रुपगंध : मोडी लिपी

मोडी ही 13 व्या शतकापासून 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात सन 1260 ते 1309 हेमाडपंत (खरे नाव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. ही लिपी छपाईस अवघड असल्यामुळे या लिपीचा वापर मागे पडत गेला आणि बाळबोधी (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला.
मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीत कमी ओळीत सारांश लिहिला जातो. मोडीतली अक्षरांची वळणे गोलाकार असतात, त्यांमध्ये देवनागरीच्या विपरीत काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते.
तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून इतिहास संशोधनाकरिता मोडी जाणकारांची आजही कमतरता भासते.
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे व डॉ. रा. गो. भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी(ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते, मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे.
मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही. मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी 900 वर्षे वापरात असून, महाराष्ट्रातील सर्वांत जुना उपलब्ध असलेला मोडी लेख सन 1189 मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आजही पहावयास मिळते. शेवटच्या 2-3 शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. काही ऐतिहासिक कागदपत्रांतील मोडी लिपी क्लिष्ट स्वरूपात वाचण्यास कठीण असते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सर्व पत्रव्यवहार मोडी लिपीत मोठ्या प्रमाणात होत असे. छत्रपतींचे चिटणीस बाळाजी आवजी चिटणीस यांचे मोडी अक्षर अगदी वळणदार व सुबक असल्याने चिटणीसी अक्षर हे मोडी लिपीतील एक उत्तम अक्षर मानले जाते. आजही महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागात व पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळात चिटणीसी अक्षराचा नमुना पहावयास मिळतो.
यानंतरच्या काळात पेशवाईतील मोडी अक्षर हे लपेटीदार अक्षराचा उत्तम नमुना मानला जातो. पेशव्यांचे सर्व ऐतिहासिक दस्तावेज व पत्रव्यवहार हा लपेटीदार मोडी लिपीत आजही पहावयास मिळतो. मोडी लिपी पेशवाई काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. मोडी लिपीचे एकूण चार कालखंडांत वर्गीकरण केले गेले आहे-
यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपीच्या लेखनातील अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली, तर शिवकालीन शैलीतील अक्षरे किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपी पूर्वी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवे काळातील लिखाण बोरूने होत असे.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाउंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रुंदी आणि टोक येत असे ते या फाउंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची आणि किचकट दिसू लागली. फाउंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाउंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि लिखाणात काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
मोडी लिपीतील असंख्य दस्तऐवज हे सरस्वती महालग्रंथालय, तंजावर, कॉनेमारा ग्रंथालय, मद्रास युनिव्हर्सिटी, चेन्नई, लंडन, पॅरिस, नेदरलॅंड्स, स्पेन येथील संग्रहालय, भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे, मराठी इतिहास संशोधन मंडळ या ठिकाणी संग्रहित केले आहेत. सन 1801 मध्ये विल्यम कॅरे या मिशनऱ्याने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी लिथोग्राफ, श्रीरामपूर बंगाल येथे बनवला. तसेच इतिहास संशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा इतिहास लिहिला आहे. सन 1952 च्या खेर मंत्रिमंडळाने शाळेत तसेच इतर व्यवहारातील मोडी लिपीचे लेखन बंद करण्याचा आदेश दिला.
मोडी लिपीचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन झालेल्या जागतिक मोडी लिपी प्रसार समिती मुंबई येथे मोडी लिपीचे प्रगत वर्ग घेतले जातात. तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथेही मोडी लिपीचे वर्ग नाममात्र शुल्कात परीक्षेसह घेतले जातात. तेव्हा मोडी लिपीचे आपण प्रशिक्षण घेऊन ऐतिहासिक दस्तावेज वाचून संशोधन कार्यात सहभागी होऊया.
– अमेय गुप्ते





