रूपगंध : 30 जुलै 2023 ते 6 ऑगस्ट 2023 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर-लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)

मेष : वेगळा मार्ग अवलंबा
या सप्ताहात नेहमीच्या मार्गाचा अवलंब न करता थोडासा वेगळा मार्ग अवलंबून पाहाल. व्यवसायातील कामात अनपेक्षित कलाटणी मिळाल्याने थोडा ताण जाणवेल. काही महत्त्वाचे निर्णय घेणे भाग पडेल. नोकरीत आवश्यकतेनुसार कामात बदल कराल. कार्यतत्पर राहाल. महिलांनी हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे. तुमचे विचार इतरांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करू नये.
वृषभ :ध्येय ठरवा
चाकोरीबाहेर जाऊन काही नवीन करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. कामात इतर व्यक्तींकडून अपेक्षा ठेवणे अपेक्षाभंग ठरेल. व्यवसायातील कामात आवश्यकतेनुसार फेरफार कराल. बदलत्या वातावरणानुसार तुमची ध्येय-धोरणे ठरवाल. नोकरीत वरिष्ठ कामाचा बोजा वाढवतील. कितीही काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होईलच, असे नाही. तरी झेपेल तेवढेच काम करा.
मिथुन :व्यवहारात काटेकोर राहा
या सप्ताहात रेंगाळलेल्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. त्यात तुमचा बराच वेळ व पैसे खर्च होतील. धंदा-व्यवसायातील कामात सप्ताहाअखेर मनाप्रमाणे गती येईल; आर्थिक व्यवहारात मात्र काटेकोर राहा. नोकरीत स्वतःच्या कामाकडे जास्तच लक्ष द्या. परिणामी, तुम्ही तुमचे काम व्यवस्थित पार पाडू शकाल व कमी श्रमात जास्त यश मिळवाल. सामूहिक कामात मान-मरातब मिळेल.
कर्क : हितचिंतकांची मदत
महत्त्वाच्या ग्रहांची मर्जी तुमचेवर नाही. परिणामी, ज्या कामाची पूर्तता करायला जाता, त्याच कामांना विलंब होतो. तरी तूर्तास शांत राहा. धंदा-व्यवसायात पैशांची चणचण भासेल; परंतु हितचिंतकांची मदत होईल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. मनाविरुद्ध काम करावे लागले तरी रागावू नका. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा.
सिंह : आर्थिक लाभ
घर-व्यवसाय दोन्हींकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. परिणामी, तुमची तारांबळ उडेल. धंदा-व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्या. रेंगाळलेल्या कामांना प्राधान्य देऊन ती संपवण्याचा चंग बांधा. पूर्वी केलेल्या कामाची आर्थिक स्वरूपात फळं मिळतील. नोकरीत कामाचा दर्जा उंचावेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
कन्या : अनुकूल वातावरण
“स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,’ ही म्हण या सप्ताहात लागू पडेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नवीन करार-मदार करण्यास वातावरण अनुकूल राहील. कामांना वेग येईल. पैशांची तजवीज होईल. नोकरीतील सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांना योग्य कालावधी आहे.
तुळ :व्यवहारी दृष्टिकोन ठेवा
कामाबरोबर जीवनाचा आनंदही उपभोगण्याचा मोह तुम्हाला होईल. कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. व्यवसायात कामाचा उरक पाडाल. कामाच्या पद्धतीत बदल करून व आधुनिकीकरण करून उलाढाल वाढवाल. खर्चाचे प्रमाणही वाढेल; परंतु खर्च करताना व्यवहारी दृष्टिकोन सांभाळा. भावनेच्या भरात खर्च वाढवू नका.
वृश्चिक : ग्रहांची साथ
ग्रहांची साथ लाभल्याने पैशांमुळे थांबलेल्या कामांना आता वेग येईल. आर्थिक स्थिती सुधारल्याने तुमच्यातील आत्मविश्वास बळावेल. व्यवसायात हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळवू शकाल. जागा बदल, नवीन वास्तू खरेदीचे बेत मनात येतील; परंतु थोडा धीर धरा. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल; परिणामी, नवीन प्रशिक्षण घ्यावे लागेल.
धनु : नवा आशावाद
छोटीशी सहल मन प्रसन्न करेल. कामात आलेली मरगळ दूर होऊन नवीन उत्साहाने कामाला लागाल. नवीन आशावाद जागृत होईल. परिस्थितीशी समझोता करून कामांना दिशा द्याल. व्यवसायातील कामात तुमचा दृष्टिकोन सावध राहील. परिणामी, कुठलीही रिस्क न घेता कामे हाती घ्याल. नोकरीतील कामातही सजग राहाल. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे हितावह राहील. आनंदाची वार्ता कळेल.
मकर : पुढचा विचार करा
सतत पुढचा विचार करता; भविष्याची तरतूद करून मगच खर्च करता, त्याचा लाभ होईल. व्यवसायात नवीन योजना तुम्हाला प्रेरित करतील. एखादे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे कृती कराल. स्वप्न व सत्य यांचा ताळमेळ घालावा लागेल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्याल. कामाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्यात बदल कराल. घरात सजावट व इतर गोष्टींसाठी चार पैसे जादा खर्च कराल.
कुंभ : प्रगती कराल
तत्त्वांना मुरड घालून कामात लवचिकता आणलीत तर बरेच काही मिळवू शकाल. कामात बाजी माराल. व्यवसायात तुमच्या प्रगतीचा वेग वाखाणण्याजोगा असेल. बाजारामधील चढ-उतारांचा अभ्यास नीट असेल, तर सतर्क राहून फायदा उठवता येईल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कामापुढे सर्व फिके वाटेल. कामाचा आनंद मिळेल. घरात दिलेला शब्द पाळून इतरांना खूश कराल.
मीन : मनीषा सफल होईल
कामात नवीन बदल करून उलाढालीत प्रगती व नवीन काहीतरी करण्याची तुमची मनीषा सफल होईल. व्यवसायातील प्रगती उंचावण्याचा चंग बांधाल. त्यासाठी पडेल ते श्रम घेण्याची तुमची तयारी असेल. खेळत्या भांडवलाची तरतूदही होईल. नोकरीत वरिष्ठ नवीन संधीसाठी तुमची निवड करतील. बेकार व्यक्तींना काम-धंदा मिळेल. जोडधंद्यातून लाभ होईल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांची गाठ-भेट होईल.





