रूपगंध : दिव्यत्वाची जेथ प्रचीती

दिव्यत्वाची जेथ प्रचीती (प्रतीती असाही पाठभेद दिसतो) असं थोर कवी बा. भ. बोरकर म्हणून गेले आहेत. माणसाला भव्यदिव्य पाहावसं वाटतं, करावसंही वाटतं. असं काही पाहिलं की आपोआप आपले “कर जुळती’ असं होतं! कुठलीही भव्यदिव्य कलाकृती हृदयाला भिडते.
अलीकडेच निधन पावलेले जगप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक पीटर ब्रुक हे अशीच एक दिव्य कलाकृतीचे निर्माते होते. कथानकाला समर्पक असा मोठा “कॅनव्हास’ दिला नाही तर तो नाट्यकृतीवर अन्याय होईल अशा विचारांनी ते प्रदर्शनासाठी योग्य असा अवकाश शोधत. महर्षी व्यासलिखित महाभारत या महाकाव्यानं त्यांना इतकी भुरळ घातली की त्यावर त्यांनी महानाट्य करायचं ठरवलं. तब्बल नऊ तासांचं हे बृहत्-नाटक सादर करायला योग्य असा रंगमंच मिळणं महामुश्कील. अखेर त्यांनी पॅरिसजवळच्या ऍव्हिनॉन येथील एका वापरात नसलेल्या खाणीचा अवकाश निश्चित केला. तीन दिवस त्यांनी तीन तासांचे तीन भाग दाखवून प्रेक्षकांना भारावून सोडलं. पुढील दोन वर्षे ते जगभर या नाटकाच्या प्रदर्शनासाठी दौरा करत राहिले.
“जाणता राजा’ ही अशीच एक डोळे दिपवणारी, कान तृप्त करणारी नाट्यकृती. या महानाट्यातही उंच रंगमंच, रंगमंचावर हत्ती, घोडे आणि उंट यांचा वावर असल्यानं ऐतिहासिक दृश्यांचं नेत्रदीपक सादरीकरण पाहायला मिळतं. या नाट्यासाठी विविध किल्ले, शनिवारवाडा, वेगवेगळी क्रीडांगणं यांचा रंगमंचासाठी वापर करण्यात आला.
मी चीनमध्ये काही नेत्रदीपक शो पाहिले. एकदा तर रामायण आणि महाभारत या महाकाव्यांवर आधारित चिनी कलाकारांनी सादर केलेले आविष्कार पाहण्याचा योग आला. कथानकाची काहीशी चिरफाड केली असली तरी शो खचितच भव्यदिव्य होता. इथे राम सीतेला चक्क मिठी मारताना पाहावा लागला! हनुमान आकाशातून उड्डाण करीत असलेला सीन चकित करणारा होता. रंगमंच तर प्रचंड मोठा होता आणि प्रेक्षागृह खचाखच भरलेलं होतं.
रशियामधील सर्कशी तसंच बॅले नृत्याचे कार्यक्रम खूप दिमाखदार असतात. मॉस्कोमधील बॅले थिएटर अर्धगोलाकार आहे आणि रंगमंच खूप मोठा आहे. बाल्कनीमधून बॅले नृत्याचा आस्वाद घेणं म्हणजे अक्षरश: स्वर्गीय अनुभूती होती. डोळे दिपवून टाकणारे चित्रपट आपल्याकडे अलीकडेच पाहायला मिळू लागले आहेत. आधुनिक ऍनिमेशन तंत्रज्ञान आणि संगणकांच्या साह्यानं निर्माण झालेले बाहुबलीसारखे चित्रपट सध्याच्या काळात सादर झालेले आहेत. याआधी उपलब्ध साधनसामग्रीसह राज कपूर यांनी “संगम’ तसंच “मेरा नाम जोकर’ असे भव्य चित्रपट निर्माण केले.
यामुळे त्यांना “शोमन राज कपूर’ अशी उपाधी मिळाली. परंतु निदान त्या काळी तरी देखणे आणि उत्तुंग चित्रपट निर्माण करण्यामध्ये हॉलिवुडची इतर कोणत्याही निर्मितीक्षेत्राशी तुलना होऊ शकत नव्हती. एका स्नेह्यांशी या विषयावर चर्चा करीत असताना ते म्हणाले की “बेनहर’ हा हॉलिवुडपट पाहिल्यावर नेत्रदीपक चित्रपट कसा असावा याचा वस्तुपाठच मिळाला. खरोखरीच “बेनहर’, “क्लिओपात्रा’ असे ऐतिहासिकच नव्हे तर “2001-अ स्पेस ओडिसी’ यासारखे विज्ञानकाल्पनिक चित्रपट पाहिले तरी त्यांच्या भव्यतेची कल्पना येईल. सभोवतीच्या वातावरणाचा इतका हुबेहूब अनुभव देणारे सेट निर्माण करणं तिकडील कलादिग्दर्शकच जाणोत!
डिझ्ने वर्ल्ड किंवा तत्सम थीम पार्कमधील विविध शो केवळ अचंबित करणारेच नाहीत तर ते अनुभव रोमांचकारी आणि चित्तथरारक आहेत. एका शोमध्ये प्रेक्षक जगातील विविध प्रेक्षणीय स्थळांच्या भेटी करू शकत होते. बसल्या जागेवरून आपण आकाशातून उडत जात एफेल टॉवरच्या तळापासून त्याच्या टोकापर्यंत किंवा ताज महालच्या घुमटावरून असे जातो की आपल्या पायाला ते टोक लागेल की काय अशी भीती वाटते.
हे सर्व संगणकीय आभासी प्रणालीद्वारे निर्मिलेलं असलं तरी खूप भव्य आणि खरंखुरं वाटतं. अशाच एका शोमध्ये तर आम्ही मंगळ ग्रहावर उतरून फिरण्याचा अनुभव घेतला होता. तसंच तिथल्या एका चतुर्मिती (फोर-डी) चित्रपटात पडद्यावरील पात्र शिंकल्यावर अंगावर तुषार पडल्याचा आणि पडद्यावरून उंदीर आपल्या दिशेनं पळत आल्यावर पायांवर उंदीर खेळत असल्याचा भासानुभव विस्मयजनक होता. हे सगळ्या ज्ञानेंद्रियांना चकित करणारे प्रयोग पाहिले की कर जुळल्याशिवाय राहतील का?
– श्रीनिवास शारंगपाणी





