Kangana Ranaut – शेतकरी आंदोलनादरम्यान दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत बठिंडा न्यायालयात हजेरी लावावी लागली. या वेळी कंगनाने आपली चूक मान्य करत माफी मागितली. तिने सांगितले की, “हे सगळं एक गैरसमज होता. मी सर्व मातां-भगिनींचा मनापासून सन्मान करते.” असं ती म्हणाली. काय आहे प्रकरण? शेतकरी आंदोलनाच्या काळात कंगना राणावतने ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) वर एक पोस्ट केली होती. यात तिने बठिंड्यातील बहादुरगड जांडिया गावातील ८१ वर्षीय शेतकरी महिला महिंदर कौर यांचा फोटो रीट्विट करत त्यांना शाहीनबाग आंदोलनातील बिलकिस बानो असल्याचे म्हटले होते. तसेच “अशा महिला १०० रुपयांत आंदोलनात बसतात,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या महिंदर कौर यांनी कंगनाविरोधात बदनामीचा दावा दाखल केला. या प्रकरणात शनिवारी (२७ ऑक्टोबर) कंगनाची न्यायालयात सुनावणी झाली. कंगनाचे स्पष्टीकरण : न्यायालयात कंगनाने सांगितले, “मी कुणाच्याही विरोधात वैयक्तिक टिप्पणी केली नव्हती. मी फक्त एका वकिलाचा पोस्ट रीट्वीट केला होता. जे काही झाले ते पूर्णपणे गैरसमजामुळे झाले. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.” कोर्टाने पुढील सुनावणीसाठी २४ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. आधीही लागला होता झटका : यापूर्वी सुप्रीम कोर्ट आणि पंजाब-हरियाणा हायकोर्ट यांनी कंगनाची याचिका फेटाळली होती. तिने आपल्यावरील खटला रद्द करण्याची मागणी केली होती, परंतु ती नाकारण्यात आली. तसेच तिने सुरक्षा कारणास्तव न्यायालयात कायमस्वरूपी सूट (permanent exemption) मागितली आहे.