रूपगंध : औट घटकेची शस्त्रसंधी

इस्त्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचे वृत्त झळकले आणि जगाने सुटकेचा निश्वास टाकला. ४६७ दिवसांनी युद्ध संपण्याच्या आशेने इस्त्रायलच्या निर्वासितांच्या आप्तेष्टांनी आनंदोत्सव साजरा केला. आता आपली सुटका होईल, अशी स्वप्नं त्यांनी पाहिली; परंतु इस्त्रायलमधील नागरिकांचा उठाव, अमेरिकेतील अंतर्गत राजकारण यामुळे शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर अवघ्या १७ तासांतच ती मृगजळ असल्याचे समोर आले.
एखाद्या घरात आनंदाची चाहुल लागावी. त्याची वार्ता सर्वत्र पसरावी. कुटुंबात आंनदोत्सव साजरा व्हावा. पेढे वाटावेत. फटाके फोडावेत आणि अकस्मात गर्भपात झाल्याचे वृत्त यावे. यामुळे त्या कुटुंबाची जी अवस्था झाली असेल, तीच अवसथा सध्या इस्त्रायली नागरिक,हमास आणि अमेरिकेची वरील शस्त्रसंधी कराराच्या बाबतीत झाली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार अवघ्या १७ तासांत संपला.
या कराराला मंजुरी देण्यासाठी इस्रायलच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार होती; परंतु पंतप्रधान बेजांमिन नेतान्याहू यांनी बैठक घेण्यास नकार दिला आहे. त्याअगोदर बुधवारी रात्री १०:३० वाजता कतारच्या पंतप्रधानांनी माहिती दिली होती, की इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम आणि ओलिसांची सुटका यासंबंधीचा करार अंतिम झाला आहे.
इस्रायलच्या अध्यक्षांनीही कॅबिनेटला या कराराला मंजुरी देण्यास सांगितले होते; परंतु गुरुवारी दुपारी ३:३० वाजता ‘इस्रायल टाइम्स’ने हा करार मंजूर झाला नसल्याचे वृत्त दिले आहे. करार का झाला नाही, याचे खापर एकमेकांवर फोडण्याची आता स्पर्धा सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी असा करार झाल्याची घोषणा केल्यानंतर हा करार होऊ शकत नाही, असे नेत्यानाहू यांनी जाहीर करून एकप्रकारे बायडेन यांनाही जाता जाता तोंडघशी पाडले आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांची मैत्री आहे. बायडेन यांना कराराचे श्रेय जाऊ नये, म्हणून तूर्त करार मोडल्याची देखील एक चर्चा आहे. त्यावरून बायडेनही चांगलेच खवळले आहेत. हमास हा करारातील अटींपासून मागे हटल्याचा आरोप नेतान्याहू यांनी केला आहे. करार संपेपर्यंत हमास सवलतींची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. हमासच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
युद्धबंदीचे वृत्त समोर आल्यानंतर बुधवारी रात्री गाझामधील खान युनिसमध्ये पॅलेस्टिनींनी आनंदोत्सव साजरा केला. करारानुसार, युद्धबंदीचा पहिला टप्पा ४२ दिवसांचा असेल. पहिल्या टप्प्यात हमास हा ३३ इस्रायली ओलिसांची सुटका करणार होता. त्या बदल्यात इस्त्रायल हमासच्या २५० कैद्यांचीही सुटका करणार होता. तसेच इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून ७०० मीटर मागे हटणार होते.
कतारची राजधानी दोहा येथे गेल्या अनेक आठवड्यांपासून युद्धबंदीसाठी वाटाघाटी सुरू होत्या. त्यात इजिप्त आणि अमेरिकाही सामील होते. ‘अल जझीरा’च्या रिपोर्टनुसार, कतारचे पंतप्रधान थानी यांनी बुधवारी हमास आणि इस्रायलच्या प्रतिनिधींची भेट घेतली, त्यानंतर हा करार पूर्ण झाला. ओलिसांच्या पहिल्या टप्प्याच्या सुटकेनंतर १५ दिवसांनी हमास उर्वरित ओलिसांची सुटका करेल, असे ठरले होते.
दरम्यान, दोन्ही बाजू कायमस्वरूपी युद्धबंदीची चर्चा करतील, असेही ठरले होते. बायडेन आणि ट्रम्प यांनी बुधवारी युद्धबंदीचे श्रेय घेतले. या करारात ‘व्हाईट हाऊस’ने ट्रम्प यांच्या प्रतिनिधीचाही समावेश केला होता. ‘सोशल मीडिया’वर पोस्ट करताना ट्रम्प म्हणाले, की अध्यक्षीय निवडणुकीत आमच्या विजयामुळे हा ऐतिहासिक करार शक्य झाला. हा करार माझ्या प्रशासनाच्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा पुरावा आहे, तर बायडेन यांनी ‘व्हाईट हाऊस’मधील त्यांच्या शेवटच्या भाषणात या कराराचा उल्लेख करताना म्हटले होते, की युद्धविरामासाठी आमचे राजनैतीक प्रयत्न कधीच थांबले नाहीत.
हमासवर वाढता दबाव, प्रादेशिक समीकरणं बदलणे आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम यानंतरच हा करार शक्य झाला. हा अमेरिकेच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे. युद्धविराम करारानुसार इस्रायल उत्तर गाझामधून विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना परत येण्याची परवानगी देईल; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या भागात इस्रायली सैनिकांची उपस्थिती राहू शकते. गाझा आणि इस्रायलमध्ये बफर झोन तयार केला जाईल, असे ठरले होते.
इस्रायल आणि हमास या दोघांच्याही बफर झोनबाबत वेगवेगळ्या मागण्या होत्या. इस्रायलने सीमेपासून दोन किलोमीटरच्या बफर झोनची मागणी केली होती, तर हमासला ऑक्टोबर २०२३ पूर्वीप्रमाणे ३०० ते ५०० मीटरचा बफर झोन हवा होता. दुसरीकडे, इस्रायलने या करारांतर्गत हमास प्रमुख याह्या सिनवार यांचा मृतदेह परत करण्यास नकार दिला आहे. हमासचे वरिष्ठ नेते खलील अल-हय्या यांनी युद्धविरामावर प्रतिक्रिया व्यक्त करताना याला इस्रायलचा पराभव असल्याचे म्हटले.
‘टाईम्स ऑफ इस्रायल’च्या रिपोर्टनुसार, खलील यांनी सात ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचे कौतुक केले आणि याला मोठी उपलब्धी म्हटले. भावी पिढ्यांना ते अभिमानाने सांगितले जाईल, असे ते म्हणाले. करारानुसार, पहिल्या टप्प्यात ४२ दिवसांत ३३ ओलिसांची सुटका होईल. ओलिसांमध्ये समाविष्ट असलेल्या महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
या करारांतर्गत मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास ते तयार असल्याची पुष्टीही इस्रायलने केली होती. या कराराच्या पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात येणार होती. मोठी किंमत मोजून हे पाऊल उचलले जात असल्याचे इस्रायलचे म्हणणे होते. त्याचवेळी हमासच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे, की या काळात अनेक वर्षांपासून तुरुंगात असलेल्या लोकांना इस्त्रायल सोडणार आहे.
युद्धबंदी अंतर्गत, गाझामधून इस्रायली सैन्याची अंशतः माघार होणार होती. तथापि, कैद्यांची देवाणघेवाण आणि विस्थापित लोकांचे परतणे सुनिश्चित करण्यासाठी सैन्य सीमावर्ती भागात आपले स्थान कायम ठेवणार होते. पुढच्या टप्प्याची तयारी पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर १६ व्या दिवशी दुसऱ्या टप्प्यासाठी वाटाघाटी सुरू होतील. या करारावर देखरेख ठेवण्यासाठी कतार, अमेरिका आणि इजिप्तचे संयुक्त पथकही तैनात केले जाणार होते.
युद्धबंदी कराराच्या बाबतीत इस्त्रायलचा पूर्वीचा अनुभवही चांगला नाही. नेतान्याहू यांनी यापूर्वी जेव्हा करार झाला होता, तेव्हाही त्यावर असहमती दाखवून तो मोडला होता. आताही हमाससोबतचा युद्धविराम करार अद्याप पूर्ण झालेला नाही आणि त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. असे त्यांनी सांगितले होते. नेतान्याहूंच्या या वक्तव्याच्या काही तास अगोदर अमेरिका आणि कतारने युद्धविराम कराराची घोषणा केली होती. नंतर युद्धविराम कराराची बैठकच झाली नाही.
हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला. त्यात १२०० हून अधिक लोक मारले गेले आणि २५० हून अधिक लोकांना ओलिस ठेवले. इस्रायलने त्याला निर्दयपणे प्रत्युत्तर दिले. त्यात ४६ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. याव्यतिरिक्त, गाझाची अंदाजे ९० टक्के लोकसंख्या विस्थापित झाली. त्यामुळे आपत्तीजनक मानवतावादी संकट निर्माण झाले होते. इस्रायल आणि हमास यांच्यात १५ महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी आणि गाझामध्ये ओलिसांना सोडवण्यासाठी करार झाला, तेव्हाच त्याचे यश इस्रायल आणि हमास यांच्या सद्भावनेने वागण्यावर अवलंबून असेल, असे सांगितले गेले.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी कट्टरवादी गट हमास यांच्यातील संघर्ष विळ्या भोपळ्याच्या नात्या प्रमाणे आहे. गाझा पट्टीवर राज्य करणाऱ्या हमासला दहशतवादी संघटना म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. हमासचा उद्देश इस्रायलचे अस्तित्व संपविणे हा आहे. या संघर्षाचा इतिहास सखोल आणि गुंतागुंतीचा आहे. त्यात असंख्य युद्धं, संघर्ष आणि मतभेद आहेत. इस्रायल-हमास युद्धाची मुख्य कारणे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात जमीन, धार्मिक स्थळं आणि स्वातंत्र्य ही आहेत. १९४८ मध्ये इस्रायलची स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्थापना झाल्यापासून पॅलेस्टिनींसाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती ही तेव्हा युनोने मान्य केली होती.परंतु ती अंमलात कधी आली नाही.
प्रत्येक वेळी झालेल्या युद्धात इस्त्रायलल आपली सीमा विस्तारण्याची संधी मिळाली.युद्धात जिंकलेला अरब भूभाग परत करायला इस्त्रायल तयार नाही.या भूमीवर इस्त्रायलचा ताबा हा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वैद्य नाही.त्याला या कायद्याचे पालन करण्यास बाध्य करणे आंतरराष्ट्रीय समुदायाला अद्याप जमलेले नाही. वादाचा हा प्रमुख मुद्दा आहे. २००७ पासून गाझा पट्टीवर हमासचे नियंत्रण आहे, तर वेस्ट बँकवर फतह पक्षाची सत्ता आहे. दोन गटातील अंतर्गत वादामुळे हा परिसर संघर्षाचे केंद्र बनला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात तीव्र धार्मिक मतभेद आहेत, विशेषतः जेरुसलेमच्या धार्मिक महत्त्वावरून. हे शहर ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिमांसाठी पवित्र आहे आणि त्याच्या नियंत्रणावरून वारंवार संघर्ष होत आहे.
इस्रायल हमासच्या स्थानांवर नियमितपणे बॉम्बफेक करतो आणि गाझा पट्टीमध्ये लष्करी कारवाया करतो, परिणामी नागरिकांचा मृत्यू आणि मालमत्तेचा नाश होतो. संघर्षाच्या काळात दोन्ही बाजूंनी मानवी हक्कांचे उल्लंघन होत असते. इस्रायली हवाई हल्ले आणि हमासच्या रॉकेट हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू होतो आणि कधीकधी रुग्णालये, शाळा आणि इतर नागरी संरचनांचे नुकसान होते. दोघांमध्ये युद्धविरामासाठी अनेक प्रयत्न झाले; पण ते फार काळ टिकले नाहीत. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या वतीने शांततेसाठी प्रयत्न सुरूच आहेत; परंतु अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.
इस्रायल-हमास संघर्ष हा एक जटिल आणि दीर्घकालीन संघर्षाचा भाग आहे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी राजकीय, धार्मिक आणि ऐतिहासिक तडजोड आवश्यक आहे. पॅलेस्टाईनचे स्वातंत्र्य आणि इस्रायलची कथित सुरक्षा या दोन्हीना गंभीर समस्या म्हणून पाहिले जात आहे. त्यावर उपाय शोधणे हे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मोठे आव्हान आहे.हमासचा आश्रयदाता असलेला इराण देशांतर्गत व बाह्य आव्हानांनासामोरे सामोरे जात असल्याने तो तूर्तास तरी या हमासच्या उघडपणे समर्थनात दिसत नाही.
इराण विषयी पूर्वग्रहदूषित भूमिका असलेले डोनाल्ड ट्रंफ यांचे सत्तेतील पुनरागमन इराणच्या हमास सह अन्य प्रॉक्सी संघटनांना वेसण घालण्यास पुरेसे आहे.इस्रायलला नव्हे तर हमासला चर्चेच्या टेबलावर नेमस्त भूमिका घ्यायला लावून युद्ध बंदीचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यासाठीच नेत्यानाहू यांनी फिरकी मारल्याचे दिसत आहे .
– आरिफ शेख





