रूपगंध : हातमिळवणी कशी?

विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. या राज्यात सध्या पंचायत निवडणुकीत झालेल्या हिंसाचारावरून तृणमूल आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवत आहेत. संबंध एवढे विकोपाला गेले आहेत की कॉंग्रेस ही पश्चिम बंगालमध्ये भाजपची “बी टीम’ असल्याचा उल्लेख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. कॉंग्रेस आणि टीएमसी यांचे संबंध पश्चिम बंगालमधून दिल्लीकडे प्रवास करताना कसे बदलत चालले आहेत, हे जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.
ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच असे म्हटले, की कॉंग्रेस पश्चिम बंगालमध्ये भाजपचा चांगला मित्र आहे. एवढेच नाही तर कॉंग्रेस दोन्ही डाव्या पक्षांचा आणि भाजपचा मित्र आहे. संसदेत या पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी तुमची इच्छा आहे का? असा सवाल करत त्या म्हणाल्या, भाजपच्या विरोधासाठी हा देखील निर्णय घेऊ. परंतु लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये आपले घर सीपीआयएमबरोबर चालवता. म्हणून प. बंगालमध्ये आमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नका.
आता ममता बॅनर्जी यांच्या आरोपाला कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रसने नेते अधीर रंजन चौधरी यांनी मुँहतोड जबाब दिला आहे. ते म्हणाले, की ममता या भाजपसमवेत डावपेच खेळतात. जेव्हा विरोधकांच्या ऐक्याचा प्रश्न येतो, तेव्हा त्या नेहमीच तोडण्याचे काम करतात. ममता यांनी समजून घेतले पाहिजे, की कॉंग्रेसच्या दयेवर त्या नेत्या आहेत. अशा स्थितीत कॉंग्रेसला त्यांची मदत कशाला हवी असेल?
पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराने एक गोष्ट सिद्ध झाली आणि ती म्हणजे कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसचे अद्याप मनोमिलन झालेले नाही. मुर्शिदाबाद येथे उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला. कॉंग्रेसने देखील भाजपला साथ देत बंगालमध्ये सीआरपीएफ तैनात करण्याची मागणी केली आहे.
एका अर्थाने पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि कॉंग्रेस एकत्र येऊन ममता बॅनर्जींना घेरण्याचे काम करत आहेत. मात्र दिल्लीत हाच कॉंग्रेस पक्ष ममतांसमवेत येण्यासाठी तयार आहे. वास्तविक काही काळापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसला एक ऑफर दिली होती. त्यात म्हटले होते, की कॉंग्रेसला देखील तडजोड करावी लागेल आणि प्रादेशिक पक्षाला जागा द्यावी लागेल. यानुसार कॉंग्रेसने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवू नये, असे ममतांना वाटते. आता देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसला हा प्रस्ताव कसा मान्य होईल?
कॉंग्रेस आणि तृणमूल यांच्यातील ताणाताणी मेघालयमधील निवडणुकीच्या काळातही पाहवयास मिळाली. तेथे निवडणुकीच्या मैदानात भाजपा, कॉंग्रेस होते आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस देखील नशिब आजमावत होता. मात्र या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपऐवजी तृणमूल कॉंग्रेसवरच अधिक हल्लाबोल केला. याचे कारण गोव्याप्रमाणे मेघालयात तृणमूलमुळे मतांची विभागणी होईल आणि भाजपचा विजय होईल, अशी कॉंग्रेसची धारणा होती.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यात तीव्र शाब्दिक फैरी पहावयास मिळाल्या. प्रत्यक्षात हा राजकीय तणाव मेघालय निवडणुकीच्या काळातच निर्माण झाला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी तृणमूल कॉंग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले होते, की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने किती गैरव्यवहार केले, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. यावर अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांनी वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा पक्षाच्या रणनीतीवर काम करायला हवे, असे म्हणत जोरदार तोफ डागली होती. मागील काळात ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रामधील एका पत्रकार परिषदेत “कोण यूपीए?’ असा सवाल केला होता. तात्पर्य, पश्चिम बंगालमध्ये या दोन्ही पक्षातील संबंध विस्तवही जात नाही अशा पातळीवर असताना राष्ट्रीय राजकारणात ते एकत्र कसे येऊ शकणार, हा खरा प्रश्न आहे.
– सरोजिनी घोष





