मुंबई – इतर जागतिक चलनाच्या तुलनेत डॉलर वधारत असतानाच भारत मोठ्या प्रमाणात आयात करीत असलेल्या खनिज तेलाच्या दरात बरीच वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारी रुपयाचा भाव 14 पैशांनी कोसळून 86 रुपये प्रति डॉलर या ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला. रुपयाला आधार देण्यासाठी रिझर्व बँक डॉलर विकत असल्यामुळे भारताकडील परकीय चलन गंगाजळीतही वेगाने घट होत आहे. भारताची स्थूल अर्थव्यवस्था कमकुवत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी कमी होत आहेत. याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर येत आहे. जागतिक पातळीवर दोन युद्ध चालू असल्यामुळे आणि अमेरिकेचे निवडून आलेल्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्यापार युद्धाची भाषा करीत असल्यामुळे डॉलर एकतर्फी वधारत आहे. सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सध्या 109 अंकावर गेला आहे. एक महिन्यापूर्वी हा निर्देशांक 100 अंकाच्या खाली होता. त्यामुळे इतर चलनाप्रमाणेच भारतीय रुपयाचे वेगात अवमूल्यन होत आहे. रुपया घसरत असल्यामुळे भारताला आयात महागात पडत आहे. त्यातल्या त्यात खनिज तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारताला या आयातीसाठी अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत इंधनाचे दर वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर तसे झाले तर वाहतुकीचा खर्च वाढून भारतात महागाई वाढण्याचा धोका आणखी निर्माण होऊ शकतो असे चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले. दरम्यान डॉलर बळकट होत असल्यामुळे आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार अमेरिकन कर्जरोख्यात गुंतवणूक करीत आहेत. याचा परिणाम भारतात होणार्या परदेशी गुंतवणुकीवर होत आहे. परकीय चलन साठ्यात झाली मोठी घट – शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदाराकडून होत असलेली विक्री, खनिज तेलाचे वाढत असलेले दर, घसरत चाललेली निर्यात या कारणामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यात वेगाने घट होत आहे. तीन जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 5.6 अब्ज डॉलरने कमी होऊन 634.5 अब्ज डॉलर या पातळीवर गेला. त्या अगोदरच्या आठवड्यात परकीय चलन साठा चार अब्ज डॉलरने कमी झाला होता. ऑक्टोबरनंतर परकीय चलन साठ्यात वेगाने घट होत आहे. तर अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे. याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर येत असून भारतीय रुपयाचे मूल्य सध्या 86 रुपये प्रति डॉलर या पातळीवर खाली आले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँक डॉलर विकत असल्यामुळे परकीय चलन साठा कमी होत असल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले. सप्टेंबरच्या अखेरीस भारताकडील परकीय चलन साठा 704.5 अब्ज डॉलर या ऐतिहासिक विक्रमी तुम्ही पातळीवर गेला होता. मात्र त्यानंतर परकीय चलन साठ्यात एकतर्फी वेगाने घट होत आहे. दरम्यान या कालावधीमध्ये सोन्याच्या मूल्यात वाढ झाली. त्यामुळे भारतीय रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या कालावधीत 824 दशलक्ष डॉलरने वाढून 67 अब्ज डॉलरवर गेले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे भारताची चार अब्ज डॉलरची ठेव आहे. भारताकडील परकीय चलन साठ्याचे संवर्धन करण्यासाठी रिझर्व बँक आणि अर्थ मंत्रालय प्रयत्न करत आहे. निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून वीस देशातील भारतीय राजदूतांना संबंधित देशांमध्ये निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. डॉलर वधारत असल्यामुळे सर्वच चलनाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताच्या रुपयावरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र असे असले तरी भारताजवळ सध्या असलेला परकीय चलनाचा साठा आयातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा हे असे समजले जाते.