Rupee Vs Dollar: आखाती युद्ध समाप्तीच्या संकेतांमुळे रुपया वधारला; डॉलर 92.85 रुपयांवर
Rupee Vs Dollar: पंधरा दिवसापूर्वी रुपयाचा भाव 96 रुपये प्रति डॉलर यां नीचांंकी पातळीवर गेला होता.

Rupee Vs Dollar: आखाती युद्ध संपुष्टात येण्याची लक्षणे वाढली असल्यामुळे डॉलर कमकुवत होत आहे. रिझर्व्ह बँकेने तेल कंपन्यांना स्पॉट मार्केटमधून डॉलर खरेदी टाळण्याचा सल्ला दिला आहे. या कारणामुळे शुक्रवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 29 पैशांनी वधारून रुपयाचा भाव 92.85 रुपये प्रति डॉलर या पातळीपर्यंत वाढला होता.
गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने व्यवसायिक बँकांच्या डॉलर व्यवहाराला मर्यादा आणल्यामुळे रुपयाच्या मूल्यात बरीच सुधारणा झाली होती. पंधरा दिवसापूर्वी रुपयाचा भाव 96 रुपये प्रति डॉलर यां नीचांंकी पातळीवर गेला होता. त्यामध्ये आता बरीच सुधारणा झाली असल्याचे दिसून येते. रिझर्व्ह बँकेने तेल कंपन्यांना स्पॉट मार्केटमधून डॉलर खरेदी टाळण्याचा सल्ला दिला आहे. तेल कंपन्या आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलर बाळगत असतात.
रिझर्व्ह बँकेने या तेल कंपन्यांना स्वतः स्पॉट मार्केटमधून डॉलर खरेदी करण्याच्या ऐवजी स्टेट बँकेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या क्रेडिट लाईनचा वापर करण्याचा सल्ला दिला असल्याचे वृत्त काही वृत्त संस्थांनी सूत्राचा हवाला देऊन दिले. त्यानंतर रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाली.
ज्या कारणामुळे रुपयाचे मूल्य कोसळले होते ते आखाती युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता वाढलेली आहे. पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराणदरम्यान चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानी अधिकार्यांनी इराणमध्ये जाऊन पुन्हा चर्चा केली आहे. इस्त्रायल आणि लेबनानदरम्यान युद्धबंदी झालेली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता मावळत आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यापासून शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत.
एकूणच आता युद्ध आता इतिहास जमा होणार असल्याची जास्त लक्षणे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यानंतर आणि डॉलर कमकुवत झाल्यानंतर रुपया आपोआपच बळकट होण्याची शक्यता आहे. भारत- ब्रिटन व्यापार कराराची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून होणार आहे. महिनाअखेरीस भारत- अमेरिका व्यापार करार होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर रुपयाला आणखी आधार मिळू शकेल असे समजले जात आहे.





