रूपगंध : जगणं अभावांचं

साल 1975, परिसर रायगड पायथ्यापासून महाडच्या दिशेला नांदगाव नावाचं गाव. मी तिथं धरणाच्या कामाच्या सर्वेक्षणासाठी आलोय. एका ठिकाणी कुडाच्या भिंती असलेल्या घरात पंधरा दिवसासाठी मुक्कामाला 5 जणांच्या टीम बरोबर आलोय. सोबत काम करण्यासाठी कातकरी लेबर मस्टरवर घेतलेले. संख्या असेल 30/35. एका सकाळी उठलो काहीतरी सहा वाजता. लेबर येऊन कोंडाळं करून बसलेले. मी तांब्यात पाणी घेऊन दात घासण्यासाठी ब्रश आणि पेस्ट घेऊन गेलो. दात घासून झाल्यावर पेस्ट दगडावर ठेवलेली आठवत होती पण नंतर सापडेना. शोधायला सुरुवात केली तर हे कातकरी आलटून पालटून ती हातात घेऊन बघत होते; चेहऱ्यावर काहीतरी वेगळच बघतोय हे कुतूहल. पुण्यातून अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच आलेलो त्यामुळे अशी वेगळी माणसं बघायला मिळणं हे माझं आश्चर्य.
सर्वेक्षण चालू करून 3 तास झालेले, दुपारी झाडाखाली मी आणि सहकारी जेवायला बसलो. या लोकांनीही त्यांचं खाणं काढलं. आग्रह करूनही ते आमच्याबरोबर जेवायला बसले नाहीत. मात्र त्यातील एकानं आम्हाला हिरव्या द्रोणात तोंडी लावायला मध आणून दिला. तो खाल्ला तेव्हा कळलं की गोड आणि मधुर हे दोन शब्द निराळे आहेत. ही सगळी मंडळी अनवाणी, कमरेला लंगोटी, करगोट्याला कोयती, तोंडात तंबाखू आणि शिकार करता यावी आणि आपणच शिकार होऊ नये म्हणून नजरेत भिरभिर.
एकाकडे लक्ष गेलं त्यानं लंगोटीच्यावर पोटावर घट्ट टॉवेल/पंचा बांधलेला. मला वेगळं वाटलं म्हणून कारण विचारलं. खूप वेळा विचारून सांगेना म्हणून म्हटलं तुला मी उद्यापासून कामावर ठेवणार नाही. तो नुसता उभा पण डोळ्यात याचना. तरीही उत्तर नाही. शेवटी एकानं म्हटलं सायबानू तसं बांधलं कि भूक लागलेली समजत नाही. आता त्याच्या डोळ्यातील लाचारी मी बघू शकत नव्हतो कारण माझी मान खाली ओढून घेतलेली अश्रू लपविण्यासाठी.
चारच्या सुमाराला मुक्कामाच्या ठिकाणी आलो. भिंतीवरच्या खिळ्याला पिशवी अडकवलेली, त्यात नुकतं दळून आणलेलं भाकरीचं पीठ. अचानक एक उंदीर पिशवीत पीठ खाण्यासाठी शिरला. तितकाच अचानक एक कातकरी उठला, त्यानं पिशवीचं तोंड बंद करून पिशवी दगडावर दोन तीनदा आपटली. मेलेला उंदीर चिमटीत धरला. चार काटक्या पेटवून तो भाजला, सोलला आणि थोडं तिखट-मीठ टाकून खाऊन टाकला.
दुसऱ्या दिवशी मी खायला न घेता टॉवेल बरोबर घेतला. मे महिन्याची टळटळीत दुपार, खूप तहान लागलेली. मी एका घराच्या दिशेनं झपझप चालायला लागलो. एका लंगोटीनं अडवलं आणि म्हटलं सायबानू त्ये घर “त्या’ लोकांचं हाये आमी बी तथ पानी पीत नाही अन तुमी का चाललाय. मी एकटाच पाणी पिऊन आलो पण हे हलले नाहीत.
या सगळ्या गोष्टींना 40/42 वर्षे झाली. मध्ये महाडला बाजार पेठेत एक आजा-नातू जोडी दिसली. आजा तसाच माझा लंगोटीयार आणि नातू पायात चप्पल, पॅन्ट, शर्ट, केसांची स्टाइल आणि हो डोळ्याला गॉगल.
– दीपक पारखी





