रूपगंध : ओझं अपेक्षांचं ओझं जबाबदारीचं

संध्याकाळची वेळ होती. रविवारचा दिवस असल्याने जरा आळसातच घालवला. मनात विचार आला जरा बाहेर फिरून येऊ म्हणजे ताजेतवाने वाटेल. घराजवळच्या टेकडीवर संध्याकाळी हवा छान असते. टेकडी चढायला सुरुवात केली. सहज शेजारी नजर गेली. एक आठ-दहा वर्षांची मुलगी एका लहान मुलाला आपल्या कडेवर घेऊन झरझर पावले टाकीत टेकडी चढत वर निघाली होती.
तिच्या अंगात सळसळता उत्साह होता. मला मागे टाकीत ती माथ्यावर पोहोचलीसुद्धा. मीही थोड्यावेळाने पोहोचलो. दुखणाऱ्या पायांना विश्रांती द्यायला कट्ट्यावर बसलो. पिशवीतून पाण्याची बाटली काढून पाणी प्यायलो अन् बघतो तर काय मघाची चिमुरडी बरोबरच्या लहानग्याशी खेळत होती. काही वेळानंतर त्यांचा खेळ संपला दोघेही माझ्या शेजारी येऊन बसले. दोघेही अगदी निरागस होते. मी खिशातून दोन चॉकलेट्स काढली. तिला विचारले “चॉकलेट खाणार?’ तिच्या चेहऱ्यावर बालसुलभ आनंद पसरला. तिच्या हातावर चॉकलेट ठेवीत मी विचारले.
“काय गं एव्हढं ओझं घेऊन टेकडी चढल्यावर तू दमली नाहीस?’
“ओझं, कोणतं?’ तिनं आश्चर्याने माझ्याकडे पाहिले.
“कडेवरचे’ मी उद्गारलो.
“ते ओझं नाही काका, तो तर माझा भाऊ आहे.’
तिच्या उत्तराने मी चपापलोच. वास्तविक पाहता तिच्या वयाच्या मानाने भावाला कडेवर घेऊन टेकडी चढायची, म्हणजे थोडं कठीणच होतं. पण कडेवर भावाला घेऊन ती आनंदात टेकडी चढून आली होती, त्यामुळे आपल्या कडेवर ओझं आहे याची जाणीवही तिला झाली नव्हती. आपणही एखादं काम आनंदाने पूर्ण करतो त्यावेळी ते ओझं राहात नाही. एव्हढं मात्र खरं.
वर्गात दरवर्षी पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांवर, त्याच्या आईवडिलांच्या, पहिला नंबर टिकवण्याच्या अपेक्षांचं ओझं असतं. त्यामुळे काहीवेळा तो विद्यार्थी अपेक्षेच्या ओझ्याखाली इतका दबून जातो की अभ्यासाशिवाय मनसोक्त खेळण्याच्या आनंदालाही पारखा होतो. मुलाचं अथवा मुलीचं शिक्षण पार पडून त्याला नोकरी मिळाली तर वरिष्ठांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर येऊन पडतं. काही वेळेला कंपनीने ठरवून दिलेली उद्दिष्टे येन-केन-प्रकारेन साध्य करावी लागताना नोकरदाराला जबाबदारीचं ओझं पेलवेनासे होते. काहींना तर निराशेच्या समस्येला तोंड द्यावे लागते.
लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीला सुरुवाती सुरुवातीला सासरकडच्या अपेक्षांचं ओझं उचलावं लागतं. गृहिणीपद भूषवणाऱ्या स्त्रीवर, रोज स्वयंपाक करताना कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या जिव्हा तृप्त करण्याची जबाबदारी असते. शाळा कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या व्यक्तीवर, चांगले विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी असते. काही शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णांचे प्रमाण 100 टक्के राखण्याची जबाबदारी असते तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचीही जबाबदारी शिक्षकांवर असते.
ओझं तनाचं असतं, ओझं मनाचं असतं, ओझं धनाचंही असतं. तनाचं ओझं वाढलं की डॉक्टरांची आणि जिमची मदत घ्यावी लागते. मनावरचं ओझं एका मर्यादेच्या बाहेर गेले तर मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेणं भाग पडतं. अवैध मार्गाने कमावलेल्या धनाच्या ओझ्याला रात्रीची झोप अर्पण करावी लागते. धनाची यथा-योग्य काळजी न घेतल्यास त्याला नको त्या वाटा फुटतात ते वेगळेच. तर अशी ही विविध प्रकारची ओझी माणसाच्या खांद्यावर जन्मापासूनच चढतात त्यांना व्यवस्थित पेलल्यास त्याचे रूपांतर आनंदात होते. पण प्रत्येकवेळी ते जमेलच असे नाही.
आता हेच पहा ना अभिनेता किंवा अभिनेत्रीला आपल्या प्रत्येक चित्रपटागणिक चाहत्यांच्या वाढत्या अपेक्षांचं ओझं बाळगावं लागतं. इतकेच काय क्रिकेटसारख्या खेळात लोकप्रिय खेळाडूंकडून प्रत्येकवेळी लोक शतकाची अपेक्षा ठेवून त्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकतात. डॉक्टरांवर रुग्णाला व्याधीतून मुक्त करावयाची जबाबदारी असते. राजकारणी माणसाला आपल्या कारकिर्दीत मतदारांच्या विविध, प्रसंगी अवाजवी, अपेक्षांच्या ओझ्याला तोंड द्यावे लागते. तर उतारवयात उत्तराधिकारी ठरवण्याच्या जबाबदारीचे ओझे पेलावे लागते. त्यात झालेली चूक नंतरच्या काळात महागही पडू शकते. स्टेशनवर अथवा मार्केटयार्डात काम करणाऱ्या हमालालाही संसाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी दररोज दुसऱ्यांची ओझी वाहावी लागतात.
थोडक्यात काय, अपेक्षा आणि जबाबदारीच्या ओझ्यातून सुटका होणं कठीण आहे. वाट्याला आलेली जबाबदारी आनंदाने पेलल्यासच तिचे ओझे वाटणार नाही तर त्यातून आनंदच मिळेल. नेमून दिलेले काम वेळेत केल्यास त्याचे दडपण वाढणार नाही.आता हेच बघाना लेखकालाही लेखन करताना वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या जबाबदारीचे ओझे असते. प्रत्येक वेळी ती पूर्ण होते असे नाही. म्हणून काय लेखन न करता जबाबदारी घ्यायची नाही असे नाही ना.
– विनायक ढवळे





