Rupee falls: रुपयाचे तीन महिन्यात 4 टक्के अवमूल्यन
Rupee falls: एक जानेवारीपासून आतापर्यंत रुपयाचे अमूल्य तब्बल 4.5 टक्क्यांनी झाले आहे. गेल्या संपूर्ण वर्षात रुपयाचे 4.7% अवमूल्यन झाले होते.

Rupee falls: युद्धापूर्वी भारताची अर्थव्यवस्था बळकट होती. मात्र युद्धामुळे खनिज तेल महाग झाल्याने भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेच्या विविध निकषावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. एक जानेवारीपासून आतापर्यंत रुपयाचे अमूल्य तब्बल 4.5 टक्क्यांनी झाले आहे. गेल्या संपूर्ण वर्षात रुपयाचे 4.7% अवमूल्यन झाले होते.
या अवमूल्यनाचा फटका देशातील रिटेल किमतीना बसणार आहे. त्यामुळे भारतात महागाई अधिक प्रमाणात वाढणार आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारतातील परकीय चलन साठ्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 2026 मध्ये भारताची चालू खात्यावरील तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्क्यापर्यंत वाढू शकते. गेल्या वर्षी भारताने ही तूट 1.3% इतकी मर्यादित ठेवण्यात यश मिळविले होते.
खनिज तेलाचे दर बेसुमार वाढत असल्यामुळे रुपयाची घसरण चालूच असून मंगळवारी रुपयाचा भाव तब्बल 35 पैशांनी कोसळून 93.88 रुपये प्रति डॉलर या नव्या ऐतिहासिक निचांंकी पातळीवर गेला. आता आखातातील युद्ध शमण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात रुपयाच्या मूल्यात सुधारणा होण्यास काही प्रमाणात मदत मिळू शकेल असे समजले जात आहे.
रुपयाच्या कमी मूल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार परत जात आहेत. त्याचा पुन्हा रुपयावर जास्तच नकारात्मक परिणाम होत आहे. सोमवारी या गुंतवणूकदारांनी 10,414 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. मंगळवारी खनिज तेलाचे दर पुन्हा 1.45 टक्क्यांनी वाढून 101.4 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले.





