रूपगंध : गेले ते दिन गेले

माझी प्रकृती ठीक नसल्याचे कळाल्यावर धाकट्या दोन बहिणी गेल्या आठवड्यात कराडवरून पुण्यात मला भेटायला आल्या होत्या. वयोमानानुसार स्वभाव अगदीच हळवा बनला असल्यामुळे असेल कदाचित, दोघींना पाहताच डोळे वाहायला लागले. बांध फुटावा तसे अश्रू सैरावैरा धावत होते. मन थोडेसे स्थिर होऊन शांत झाल्यावर डोळे गळायचे थांबले. एक दिवस थांबून दोघी निघून गेल्या. त्या गेल्यावर मी मात्र भूतकाळाच्या पोकळीत शिरून एका एका आठवणींना कुरुवाळू लागलो. मनाने पन्नास वर्षे मागे गेलो.
1968 साली गाव सोडून नोकरीच्या निमित्ताने पुण्यात रुजू झालो. आयकर खात्यात कनिष्ठ श्रेणी लिपिक पदाची नोकरी होती. पगार होता 152 रुपये महिना. शनिवार वाड्याजवळ एका वाड्यात रहायची सोय झाली होती. मासिक भाडे होते 10 रुपये. एक सायकल महिना 10 रुपये भाड्याने घेतलेली. दोन वेळच्या जेवणासाठी खानावळ होती महिना 25 रुपये अशा तऱ्हेने अन्न आणि निवारा या दोन गोष्टींसाठी केवळ 45 रुपये लागत असत. खरेच स्वस्ताई होती त्यावेळी म्हणायला हरकत नाही.
एक तारखेला पगार झाल्याबरोबर सर्वप्रथम मी साधू वासवानी चौकातील जनरलपोस्ट ऑफिसमध्ये जायचो. गावाकडे आई-वडिलांना घरी 40 रुपये मनी ऑर्डरने रवाना करायचो. माझ्या पाठची बहीण त्याकाळी कराड येथील कमला नेहरू कॉलेज येथे डी.एड्.चा कोर्स करीत होती. तिच्यासाठी महिना 35 रुपये कॉलेजच्या वसतीगृहाच्या पत्त्यावर पाठवायला लागायचे. एकूण काय, महिन्याची आवक होती 152 रुपये आणि खर्च होता साधारणपणे 120 रुपये. संपूर्ण महिना अगदी मनासारखा व्यवस्थितपणे पार पडत असे. महिना अखेरीस दहा वीस रुपये शिल्लक रहायचे. मन आनंदाच्या डोहात न्हाऊन जात असे ती शिल्लक बघून.
भूतकाळाच्या पोकळीतून बाहेर पडल्यावर मी वर्तमानात आलो. सारासार विचार करू लागलो. खरेच, गेले ते दिवस. आमची पिढी तत्कालीन तुटपुंज्या पगारातून बचत झालेले दहा-वीस रुपये पाहून हरखून जात असे. तो आनंदाचा ठेवा पाहून उल्हासित होत असे. तो आनंद आताच्या पिढीत का दिसत नाही? काय कारणे असतील या मागची? विचार करता करता मला उत्तरही सापडले या प्रश्नाचे.
साधारणपणे साठ वर्षांमागे ज्यावेळी मासिक वेतन दीडशे रुपये होते, त्यावेळी खानावळीसाठी महिना पंचवीस रुपये लागत. म्हणजे एकूण पगाराच्या सहाव्वा भाग जेवणाकरिता खर्च होत असे. आताच्या पिढीचे सरासरी वेतन पन्नास हजाराच्या आसपास ग्राह्य धरले तर याचा सहाव्वा हिस्सा येतो रुपये आठ हजार. महिन्याचा जेवणाचा खर्च एवढा येत नाही. मग महागाई खूप वाढली असे का म्हणतो आपण? उत्तर अगदी सोप्पे आहे. माणसाच्या गरजा वाढल्यात. त्या काळी आपल्या गरजा अत्यल्प होत्या. मोबाइल नावाच्या ब्रह्मराक्षसाचे आगमन झाले नव्हते. कधी कुणाला फोन करायचा झाला, तर आपण पोस्टात जाऊन एक रुपया खर्च करून बोलायचो. रस्त्यावर स्वयंचलित दुचाकी, चार चाकी गाड्यांची लगबग अतिशय कमी असायची. कुठे जायचं झालं तर माणसं सायकलचा वापर करीत असत.
बहुतेक प्रसंगी सिटी बस ने जाणे पसंत असायचे. घरात स्वयंचलित वाहन आले आणि पेट्रोल, डीझेलचा खर्च वाढला. बहुतेकांचे आयुष्य ऐषोआरामी बनले. चंगळवाद वाढला. तरुण पिढीचा कल व्यसनाधीनतेकडे जाताना आढळून यायला लागला. पुढे प्रत्येक घरात सुरुवातीला कृष्ण धवल आणि कालांतराने रंगीत टीव्ही संच दिसायला लागले. अगदी प्रारंभी केंद्र सरकारच्या एकाच वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित होत असत. पुढे खासगी वाहिन्यांचा सुळसुळाट झाला. या इडियट बॉक्स नामक यंत्राचा वापर रात्रंदिवस व्हायला लागला. परिणामी वीजबिल वाढले. थोडक्यात काय, तर महिन्याची आवक आणि खर्च यांचे प्रमाण व्यस्त झाले. कालानुरूप आपल्या प्रत्येकाच्या राहणीमानात बदल होणे अपरिहार्य आणि अपेक्षित असले तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. योग्य प्रमाणात व्यायाम, काटकसर, खर्चावर मर्यादा, अनावश्यक खरेदीला डच्चू यावर भर दिला गेलाच पाहिजे. असे झाले तरच पगारातून थोडीशी जरी बचत झाली तरी प्राप्त होणारा आनंद दीर्घकाल नव्हे तर चिरकाल टिकणारा असेल.
बबन पोतदार





