रूपगंध : दुर्मीळ उस्ताद

उस्ताद झाकिर हुसेन यांच्यासारखे कलाकार दुर्मीळ असतात. संगीत क्षेत्राला नवी उंची आणि एक ओळख देणारे तबलावादक म्हणून त्यांची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे. मी, पंडित शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकिर हुसेन या त्रिकुटावर संगीतरसिकांनी अपार प्रेम केले. झाकीर यांच्या तबलावादनाबाबत मी काही बोलण्याची गरज नाही, कारण तबल्यावर पडणारा त्यांचा हात, त्यातून उमटणारा नादमधुर झंकार आणि त्याने मंत्रमुग्ध होणारे, स्तीमित होणारे, समरसून जाणारे चाहते हा विलक्षण स्वर्गसोहळा देश-विदेशातील कार्यक्रमांमधून असंख्य वेळा पाहायला मिळाला आहे. झाकीर यांच्या कृतीत त्यांची अङ्गाट विचारशक्ती आणि तितकीच प्रगल्भ आकलनक्षमता प्रतिबिंबत व्हायची. प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने समजून घेऊन करणे हा त्यांचा मूलतः स्वभाव होता. इतक्या उंचीवर पोहोचूनही झाकीर सहकलाकारांना उत्साहाने प्रतिसाद देत असत.
गेल्या पाच ते सहा दशकांपासून ज्यांच्या जादुई बोटांनी तबल्याचा नाद आसमंतात घुमला त्या उस्ताद झाकीर हुसेन यांनी जगाचा निरोप घेतला, यावर अजूनही विश्वास बसत नाही. एवढ्या लहान वयात कोणी कसा जाऊ शकतो आणि तोही ज्याचा श्वास ङ्गक्त तबला, ताल आणि रागात होता ! त्यच्या जाण्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताची मोठी हानी झाली आहे. उस्ताद झाकिर हे माझ्यासाठी केवळ तबला वादक किंवा संगीतकार नव्हते. ते माझे सहकारी होतेच पण त्याहीपेक्षा माझ्या कुटुुबीयांतील एखाद्या सदस्यांपैकी एक होते. दीर्घकाळापासून माझा त्यांच्याशी स्नेह राहिला. अगदी सांगितिक आणि वैयक्तिक आयुष्यातही. लहान असल्यापासून ते आमची साथसंगत करत होते.
बालपणी झाकिर हे वडिल उस्ताद अल्ला रख्खा खान साहेब यांच्यासोबत माझ्याकडे येत असत. त्याकाळात अल्लारख्खा खान आणि मी सिनेसंगीतामध्ये काम करत होतो. तो काळ वेगळा होता. त्यावेळी अल्लारख्खासाहेब माझ्याकडे राहात असत. झाकीरही त्यांच्यासोबत राहायचा. त्याच्याकडे पाहून हा मुलगा भविष्यात जागतिक किर्तीचा तबलावादक होईल आणि प्रचंड लोकप्रियता त्याच्या तबलावादनाला लाभेल, असा कुणी विचारही केला नव्हता. कालांतराने अल्लारख्खा खान साहेबांप्रमाणेच झाकिर हुसेनदेखील माझ्यासमवेत साथसंगत करू लागले.
तबला हे तालवाद्य अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले. सोळाव्या शतकाच्या दरम्यान उत्तर भारतीय संगीतात त्याची स्वीकृती वाढू लागली. घराणा संगीताच्या प्रवर्तकांनी कथ्थकसारख्या नृत्यशैलीतील साथीसाठी तबल्याला योग्य मानले. पुढे तबला संगीताच्या शास्त्रीय शैलीमध्ये औपचारिकपणे स्वीकारला गेला. हळूहळू गायकाचा आवाज, सतारीचा स्वर, बासरीचा सूर आणि तबल्याचा नाद यामध्ये ङ्गरक करणं कठीण होऊन गेलं. यालाच तबल्याची जादू म्हणतात. तबल्याच्या या जादूमध्ये उस्ताद झाकीर हुसेन निपुण होते. झाकीर यांच्या तबलावादनाने गायकांच्या साथीचा एक वेगळा इतिहास तर निर्माण केलाच; पण एकल वादन म्हणूनही तबल्याला मुख्य प्रवाहात आणले.
तबल्याच्या शास्त्राच्या रथावर स्वार झालेला हा महारथी संगीत आणि साथीच्या दुनियेत दिग्विजय बनला. हुसेन साहेबांनी तबलावादनातील बारकावे अभ्यासाने, निरीक्षणाने आत्मसात केले. झाकीर हुसेन यांनी तबल्याच्या फ्युजनवरही खूप काम केले. अमेरिकन जॅझमध्ये एकाच वेळी अनेक इलेक्ट्रॉनिक आणि आधुनिक वाद्यांच्या ध्वनींमुळे एक लहर निर्माण होते. पण हुसेन साहेबांना प्रत्येक तालानंतर एक जागारिकामी वाटली, जणू काही तिथे काहीच नाही, शून्यपोकळी.. ती जागा त्यांनी तबल्याच्या नादाने अतिशय बेमालूमपणे भरून नेली आणि त्यातून एक अद्भुत जुगलबंदी आकाराला आली.
झाकीर अतिशय लिलया पद्धतीने तबलावादन करत असत. माझ्या साथसंगतीत अनेक कलाकार असायचे. मात्र माझी अणि झाकिर हुसेनची जोडी ही प्रेक्षकांना खूप आवडली. गावांत, शहरांत, दिल्लीत, कोलकता येथे, अमेरिका, लंडनमध्ये, जगभरात प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यक्रम झाले आणि गाजलेही ! आम्ही अनेकदा एकत्र राहिलो. कधी मी गाडी चालवायचो तर कधी झाकिर चालवायचे. एकत्र जेवण करायचो आणि एकत्रच सराव करायचो. व्यासपीठावरून उतरताच आम्ही मोटारीत बसायचो आणि दुसर्यंा शहराकडे रवाना व्हायचो. एकेकाळी आम्ही खूप दौरे आणि कार्यक्रम केले.
प्रामुख्याने आम्ही एका शहरातून दुसर्या शहरांत मोटारीतूनच जाणे पसंत करायचो. यामागचे कारण म्हणजे एकतर सहवास लाभायचा आणि विमानाचा खर्च देखील वाचायचा. त्यावेळी झाकीर यांच्यामध्ये असणारे तबल्याविषयीचे कुतुहल सदोदित जाणवायचे. त्यावरुन झाकीर तबला अक्षरशः जगला असे म्हणता येईल. त्याच्या वियोगाचे दुःख इतके प्रचंड आहे की किती आठवणींना उजाळा द्यायचा असा प्रश्न पडतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे झाकीर यांच्या तबलावादनाबाबत मी काही बोलण्याची गरज नाही. तबल्यावर पडणारा त्यांचा हात, त्यातून उमटणारा नादमधुर झंकार आणि त्याने मंत्रमुग्ध होणारे, स्तीमित होणारे, समरसून जाणारे चाहते हा विलक्षण स्वर्गसोहळा देश-विदेशातील कार्यक्रमांमधून असंख्य वेळा लोकांनी पाहिला आहे. त्यापलीकडे जाऊन वैयक्तिक आयुष्यातही तो तबल्यासारखाच उत्साही असायचा.
मी, पंडित शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकिर हुसेन या त्रिकुटावर संगीतरसिकांनी अपार प्रेम केले. आयोजकांनीही आम्हाला मोठ्या प्रमाणावर संधी दिल्या. कधी आमचे तिघांचे एकत्र कार्यक्रम व्हायचे, तर कधी माझे आणि झाकिरचे तर कधी शिवकुमार आणि झाकिर यांचे. आम्हा सर्वांना खूप लोकप्रियता मिळाली. आम्ही एकत्रितपणे आल्बमही काढले. कलाकारांची मने एकमेकांशी जुळतात तेव्हा अशा गोष्टी घडतात.
झाकिर यांची आणखी एक गोष्ट मला खूप आवडायची. ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायचे. त्यांच्या कृतीत त्यांची अङ्गाट विचारशक्ती आणि तितकीच प्रगल्भ आकलनक्षमता प्रतिबिंबत व्हायची. ते संगीताविषयी काही बोलत असतील, साथ देत असतील, तबलावादन करत असतील तर ते प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने समजून घेऊन करत. हा त्यांचा मूलतः स्वभाव होता. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, लोकप्रसिद्धीच्या, रसिकांच्या प्रेमाच्या, यशाच्या इतक्या उंचीवर पोहोचूनही झाकीर सहकलाकारांना उत्साहाने प्रतिसाद देत असत.
तबलावादनाबाबत ते बोलत असतील, स्वत:बाबत काही गोष्टी सांगत असतील, कुटुंबाबाबत किंवा अन्य तबलावादकाविषयी बोलत असतील तर खूपच विचारपूर्वक मत मांडायचे. त्याच्या बोलण्यातील नम्रभाव विलक्षण अनुकरणीय होता. कलेचं सामर्थ्य केवळ सादरीकरणात नसतं. ती कला अंतरंगातून व्यक्तिमत्व समृद्ध करणारी असते. त्या कलेसाठीच्या समर्पणातून नम्रता, लीनता, सहृदयता हे गुणविशेष अंगी येतात. झाकीर हुसेन, अल्लारख्खासाब यांसारख्या कलावंतांकडे पाहिल्यानंतर याची पदोपदी प्रचिती येत असे. अगदी नव्यानं गायनाच्या क्षेत्रात आलेल्यांनाही झाकीरनी साथ दिली. पण ती देत असताना कुठेही आपले मोठेपण दाखवण्याचा दर्प त्यांच्यात दिसला नाही. उलट त्या नवोदिताला सांभाळून घेत त्यांनी साथ दिली. ही बाब कलाक्षेत्रातील सर्वांसाठीच अनुकरणीय आहे.
म्हणूनच मला वाटते की, उस्ताद झाकिर हुसेनसारखे कलाकार दुर्मीळ असतात. आपल्या अवीट, माधुर्यपूर्ण तबलावादनातून त्यानं रसिकांची मनेच जिंकली नाहीत तर त्यांच्या अंतरात्म्याला स्पर्श केला. वाद्यसंगीतातील या वाद्याची जादू किती अप्रतिम आहे हे सार्या जगाला दाखवून दिलं. हे त्यांचं योगदान ऐतिहासिक आहे. संगीत क्षेत्राला नवी उंची आणि एक ओळख देणारे तबलावादक म्हणून त्यांची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग होता.
झाकीर हुसेन हे प्रयोगशील तबलावादक होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी तबलावादनात अनेक प्रयोग केले. अगदी भारतीय संगीतकारांसोबत आणि परदेशी संगीतकारांसोबतही. काही काळापूर्वीच त्यांच्या अशाच अनोख्या प्रयोगात्मक संगीताला बहुचर्चित ग्रॅमी पुरस्काराने गौरविण्यात आले. बराच काळ एकत्र राहिल्याबद्दल मला मनस्वी आनंद आणि समाधान वाटते. त्याच्या सहवासाने, साथीने मला आत्मिक समाधान दिले. परंतु मला एक खंत नेहमी वाटत राहिल की त्यांच्या अस्वस्थेतेचे कारण शेवटपर्यंत समजले नाही. बर्याच काळापासू ते एका व्याधीचा सामना करत असूनही त्यांनी यासंदर्भात पुसटशी कल्पनाही मला दिली नाही. त्यांनी मला सांगायला हवे होते. भारतातील काही कार्यक्रम ते रद्द करत असल्याचे मला समजले होते. त्यांचे कुटुंब अमेरिकेत असल्याने तेथे राहण्याचा निर्णय योग्य होता. पण त्यांचे अशा प्रकारे जाणे क्लेषदायक आहे. आधी पंडित शिवकुमार शर्मा गेले आणि आता झाकिरनेही जगाचा निरोप घेतला.
– पं. हरीप्रसाद चौरासिया,विश्वविख्यात बासरीवादक





