रूपगंध : चूक

टेंडर ओपनिंगच्यावेळी मे.माने कंपनीच्यापेक्षा जोशी यांचं टेंडर दोन टक्के कमी असल्यामुळे जोशी याना हे दीड कोटीचे काम गृहनिर्माण मंडळाला द्यावे लागणार हे माने,कार्यकारी अभियंता आणि मुख्याधिकारी नलावडे याना स्पष्ट झाले. माने आणि नलावडे साहेब यांची टेंडर पूर्वीची व्यावहारिक बोलणी संपुष्टात येणार होती. परंतु माने यांच्या टेंडरमध्ये अनावधानाने दोन आयटेमच्या दरामध्ये आकडा आणि अक्षरी रक्कम लिहिताना एका शून्याची चूक लेखाविभागाने निदर्शनाला आणून दिली होती. नियमानुसार आयटेमचा दर अक्षरात लिहिलेला ग्राह्य धरण्यात येतो आणि त्यात्या आयटेमची रक्कम काढताना अक्षरी दराप्रमाणे रक्कम धरण्यात येते. तसं केल्यामुळे जोशी यांच्यापेक्षा एरवी दोन टक्क्याने जास्त भरलेले टेंडर दोन टक्क्याने कमी रकमेचे ठरत होते. या दुरुस्तीमुळे जोशी यांच्याऐवजी माने लोएस्ट ठरत होते. कामाचे प्रदान माने कंपनीला करावे लागणार होते.
हा गोंधळ माने याना ठाऊक नव्हता. यामुळे आपल्या हातातून दीड कोटीचे काम गेले आहे या समजुतीने माने नर्व्हस झाले होते. माने तुम्ही नाराज होण्याचे कारण नाही ,तुम्हालाच हे काम मिळणार आहे हे सांगण्यासाठी मुख्याधिकारी नलावडे साहेबानी माने याना फोन लावला.
“ कॉंग्रच्युलेश्न्स माने , यू हॅव कम लोएस्ट ओन्ली बिकॉज ऑफ अर्थमॅटिक मिस्टेक इन आयटेम ऑफ स्टील अँड कॉक्रीट .संध्याकाळी निवांतपणे बोलू आपण.” मानेंनी फोन खाली ठेवला. समाधानाने सिगारेट शिलगावली आणि आपल्या बंद केबिनच्या काचेतून बाहेरच्या काम करणाऱ्या स्टाफकडे बघितलं. अकौंटंट शहा आपल्या कामात मग्न होता. मानेंची सिगरेट संपली तरी शहा आपल्या कामात मग्न होता. हे दृश्य पहाताच मानेंच्या चेहऱ्यावर हास्य रुंदावलं आणि त्यांनी घरी फोन लावला.” कामिनी,मी राजीव बोलतोय.अगं आपल्याला गृहनिर्माण मंडळाचं दीड कोटींचं काम मिळाल्यात जमा आहे. तू जेऊन घे.मला साहेबांना घेऊन बाहेर जावं लागेल. अच्छा डार्लिंग शाल आय कीस यू ओंन फोन.”
“ नॉटी बॉय “असं म्हणत तिने फोन बंद केला.फोन ठेवताच मानेंनी नजर करडी केली,आणि इंटरकॉमवरून रिसेप्शनिस्टला सांगितलं,” सेंड मि. शहा,अलॉंगविथ टेंडर कॉपी ऑफ गृहनिर्माण मंडळ “. शहा फाईल घेऊन आत आले व अदबीने उभे राहिले.मानेंनी फाईल उघडली.झेरॉक्स कॉपीवरचे स्टील व क्रोंकिटच्या आयटम वरून नजर फिरवली आणि झालेला घोटाळा त्यांच्या लक्षात आला. अक्षरातील रक्कमा एका शून्याने कमी लिहिल्या गेल्या होत्या. मात्र कॅलुक्युलेशन आकड्यातील योग्य दराने केली होती. तिरसटपणे ती फाईल त्यांनी शहापुढे नाचवली आणि त्यांनी केलेला घोटाळा त्यांच्या कानावर घातला.
शहांचा चेहरा क्षणात काळवंडला.हातापायाला कंप सुटला.केविलवाण्या नजरेने त्यांनी मानेकडे पाहिले. माने गरजले. “ मि. शहा तुमच्या या घोटाळयामुळे काय झालंय याची कल्पना आहे तुम्हांला . माझं दहा एक लाख रुपयाचे नुकसान तुमच्या गलथानपणामुळे झालंय.यू विल हॅव टु पे धिस ब्लँडर.मी तुम्हांला क्षमा करू शकत नाही.आय ऍम अफ्रेड आय विल सिझ युवर इन्क्रिमेंट ऑफ कमिंग इयर. जरा जबाबदारीने काम करायला शिका.आय वॉर्न यू अशी गंभीर चूक पुन्हा घडली तर….आय विल सेंड यू होम. माइंड वेल. “
शहाच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. अपराधी मनाने तो जागेवर येऊन बसला.मघापर्यंत आत्मविश्वासाने करत असलेल्या कामात चुका होऊ लागल्या. तीन चोक बारा ऐवजी तेरा आकडा तो लिहू लागला. रुमालाने डोळ्यातले अश्रू पुसू लागला. काही वेळातच मानेनी प्युनला काम मिळाल्याच्या आनंदात पेढे आणायला सांगितले व साऱ्या स्टाफला वाटायला सांगितले. प्युनने पेढे वाटता वाटता शहांच्या हातावर ठेवले. घामेजलेल्या त्यांच्या हातात पेढ्यांचा भुगा झाला.शहांची ही रडवेली अवस्था पाहून माने केबिनमधून बाहेर आले. त्यांनी शहाच्या पाठीवर थोपटले अन म्हणाले,” मि. शहा तुमच्या या चुकीचा मला फायदा झालाय.
आय.हॅव बिकम लोएस्ट टेंडरर. तेव्हा डोन्ट बी अफ्रेड. आय विल नॉट टेक एनी ऍक्शन अगेन्स्ट यू. तुमच्यासारखी कामाची माणसं मला अशी नाउमेद करून कसं चालेल.आपल्या कंपनीला अजुनी खूप मोठी काम करायचीत, अन तीही तुमच्यासारख्या सिन्सियर माणसाच्या भरवश्यावर . नाउ रिलॅक्स कम्प्लीटली , आणि हो एक दिवस तुम्हांला घरी जाऊन यायचं असेल तर जाऊन या. छान फ्रेश होऊन या.” शहांचा उजळलेला चेहरा पहातांना मानेंना आपले मागील दिवस आठवले. लहानपणी अन्नाला मोताद असताना रस्त्यावरील मोटारगाड्या पुसतांना झालेला अपमान अन एखाद्या दयाळू मोटार मालकांनी दिलेली भरघोस टीप आठवली.त्या आठवणींच्या शिदोरीवरच ते मोठे झाले होते.इतरांना मोठे करणार होते.
मिटिंगपुढे गृहयोजनेच्या बांधकामाचे टेंडरबाबत निर्णय घ्यायचा विषय आला. प्रत्येक सदस्याला मानेने अगोदरच कॉन्टॅक्ट केल्याने काही मिनिटातच तो विषय पास झाला व गरीबाच्या घरांसाठी सी.एम. च्या आदेशाचे पालन करण्यासाठी ताबडतोब मे. माने कन्स्ट्रक्शन कंपनीला वर्क ऑर्डर द्यायचा निर्णय घेण्यात आला.तसेच त्यांच्या विनंतीप्रमाणे १२%व्याज दराने मोबीलायझेन एडव्हान्स मंजूर करून तो रनिंग बीलातून वसूल करण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला. मिटिंग संपली आणि मानेने कार्यकारी अभियंता,मुख्य लेखापाल ,मुख्य अधिकारी वगैरेंच्या केबिनमध्ये जावून एन्व्हलप वाटली. चेअरमनसाहेबांच्या सूचनेनुसार त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे एन्व्हलप सोपवलं. स्वीय सहाय्यकाचा इंटरकॉमवरून अंदाज घेत चेअरमन म्हणाले,” ‘हे बघा माने, आम्ही लोक काही तुमच्या साईटवरच्या कामावर येणार नाही. कधीकाळी मुख्य अधिकारी बरोबर आलोच तर कामांची प्रगती पहायला येऊ,पण बाकी कुठल्याही भानगडीत पडणार नाही.शक्य होईल तसं तुम्ही कार्यकारी अभियंता आणि त्यांचा स्टाफ यांची काळजी घ्या.नियमाप्रमाणे काम करून इंजिनियर लोकांची तक्रार येणार नाही असं बघा. थँक्यू फॉर कोऑपरेशन अँड विशिंग यू एव्हरी सक्सेस “’.
दोनच दिवसात माने कंपनीला कामाची वर्क ऑर्डर व मोबीलायझेन एडव्हान्सचा तीस लाखाचा चेक मिळाला. हळू हळू साईटवर मटेरियल येऊ लागलं.आयटेमप्रमाणे पेटी कॉन्ट्रॅक्टरच्या खेपा वाढू लागल्या. त्यांचे दर ठरवले जाऊ लागले. इमारतीच्या नकाशाप्रमाणे जागेवर लाईन आउट सुरु झाले. पहिल्या दोन चार इमारतींचे लाईन आउट कामावरच्या इंजिनियर्सनी तपासले. त्यात काही त्रुटी न आढळल्याने पुढच्या इमारतीचा लाईन आउट माने कंपनीची लोकच करू लागली व पायाची खोदाई सुरु करण्यापूर्वी भूमिपूजन
समारंभ आयोजित करण्याचे ठरले. कार्यकारी अभियंता ,मुख्य अधिकारी आणि माने यांनी चांगला दिवस मुक्रर केला, आणि ठरलेला दिवस सांगण्यासाठी सगळेजण चेअरमनसाहेबांकडे गेले. चेअरमननी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एखाद्या जाहीर सभेत भाषण करावं अशा थाटात म्हटलं,” मित्रहो, तुम्ही चांगल्या कामासाठी दिवस ठरवला पण भूमिपूजन कुणाच्या हस्ते करणार?” उस्फूर्तपणे माने उद्गारले,”
साहेब तुमच्याखेरीज कुणाकडून?” मंद हसत चेअरमन म्हणाले,” नाही चुकताय तुम्ही,गरिबासाठी गृहयोजना आपण राबतोय याचा
गाजावाजा व्हायला हवा. पालकमंत्री या नात्याने उद्योग मंत्र्यांच्या हस्ते हा सोहळा व्हायला हवा. आय वील ट्राय टू टेक हिज अपॉईंटमेंटन्ट ऍज सून ऍज पॉसिबल “. “ पण साहेब आमची प्राथमिक तयारी तर पूर्ण झालीय.जवळ जवळ १६ इमारतींचे लाईन आउट तयार
आहे. काही प्रमाणात मटरेयिल आणून टाकलंय. लेबर गॅंग फिक्स केल्यात,आणि महत्वाचं म्हणजे हा आपला टाईम बाउंड प्रोग्रॅम आहे. तेव्हा …” निराशेने कार्यकारी अभियंता उद्गारले. “मि. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर , या गोष्टी तुम्ही मला सांगायची आवश्यकता नाही. तुम्हांला या स्कीमवर रहायचंय ना? की दुसऱ्या कुणाला “. “नाही सर तसं नाही “ “ देन लिसन टू मी, उद्योग मंत्र्याचे हस्ते मोठ्या प्रमाणावर समारंभ झाल्यावरच काम सुरु होईल. धिस इज माय ऑर्डर… नथिंग टू बी अटेंड.तुम्ही जाऊ शकता.”( क्रमशः )
दीपक पारखी





