रुपयाचा भाव 51 पैशांनी कोसळून 87 रुपये 23 पैसे प्रति डॉलवर

मुंबई – अमेरिकेने सुरू केलेल्या जागतिक व्यापार युद्धामुळे डॉलर बळकट होत आहे. त्याचबरोबर इतर सर्व चलनाचे दर कमी होत आहेत. अशा परिस्थितीत महिना अखेर आयात करणार्यांनी डॉलरची मागणी वाढविल्यामुळे मंगळवारी रुपयाचा भाव तब्बल 51 पैशांनी कोसळून 87 रुपये 23 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला.
डॉलर बळकट होत असल्यामुळे आणि रुपया कमकुवत होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री चालू आहे. या कारणामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. काल या गुंतवणूकदारांनी 6,286 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
या गुंतवणूकदारांनी दीड महिन्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त शेअरची विक्री केली आहे. यामुळे भारताकडील परकीय गंगाजळी कमी होऊन त्याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स मंगळवारी 0.04 टक्क्यांनी वाढून 106.64 अंकावर स्थिरावला.
त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे खनिज तेलाचे दर 0.12 टक्क्यांनी कमी होऊन 74.69 डॉलर प्रति पिंप या पातळीपर्यंत खाली आले. त्यामुळे रुपयाला काही प्रमाणात आधार मिळाला. अन्यथा रुपयाच्या मूल्यात आणखी मोठी घट झाली असती असे विश्लेषकानी सांगितले.
मिरा ऍसेट शेरखान कंपनीचे विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापार परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे चलनाचे दर कमालीचे अस्थिर झाले आहेत. मात्र भारताकडे बरीच परकीय गंगाजळी असल्यामुळे त्याचा जास्त परिणाम भारतावर होत नाही. मात्र परिस्थिती अशीच राहिली तर रुपयाच्या मूल्यावर आणि भारतीय व्यापारावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वाढत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर रुपयाच्या मूल्यावर परिणाम सुरू झाला. आता मेक्सिको आणि कॅनडावरील आयात शुल्काची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
या अगोदर चीन विरोधातील आयात शुल्काची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ट्रम्प यांनी अॅल्युमिनियम आणि पोलादावर आयात शुल्क लावले आहे. भारतासारख्या देशावर ते जेवढे आयात शुल्क लावतात तेवढे आयात शुल्क लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे.





