रूपगंध : ‘सुमन’ गंधित स्वरांची स्मरणकुपी

लता मंगेशकर, आशा भोसले यांसारख्या गायिकांनी माझी गाणी गायली असली तरी त्यांच्याच पिढीतील सुमन कल्याणपूर नावाचा मंतरलेला स्वर आपल्या कवितांना लाभावा अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. “ते सूर ऐकता’ या कॅसेटच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. या निमित्ताने सुमनताईंबरोबर काम करताना त्यांची काव्याविषयीची जाण, शब्दांना न्याय देण्यासाठीची धडपड अनुभवाला आली. हा “सुमन’गंधित स्वर माझ्या गीतांना लाभला हे माझं भाग्यच. अलीकडेच त्यांना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “पद्मश्री’ पुरस्कार बहाल करण्यात आला आणि जुन्या आठवणींची स्मरणकुपी उघडली.
बऱ्याच वर्षांपासूनचं माझं एक अधुरं स्वप्न होतं. यापूर्वी माझी गाणी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले अशा उत्तुंग गायिकांनी गायली होती; पण मला नेहमी वाटायचं याच बुजुर्ग पिढीतील एक सुमंगल स्वर अजून आपल्याला लाभलेला नाही आणि आता तर त्या गाणंही गात नाहीत- गाणार नाहीत, असं म्हटलं जात होतं. मनाच्या एकांतात नेहमी वाटायचं येईल का योग? एकाहून एक सरस गाणी ज्यांनी आपल्या प्राजक्त स्वरांनी गंधित केली आहेत त्या स्वरांचा योग येईल का? शांक-नील या संगीतकारद्वयींपैकी नील अर्थात सुनील कट्टी यांचा एका रात्री फोन आला, “प्रवीण एक भावगीतांची कॅसेट करतो आहोत. तुझं फक्त एक गाणं हवं आहे.
तेही दोन-चार दिवसात. गाणं स्त्री गात आहे, असं गाणं हवंय.’ मी स्वाभाविकच विचारलं, “कोण गातंय?’ सुनील शांतपणे म्हणाले, “सुमन कल्याणपूर.’ “काय?’ “होय. जवळजवळ 20-25 वर्षांनी त्या पुनगरागमन करत आहेत आणि तेही आपल्या कॅसेटनं.’ नंतरचे क्षण भारावलेलेच होते. “व्हीनस’ कंपनीने हा योग जुळवून आणला होता. अनंत पावसकरांनी सुमन कल्याणपुरांकडून पुन्हा गाणं गाऊन घेण्याची कल्पना मांडली होती.
सुमनताईंनी माझं एकही गाणं यापूर्वी गायलेलं नव्हतं. तो योग महत्त्वाचा होता. ती रात्र माझ्यासाठी मंत्रभारली होती. मी लगेचच “सुचण्याची कुपी’ उघडली. सुमनताईंच्या स्वरांना साजेसं काव्यात्मक गाणं कसं करता येईल, याची तंद्री लागली. मध्यरात्री साडे-तीन चार तास नुसता मेंदू कुटत होतो मी. मनासारखं होत नव्हतं. गाण्यांचे शेकडो मुखडे इतस्तः अपुऱ्या मूर्तींचे अवयव पडावेत, तसे पडले होते. निराशेच्या गर्द काळोखाक्षणीच आशेचा एक स्वप्नपक्षी विसावलेला असतो. तो उडतच माझ्याकडे आला आणि शब्द आले, “शब्दांचा मोर भिजे, श्रावणात झुलताना, येशील तू… येशील तू… सांगीन मी श्वासांना’ ओळ रक्तात भिनभिनत गेली आणि नव्या तारकांचा पुंज घेऊन आली. “इंद्रधनू शिंपून मी वाट तुझी पाहिली, एक एक कलिका ही मजसमोर जागली, फांदीवर झुलवित मी जपलेल्या शपथांना… येशील तू… सांगीन मी श्वासांना…’
गीतलेखन करताना नसानसातून चांदणं वहात असल्याचा शब्दातीत असा सर्जनशील अनुभव जेव्हा जेव्हा मला येतो तेव्हा तेव्हा ते गीत आणि कविता ही एकरूप होते. अशा क्षणी मी तिऱ्हाईतपणे काठावर बसून लिहूच शकत नाही. ती भावना आतून जगणारं एक मन माझ्यात वस्तीला उतरतं. पहाटे साडेपाच सहापर्यंत या गाण्याचं झाड माझ्यातून झपाटून मोहरत होतं. मनात कुठल्या कुठल्या उद्ध्वस्त परीकथा हेलावत होत्या. मनात दडलेल्या, मोहन जोदडोमधील असंख्य कळ्यांच्या निर्माल्याला शब्द लाभत होते. हे गाणं कुणासाठी लिहितोय हे विसरून कलाकृती शिल्पित होतानाचं भारलेपण मी अनुभवत होतो. एका परिपूर्ण अनुभवानं चंदेरी रिंगण पूर्णत्त्वाला जात होतं.
दुसऱ्याच दिवशी हे गाणं शांक-नील यांना दिलं. आम्हा तिघांचं वाचन झालं. शशांकजींनी (शांक) “व्वा!’ अशी दाद दिली. तर सुनील डोळे बारीक करून मिशीतच हसले. खरं तर जशी भावगीतं लिहिणं माझ्यातल्या कवीला हवं होतं, तशी महत्त्वाची गीतं मी शांक-नील यांच्यासाठी “ते सूर ऐकता’ या सुमन कल्याणपूर यांच्या कॅसेटसाठी लिहिली. आता माझं ते गाणं सुमनताईंकडे पोहोचल्यावर काय होतंय, याची मला उत्सुकता होती. कारण शांक-नील यांनी मला बोलता बोलता सुचवलं होतं, “प्रवीण, गाणं आम्हाला तर आवडलेलं आहेच; पण ते सुमनताईंना आवडायला हवं. खरं काय घडलं ते सांगतो- या कॅसेटची सगळी गाणी आम्ही पूर्ण केली होती. पण एका नामवंत कवींच्या गीतांना सुमनताईंनी रिजेक्ट केलं.’ हा इशारा मला काफी होता. आव्हान स्वीकारणं, ते यशस्वी पूर्ण करणं हा माझाही स्वभाव होताच की! चारच दिवसात शांक-नील यांचा फोन आला, “प्रवीण गाण्यांचे शब्द सुमनताईंना आवडले. त्यांना तुझं अजून एक गाणं हवंय!’ लतादीदींच्या पिढीतील गायिकेनं दिलेला हा पुरस्कारच होता. दुसरं गीत मी जरा वेगळ्या मीटरचं दिलं.
“चल झेलूया गाणे, वासंतिक उखाणे, कांचनआशा बहरून आल्या, वयात आली राने… आज एक गंमत सांगतो; रहस्य म्हणता येणार नाही, पण गुपित. हे गाणं मी लता मंगेशकर गाणार असलेल्या एका ज्येष्ठ संगीतकारासाठीच्या आल्बमसाठी लिहिलं होतं. पण तो योग जुळला नाही; पण मग ही गाणी गाणारं तेवढ्या थोरवीचं कोण? शांक-नील यांनी माझ्या प्रश्नाला त्यांच्या विलक्षण स्वररचनांनी उत्तर दिलं होतं. त्या तरल सुरांसाठी शब्द आले, “मंदिर झाले, या हृदयाचे, दिशाच झाल्या बाहू, ओंजळीतला ऋतू फुलांचा कुठल्या चरणी वाहू? हे तुझेच अक्षय देणे चल झेलूया गाणे!’ विश्वास ठेवाल? हे दुसरं गाणं सुमनताईंच्या हाती पोहोचलं आणि शांक-नील यांचा निरोप आला, “तुझ्या गीतांवर सुमनताई प्रसन्न आहेत. त्यांना तिसरं गाणं हवंय.’
तीनही गाण्यांना शांक-नील यांनी आपल्या संगीतामधून संपूर्ण न्याय दिला. आश्चर्य म्हणजे गाण्यांची रिहर्सल चाललेली असताना अचानक निरोप आला, “सुमनताईंना तुझ्याशी गाण्याबद्दल काही बोलायचंय.’ खारच्या त्यांच्या घरी जाताना खूप विचार येत होते. पुष्कळदा अबोल कर्तृत्त्ववानांबद्दल लोकच खूप बोलत असतात. त्यात काही धागे करडेही असतात. कुठे कुठे ऐकलं होतं. सुमनताई कशा बोलतील कुणास ठाऊक! वागताना तुटक आहेत… वगैरे… पण सर्व पूर्वग्रह उंबरठ्याबाहेर ठेवून मी त्यांच्या घरात प्रवेश केला. एखाद्या ऐश्वर्यशाली सम्राज्ञीचं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सुमनताई त्यांच्या श्रेष्ठत्त्वामुळे अलिप्त वाटल्या. तरी तुटक वाटल्या नाहीत.
उलट त्यांना पाहताच एकेक अजरामर ओळी समोरून लहरत राहिल्या. “जिथे सागरा, कशी करू स्वागता, तुला ते आठवेल का सारे… कितीतरी! मला त्यांनी खास बोलावलं होतं ते सर्व गीतं समजून घ्यायला. गाण्यापूर्वी गाणं कवीकडून समजून घेण्याची ऋजुता या श्रेष्ठ गायिकेनं जपली होती. “शब्दांचा मोर भिजे’ गाणं त्यांनी गुणगुणून दाखवलं. त्याही वयात दीड तपाच्या मध्यंतरानंतरही सुमन कल्याणपुरांच्या स्वराला काळ किंचितही धक्का लावू शकलेला नव्हता. सुमनताईंनी विचारलं, “प्रवीणजी ही नायिका प्रियकराची आजन्म वाट पाहते आहे. ती त्याच्या आठवणींशी बोलते आहे. नसलेल्या त्याला “येशील तू येशील तू’ हे खात्रीनं म्हणते आहे. बरोबर?’ “खरं आहे. एक प्रकारचं आशेचं आत्मसंमोहनही आहे यात. पुष्कळदा स्वप्नपूर्ती होणार नाही हे माहीत असतं; पण आतलं एक आशावादी मन तरीही वेड्या ओढीनं वाट पाहात राहतं. स्वतःलाच सांगत राहतं “येशील तू…’
सुमनताई प्रसन्न हसल्या. म्हणाल्या, “एक विचारू? समजा, येशील तू… तू येशील… असं केलं तर? तू येशील मध्ये फोर्स आहे.’ क्षणभर मला समजेना. त्यांना काय म्हणायचंय. पण त्यांनी ओळी गुणगुणून दाखवल्या. म्हणाल्या, “हे बघा! “येशील तू’ ही आशा झाली आणि मग “तू येशील’मध्ये प्रीतीच्या अधिकाराने बजावणं झालं.’
मी अवाक झालो. एका वीस-बावीशीच्या युवतीची कोवळी मानसिकता सुमनताईंनी सहज उलगडली होती. मला त्यांनी सुचवलेला बदल आवडला आणि हे गाणं अधिक उंच झालं. शांक-नील यांच्या स्वररचनेचं बोट धरून मी या मोठ्या गायिकेशी संवाद करू शकलो. त्यांनी माझं एक तरी गाणं गावं ही अंतर्यामीची इच्छा तीन गाणी गाऊन पूर्ण केली. गाणी सुमनताईंच्या मनासारखी झाली होती. चाली त्यांना हव्या तशा मिळाल्या होत्या. म्हणूनच ध्वनीमुद्रण पूर्ण झाल्यावर त्यांनी शशांकला फोन केला. तेही सकाळी सातला. म्हणाल्या, “मी मुद्दाम आभार मानते. इतक्या वर्षांनी गायले; पण मला इतकी चांगली गाणी तुम्ही दिलीत. “ते सूर ऐकता’ या कॅसेटमधील गाणी करताना सुमन कल्याणपूर यांचा लाभलेला सहवास त्यांच्या नावाप्रमाणेच मन सुगंधित करणारा ठरला.
– प्रा. प्रवीण दवणे, ज्येष्ठ-कवी गीतकार





