्या उद्योगाची कल्पना येते. काही चिन्हांमध्ये तिरक्या अक्षरांमुळे वेगवान प्रगतीचं प्रतीक दृग्गोचर होतं.
बास्किन रॉबिन्स या आइस्क्रीम कंपनीच्या बोधचिन्हामध्ये 31 हा आकडा आपोआप तयार होतो. त्याचा अर्थ कंपनीला 31 इतके किंवा त्याहूनही जास्त स्वाद आमच्या आइस्क्रीममध्ये मिळू शकतात असं सुचवावयाचं आहे. वैद्यकीय उपचारांसंबंधी (डॉक्टरकी) जे जागतिक बोधचिन्ह वापरलं जातं त्यात एक दंड आणि त्याभोवती वेटोळं घातलेल्या दोन सापांचं चित्र आहे. प्राचीन ग्रीक वैद्यकीय गुरू अस्क्लीपियस हा उपचारांसाठी वापरत असलेल्या सर्पांचा उल्लेख हे चित्र दर्शवितं.
कुठलाही संदेश द्यायचा असेल तर सिंबॉलिझमचा उपयोग चांगला होतो. अगदी वातावरणाचा अंदाज द्यायचा असेल तर तळपता सूर्य, ढग, चमकणारी वीज, पाऊस इत्यादी खुणा वापरून तो कळवला जातो हे आपण आपल्या स्मार्टफोनवर पाहतोच. एखाद्या कार्यालयात किंवा उपाहारगृहातील स्वच्छतागृहाच्या दारांवर पत्त्यातल्या राजाचं आणि राणीचं चित्र किंवा चक्क पुरुष आणि स्त्रीचं प्रतीकात्मक चिन्ह काढलेलं असतं. दिव्यांगांच्या सोयी असतात त्यासाठी व्हीलचेअरवरची आकृती प्रतीक म्हणून काढलेली असते. विमानात कुठली सेवा हवी असेल तर विविध प्रतीकं असलेली बटनं सीटच्या वरच्या भागात लावलेली दिसतील.
व्यंगचित्रं (कार्टून) सिंबॉलिझमचा खूप छान वापर करतात. व्यंगचित्रातील एखादं पात्र खूप चिडून शिव्या देतांना दाखवायचं असेल तर कुठलाही व्यंगचित्रकार त्याच्या बोलफुग्यात (कॉलआउट) प्रत्यक्ष शिव्या लिहीत नाही तर ऽ ञ्च % अशा चिन्हांचा वापर करतो. अलीकडे स्त्री आणि पुरुष जाती प्रतीकांनी दाखवायच्या झाल्या तर अनुक्रमे एक वर्तुळ आणि त्याखाली अधिक चिन्ह तसंच वर्तुळ आणि वरच्या भागात तिरका बाण अशा खुणा केल्या जातात.
मात्र आधुनिक चित्रशैलीतील सिंबॉलिझम समजणं सामान्य माणसाला अवघड जातं. या प्रकाराला एक्स्प्रेशनिस्ट म्हणजे अभिव्यक्तिवादी असं म्हणतात. म्हणजे चित्रकाराची अभिव्यक्ती चित्रात दाखवलेली असते. म्हणूनच ते सामान्यांना अनेकदा समजत नाही!
– श्रीनिवास शारंगपाणी





