रूपगंध : गैरसमज

गैरसमजुतीमुळे मोठमोठाले घोटाळे होतात. कधी गैरसमजूत दूर होऊन मळभही दूर होतं तर कधी कधी ते आयुष्यभर राहतं. हिंदी सिनेमात गैरसमजुतीमुळे प्रियकर-प्रेयसी दूर होतात, अगदी एकमेकांचा द्वेषही करू लागतात. “आय हेट यू’ अशी वाक्यंही फेकतात. अखेरच्या रिळांमध्ये गैरसमज दूर होऊन प्रेमी युगुल पुन्हा प्रेमबंधनात गुरफटून जातात. “अगर तुमने वो इस इरादेसे किया था तो मुझे पहले क्यों नही बताया’, अशी विचारणा होताच “मैंने कई बार कोशिश की लेकिन तुमने मौकाही नहीं दिया’ हे उत्तरही तयारच असतं. बहुधा नायकाला किंवा नायिकेला “जळवण्या’साठी केलेल्या कृत्यामुळे प्रेक्षकांना दो-अडीच तास (पण चित्रपटातील कित्येक महिने किंवा वर्षं) खोळंबून बसावं लागतं!
असल्या गुळगुळीत कथानकांचा भाग सोडला तर आपल्या साध्यासुध्या आयुष्यातही गैरसमजूत खूप मोठा घोळ करते. माझा शाळेपासूनचा एक मित्र खूप उद्दाम आणि भांडखोर होता. त्याला श्रीमंतीचा गर्वही होता. काहीतरी अपमानास्पद बोलल्यामुळे मी त्याच्याशी बोलणं सोडून दिलं. पुढे माझ्या इतर मित्रांनीही अशाच अनुभवामुळे त्याच्याशी संबंध तोडले. या श्रीमंत, उद्दाम मित्राला असं वाटलं की मी त्याच्याबद्दलचं इतरांकडे मत कलुषित केलं आहे. ही गैरसमजूत अनेक वर्षे त्याच्या मनात घर करून होती. पुढे एका समारंभातील भेटीत त्यानं मन उघडं केलं, आपले दोष मान्य केले आणि गैरसमजूत झाल्याचं कबूल केलं.
लग्नसमारंभात भेट म्हणून मिळालेल्या साडीचं वर्णन करताना एक स्त्री उद्गारली, जरा फिकट रंग आहे नाही का? खरं तर तिला असं सुचवायचं होतं की तिच्याकडे अशाच पण गडद रंगाची साडी आहे. पण तो उद्गार ऐकून ज्या ज्येष्ठ स्त्रीनं ती साडी दिली होती तिचा गैरसमज झाला की घेणाऱ्या स्त्रीच्या मते ती कमी दर्जाची आहे. झालं! ज्येष्ठ स्त्रीनं धुसफुसायला सुरुवात केली, गेल्या समारंभात ह्यांनी काय दिलंवतं? पोतेरं होतं पोतेरं! त्या दोन्ही स्त्रियांत या गैरसमजातून झालेला बेबनाव अनेक दशकं तसाच राहिला.
जेव्हा गैरसमजूत सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होते तेव्हा परिणाम धक्कादायक आणि बऱ्याच काळापर्यंत टिकून राहणारा असतो. आपल्या वाचण्यात येतं की एका गावात नव्यानं आलेला इसम हा मुलं पळवणारा आहे, अशा गैरसमजुतीनं त्याला जमावाकडून मारहाण करण्यात येते. नंतर कळतं की तो निरपराध आहे. काहींना अशा प्रकारात प्राणही गमवावे लागले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या गैरसमजुतीचं उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस दोस्त राष्ट्रांच्या वतीनं अमेरिकेनं जपानला बिनशर्त शरण न आल्यास महाविनाश होऊ शकतो असा संदेश पाठवला. याबाबत पत्रकारांनी जपानी पंतप्रधान कांतारो सुझुकी यांना विचारल्यावर सुझुकी यांनी मोकुसात्सु हा जपानी शब्द वापरला. आता मोकुसात्सु हा शब्द थोडा चमत्कारिक आहे आणि त्याचा अर्थ संदर्भानुसार बदलतो. सुझुकी यांना म्हणायचं होतं की नो कॉमेंट्स! मात्र या विधानाचा अमेरिकन भाषांतरकारांनी नाही म्हणजे शरण येणार नाही असा अर्थ घेतला आणि अमेरिकी राष्ट्रपतींनी जपानवर अणुबॉंब टाकण्याची आज्ञा केली. जेव्हा जेव्हा आपलं शेजारी राष्ट्र चर्चेसाठी तयार आहे अशी आपल्या नेत्यांची गैरसमजूत झाली आणि आपण हात पुढे केला तेव्हा तेव्हा त्या राष्ट्रानं दहशतवादी कारवाया केल्या.
1877 या वर्षी शियापरेली या इटालियन खगोलतज्ञानं मंगळ ग्रहाचं दुर्बिणीतून सखोल निरीक्षण करून संशोधन प्रसिद्ध केलं. त्याला मंगळावर अनेक उभ्या, आडव्या रेषा आढळल्या. त्यानं लेखात त्यासाठी “कॅनाली’ हा इटालियन शब्द (म्हणजे इंग्रजीत चॅनेल) वापरला. त्यावरून अनेकांनी मंगळावर बुद्धिमान सजीव असून त्यांनी कालवे खोदलेले आहेत असा निष्कर्ष काढला! ही गैरसमजूतच नव्हे काय?
गैरसमजूत टाळण्यासाठी आपण व्यक्त केलेल्या गोष्टींतून चुकीचा अर्थ तर काढला जाणार नाही ना याची काळजी व्यक्त करणाऱ्या व्यक्तीनं घेतली पाहिजे. तसंच ती ऐकणाऱ्या/वाचणाऱ्या किंवा पाहणाऱ्या व्यक्तीनंही घेतली पाहिजे. शंका आल्यास खात्री करून घेतली पाहिजे. तरच होणारे अनर्थ टाळता येतील.
– श्रीनिवास शारंगपाणी





