रूपगंध : कुंभमेळ्याचे अमृतपर्व

कुंभमेळ्याच्या रुपाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा मेळावा संपन्न होत आहे. भारताशिवाय इतरत्र कुठेही असा कार्यक्रम आयोजित केला जात नाही किंवा लोकांचा इतका असीम उत्स्ङ्गूर्त सहभागही दिसत नाही. एका दिवसात कोट्यवधी लोक एकाच ठिकाणी जमतात, तेही आमंत्रणाशिवाय; ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. हा ट्रेंड आजच्या दळणवळणाच्या आणि वाहतुकीच्या युगातला नाही तर जेव्हा कुठल्याच सोयीसुविधा नव्हत्या तेव्हापासून चालत आला आहे. कितीही संकटे आली तरी कुंभ नेहमी ठरलेल्या वेळी आणि ठिकाणी घडतो. लाखो लोकांसाठी, कुंभमेळ्यात सहभागी होणे ही केवळ तीर्थयात्रा नाही, तर शाश्वत अध्यात्माच्या मुळांकडे परत जाणे, एकता, शुद्धीकरण आणि मोक्षाकडे वाटचाल अंतिम मुक्तीचे प्रतीक आहे.
हिंदू धर्मियांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जाणारा कुंभमेळा यंदा 13 जानेवारी ते 26 ङ्गेब्रुवारी या काळात उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे संपन्न होणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमावर लाखो भाविक या उत्सवाला उपस्थित राहून आशीर्वाद घेतील आणि पवित्र स्नानाचे पुण्य मिळवतील. हा जगातील सर्वात मोठा सोहळा म्हणून ओळखला जातो. भारत वगळता अन्यत्र कोठेही एवढ्या प्रचंड प्रमाणात मेळ्याचे आयोजन होत नाही आणि एवढ्या उस्ङ्गूर्ततेने नागरीकही अशा प्रकारे सहभागी होत नाहीत.
कुंभमेळ्याला एका दिवसात कोट्यवधी भाविक एकाच ठिकाणी येतात आणि तेही निमंत्रणाशिवाय ! ही अचंबित करणारी गोष्ट आहे. विशेष म्हणजे आजच्या आधुनिक काळात दळणवळणाच्या सुविधांची विपुल उपलब्धता आहे. परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा अस्तित्वातच नव्हत्या त्या काळापासून भाविकांचा महापूर कुंभमेळ्यात पहावयास मिळालेला आहे. त्यामुळेच कुंभमेळा हा ऐतिहासिक आणि ‘ न भूतो..न भविष्यती’ असा असतो. अत्यंत आश्चर्यकारक परंपरा, रीतीरिवाज आणि प्रथांची प्रचिती कुंभमेळ्यामध्ये येते. कितीही संकटे आली तरी कुंभमेळा हा ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या ठिकाणी बिनदिक्कतपणे पार पडतो. दुष्काळ असो, उपासमारीचे सावट, महासाथ, नैसर्गिक आपत्ती, कोरोना यासारखी कितीही संकट आले तरी कुंभमेळ्याने आपली परंपरा जोपासली आणि भाविकांना अमृतअनुभव दिला.
कोट्यावधी जनतेसाठी कुंभमेळ्यात सहभागी होण्याचा अर्थ हा केवळ परंपरेचे पाईक होण्यापुरता मर्यादित नाही तर सनातन आणि अध्यात्मिकतेची पाळेमुळे घट्ट करणे आणि तो वारसा घेऊन परतणे असा आहे. हा कुंभमेळा एकार्थाने ऐक्यभाव, पावित्र्याची जपणूक आणि मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करण्याचा मार्ग आहे. कुंभमेळ्याचा समृद्ध इतिहास हा भाविकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरतो. ती एक अध्यात्मिक अनुभूती आहे.
समुद्रमंथानातून बाहेर निघालेला अमृताचा थेंब शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाची दोरी आणखी बळकट करण्यासाठी मानवीसमाज त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जमतो. तो क्षण साधताना मेळ्याचे आकर्षण ही बाब त्याच्यासाठी दुय्यम राहते. आता हळूहळू अध्यात्मिकेतेचे आकर्षण भाविकांवर लादले जात असले आणि याच आकर्षणाला अध्यात्माप्रमाणे महत्त्व दिले जात असले तरी यामुळे कुंभमेळ्याचे मर्म अबाधित आहेत.
अर्थात बदलत्या काळानुसार कुंभमेळ्यातही आता बदल घडत आहे. यंदा प्रयागराजमध्ये भरणार्या कुंभमेळ्यामध्ये भाविकांना राहण्यासाठी आलिशान टेंट आहेत. या टेंटचे एक दिवसाचे भाडे लाखांपर्यंत आहे. तेथे पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा आहेत. पायी चालण्याची गरज भासू नये यासाठी गोल्ङ्ग कार्ट आहे. स्वादिष्ट भोजनाचे मेन्यू आहेत. प्रयागराजला पोहोचण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून विमानसेवा सुरू केली आहे. विशेष बडदास्त ठेवली जात आहे. संगमावर स्नान करण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. मेळा आणि अमृत कुंभ याचा अनुभव घेताना भाविकांना थोडाही त्रास होणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी आयोजकांकडून घेतली जात आहे. प्रयागराज आणि महाकुंभ स्थळावर 2,300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, जेणेकरून नियंत्रण केंद्रांच्या माध्यमातून लोकसंख्येची घनता विश्लेषण, गर्दी नियंत्रण, घटनेचे वार्तांकन आणि स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.
गोंगाटापासून दूर, अध्यात्मिक शांततेचा अनुभव प्रदान करणार्या जागेवर राहण्याची, खाण्याची आणि आरामाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ङ्गक्त पैसे पाहिजेत. ते नसेल तर सरकारकडून बिल भरण्यात येणारा व्हिआयपीचा टॅग हवा. बड्या कंपनीचे सीईओ, उद्योगपती यांच्याबरोबरच सरकारसाठी जे अतिमहत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी कॉर्पोरेट सुविधा केली आहे. हे एक वेगळेच ठिकाण आहे. या महाकुंभात अमृत थेंबाची विशेष सोय केली आहे.
ही झाली एक बाजू. यापलिकडे आणखी एक प्रचंड जग आहे. कुंभमेळ्याचे स्वप्न बाळगून असणार्यांच्या झोपड्या लाखो रुपये मोजून आलिशान कॉटेजचा अनुभव प्रदान करणार्यांच्या तुलनेत अलौलिक अनुभव देतात. कडाक्याच्या थंडीची रात्र, शीत लहर याचा कोणताच परिणाम त्यांना जाणवत नाही. संगमाच्या किनार्यावर असलेल्या जनमसुदायांना कोणतीही टेंट सिटी महत्त्वाची वाटत नाही आणि त्यांना संगमाचे पवित्र पाणी आणि डुबकी महत्त्वाची वाटते. नदीकाठच्या वाळूतून अनेक किलोमीटर अनवाणी चालण्याचा अलौकिक आनंद त्यांना घ्यावयाचा असतो. आखाड्याच्या पंगतीतील डाळ भात, भंडार्यातील पोळी आणि भात या गोष्टी त्यांना जमीनीवर असल्याचे दाखवून देतात. कुंभमध्ये सहभागी हेाणार्या किंवा काम करणार्या कोट्यवधी भाविकांना निमंत्रणाची गरज नाही. गावागावातील प्रमुखांकडून निमंत्रण पत्रिका देण्याची देखील गरज भासत नाही. कुंभमेळा हा कोणा एकाचा नाही, तो सर्वांचाच आहे. तेथे कोणालाही बोलावले जात नाही. जनसमुदाय स्वत:चा पैसा खर्च करून , धक्काबुकी सहन करत या भूमीवर दाखल होतो आणि तसाच तो शांतपणे निघूनही जातो. कारण कुंभ म्हणजे पर्यटन नाही तर ती एक अलौकिक अध्यात्मिक यात्रा आहे.
सर्वसामान्य आणि व्हीआयपी अशा दोघांसाठी कुंभचे जग वेगवेगळे असले तरी त्यापासून उत्पन्न घेणार्यांसाठी कुंभमेळा हा एक व्यवसायाची मोठी संधी आहे, मेगाइव्हेंट आहे. तुम्हीच विचार करा. कोट्यवधी लोक इथे येतात तेव्हा वाहतूक, मुक्काम, खाणेपिणे, औषधोपचार आदी कितीतरी गोष्टी त्यांच्याशी जोडलेल्या असतात.
महाकुंभ 2025 च्या आयोजनासाठी उत्तर प्रदेश सरकारने 5,435.68 कोटी रुपयांचे मोठे बजेट ठेवले आहे. 2019 मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या 4,200 कोटी रुपयांच्या बजेटपेक्षा हे जास्त आहे. एकूणच या महासोहळ्यासाठी सुमारे 7,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रकमेत केंद्र सरकारच्या योगदानाचाही समावेश असून केंद्राने या कार्यक्रमासाठी 2,100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
भारतीय उद्योग महासंघाच्या आकडेवारीनुसार, 2019 च्या कुंभमेळ्यात एकूण 1.2 लाख कोटी रुपयांची कमाई झाली होती. तर 2013 मध्ये हा आकडा सुमारे 12 हजार कोटी रुपये इतका होता.
आता 2025 चा कुंभ गतवेळीपेक्षा मोठा होत आहे. मागच्या वेळी 25 कोटी भाविक कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. यंदा ही संख्या 40 कोटींवर जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. याचाच अर्थ भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे एक तृतियांश लोकसंख्या या महापर्वाला येण्याची शक्यता आहे. यामुळे उद्योगविश्व प्रयागराज येथे ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर किमान 3000 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी करत आहेत. परिणामी, हा व्यवसायाचा देखील महाकुंभ असणार आहे आणि त्याच्या अमृतापासून कोणीही वंचित राहू इच्छित नाही. राजकीय नेते, पक्ष, सरकार किंवा विरोधक असे सर्वच जण कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपापले ब्रँडिंग करण्याच्या कामाला लागले आहेत.
हीच दृष्टी आणि दृष्टीकोन हा कुंभमेळ्याला महाकुंभाचे स्वरुप देतो. त्यांना महाकुंभाच्या सनातन परंपरेशी काही देणेघेणे नाही. सनातन परंपरा कुंभमेळ्यातच थांबते. कारण समुद्रमंथनातून कुंभ बाहेर पडला, महाकुंभ नाही. कुंभ हा जीवनानुभूती घेण्याची संधी देते. इथे संपूर्ण भारत आणि संपूर्ण सनातनचे साक्षात दर्शन घडते. कुंभ हा एका शब्दात, चित्रात, व्हिडिओ, इंटरनेटने व्यक्त करता येत नाही. कुंभमेळ्याच्या माध्यमातून व्यवसाय होत असला तरी कुंभ हा व्यवसाय होऊ शकत नाही. लाखो लोकांसाठी, कुंभमेळ्यात सहभागी होणे ही केवळ तीर्थयात्रा नाही, तर शाश्वत अध्यात्माच्या मुळांकडे परत जाणे, एकता, शुद्धीकरण आणि मोक्षाकडे वाटचाल अंतिम मुक्तीचे प्रतीक आहे.
– योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक, लखनऊ





