रूपगंध : जागतिक हवामान दिवस… वेध हवामानाचा

– महेश कोळी
वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ)च्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये हवामान निरीक्षण आणि अभ्यासाचा इतिहास प्राचीन काळापासून आहे. खगोलशास्त्रीय ग्रंथांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा उल्लेख आहे. प्राचीन कृषी व्यवस्थेत पर्जन्यमान आणि ऋतूंचा अभ्यास केला जात असे. भारतीय पंचांगांमध्ये सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित हवामान अंदाज आजही वर्तवले जातात. बदलत्या काळात भारतीय हवामान विभागानेही हवामान अंदाज प्रणालीमध्ये अद्ययावतता आणल्याने अनुमानाच्या दिशेने मोठी प्रगती झाली आहे. आता येणार्या काळात अमेरिकेप्रमाणे एआय आणि बिग डेटा अॅनालिसिसचा वापर करुन ही प्रणाली अधिक अचूक बनवणे गरजेचे आहे.
जागतिक हवामान विज्ञान दिन दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ)च्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस हवामानशास्त्र, हवामान बदल, आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. डब्ल्यूएमओची स्थापना 23 मार्च 1950 रोजी झाली. 1951 मध्ये ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकृत अंग बनली. हवामान, जलविज्ञान, आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातील संशोधन आणि माहिती देवाणघेवाण यासाठी ही संस्था जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावते. 1961 पासून हा दिवस दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित साजरा केला जातो. ‘क्लोजिंग द अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर’ अशी यावर्षीच्या हवामानदिनाची थीम ठरवण्यात आली आहे.
हवामान विज्ञान म्हणजे पृथ्वीवरील वातावरणाचा अभ्यास. यात हवामानातील बदल, तापमान, वार्याची गती, दाब, आर्द्रता, पर्जन्यमान आणि विविध नैसर्गिक प्रक्रिया समाविष्ट असतात. कृषी, उड्डाण, नौकायान, संरक्षण क्षेत्रात हवामानविषयक माहितीचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हवामान अंदाज वर्तवण्यासाठी उपग्रह, रडार, ऑब्झर्व्हेटरी आणि संगणकीय मॉडेल्सचा वापर केला जातो.
आधुनिक हवामान विज्ञानाची सुरुवात ब्रिटिश कालखंडात झाली. ब्रिटीश सरकारने 6 ऑक्टोबर 1875 रोजी कोलकाता येथे भारतीय हवामान विभागाची स्थापना केली. हेन्री फ्रँसिस ब्लॅनफोर्ड हे या विभागाचे पहिले महासंचालक होते. त्यावेळची हवामानाची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये महद्अंतर आहे. त्यामुळे हवामान विभागाची स्थापना झाली त्यावेळी चक्रीवादळे आणि दुष्काळ यांचा अंदाज काढणे ही प्रामुख्याने या विभागाची कर्तव्ये होती. पुढे 1880 नंतर मुंबई, चेन्नई, पुणे येथे हवामान निरीक्षण केंद्रे स्थापन केली गेली. 1890 मध्ये मान्सून अभ्यास सुरू झाला. 1928 मध्ये हवामान अंदाजासाठी पुणे वेधशाळेची स्थापना झाली.
यादरम्यान गिल्बर्ट वॉकर यांनी ‘वॉकर सर्क्युलेशन’ आणि ‘एल निनो’ यांचा अभ्यास केला. 10 एप्रिल 1982 रोजी स्वतंत्र भारताने आपला पहिला हवामान उपग्रह – इन्सॅट-1 ए (इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टीम) हा अवकाशात प्रक्षेपित केला आणि उपग्रहाद्वारे हवामान निरीक्षणाची सुरुवात झाली. या उपग्रहाचा उद्देश दूरसंचार, हवामानशास्त्र, आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी मदत करणे हा होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे हा उपग्रह यशस्वी होऊ शकला नाही. यानंतर भारताने 1983 मध्ये इन्सॅट 1 बी आणि त्यानंतर सी, डी उपग्रह प्रक्षेपित केले, जे अधिक यशस्वी ठरले. 2013 आणि 2015 मध्ये इन्सॅट थ्रीडी आणि इन्सॅट थ्रीडीआर प्रक्षेपित करण्यात आले.
गेल्या काही दशकांत भारताने हवामानशास्त्रात लक्षणीय प्रगती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान अंदाज अधिक अचूक आणि प्रभावी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळे, पर्जन्यमान, गारपीट आणि उष्णतेच्या लाटा यांचे पूर्वानुमान सुधारण्यासाठी संशोधन, उपग्रह, रडार आणि संगणकीय मॉडेलिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. भारताचा हवामान विज्ञानाचा प्रवास 1875 पासून 2024 पर्यंत मोठ्या सुधारणा आणि संशोधनाने परिपूर्ण आहे.
जागतिक हवामान विज्ञान दिन हा हवामानशास्त्राच्या महत्त्वाची जाणीव करून देतो. हवामान बदल रोखण्यासाठी वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे. हवामानाशी संबंधित अचूक माहिती आणि वेळेवर दिले जाणारे इशारे मानवी जीवन आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करतात. भारतात हवामान अंदाज सुधारण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी डॉप्लर वेदर रडार मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. ही प्रणाली प्रामुख्याने चक्रीवादळे, ढगफुटी, मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळांचा अचूक अंदाज व निरीक्षण करण्यासाठी वापरली जाते. डॉप्लर रडार हा अत्याधुनिक हवामान निरीक्षण तंत्रज्ञानाचा भाग आहे. तो रेडिओ तरंगांचा उपयोग करून हवामानातील बदल आणि पर्जन्यवृष्टीचे स्वरूप, वेग आणि दिशा याचा वेध घेतो.
वार्याचा वेग, दिशा, ढगांमध्ये पाण्याचा अंश आणि बर्फाचे प्रमाण यांचे आकलन याद्वारे केले जाते. सध्या भारतामध्ये 39 हून अधिक डॉप्लर रडार कार्यरत आहेत. येणार्या काळात ‘मिशन मौसम’ अंतर्गत 2026 पर्यंत 87 नवीन डॉप्लर वेदर रडार बसवण्याची योजना आहे. रडार डेटाच्या मदतीने सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितींसाठी स्थानविशिष्ट अंदाज प्रणाली सक्षम केली जात आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या घटना आणि हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी नागरिक आणि वापरकर्त्यांसह सर्व संबंधितांना अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज करण्यासाठी ‘मिशन मौसम’ची आखणी करण्यात आली आहे. मान्सूनचा अंदाज, हवेच्या गुणवत्तेसंबंधी इशारा , अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या घटना आणि चक्रीवादळे, धुके, गारपीट आणि अतिवृष्टी च्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना, क्षमता निर्मिती आणि जनजागृती यांसह वेळ आणि स्थान याबाबत अत्यंत अचूक आणि वेळेवर हवामान बदलाची माहिती पुरवण्यासाठी निरीक्षणात सुधारणा करणे यावर या मोहिमेचा भर असणार आहे.
मिशन मौसमच्या महत्त्वपूर्ण घटकांमध्ये प्रगत सेन्सर्स आणि उच्च-कार्यक्षमतेच्या सुपर कॉम्प्युटर्ससह अत्याधुनिक रडार आणि उपग्रह प्रणाली, सुधारित पृथ्वी प्रणाली मॉडेल्सचा विकास आणि वास्तविक-वेळेत डेटा प्रसारासाठी जीआयएस -आधारित स्वयंचलित निर्णय समर्थन प्रणाली यांचा समावेश करण्यात येत आहे. मिशन मौसमचा थेट लाभ कृषी, आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण, विमान वाहतूक, जलसंपदा, ऊर्जा, पर्यटन, नौवहन, वाहतूक, ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रांना होणार आहे. शहर नियोजन, रस्ते आणि रेल्वे वाहतूक, ऑफशोअर ऑपरेशन्स आणि पर्यावरण निरीक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये माहितीपूर्ण निर्णयक्षमतेत वाढ करण्यास हे मिशन साहाय्यभूत ठरणार आहे.
भारतासारख्या मोठ्या आणि भौगोलिकदृष्ट्या विविध देशात हवामान अंदाज वर्तवणे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आव्हानात्मकही. परंतु त्यावर मात करणे गरजेचे आहे. तथापि, भारतातील डॉपलर रडार कव्हरेज अद्याप संपूर्ण देशभर समान नाही. दुर्गम आणि ग्रामीण भागांत रडार कव्हरेज अपूर्ण आहे. अनेक भागांत अत्याधुनिक निरीक्षण यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक हवामान अंदाजावर परिणाम होतो. भारताच्या मोठ्या समुद्रकिनार्यावर विशेषतः हिंदी महासागर क्षेत्रात हवामान निरीक्षण केंद्रे अपुरी आहेत, त्यामुळे चक्रीवादळ आणि मोसमी पाऊस यांचा अचूक अंदाज लावणे कठीण जाते. भारतीय उपखंडातील हवामान अतिशय गुंतागुंतीचे आहे, परंतु सध्याची न्युमरीकल वेदर प्रेडिक्शिन्स मॉडेल्स ही पश्चिमी देशांसाठी अधिक अनुकूलित आहेत. ती काही क्षेत्रांत कमी सुस्पष्टता दाखवतात, त्यामुळे लहान स्तरावरील अंदाज कमी प्रभावी असतो. यामुळे पूर आणि ढगफुटी यांसाठी त्वरित पूर्वसूचना मिळण्यात अडचणी येतात. हवामान संशोधन संस्था, सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्यात डेटा शेअरिंग तितक्या प्रभावी पद्धतीने होत नाही.
अमेरिकेसारख्या देशांत हवामान अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताआणि बिग डेटा अॅनालिसिस मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. पण भारतात अजूनही त्याचा वापर मर्यादित आहे. येणार्या काळात तो वाढणे आवश्यक आहे. याचे कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे मॉन्सूनचे स्वरूप आणि तीव्रता बदलत आहे, त्यामुळे जुनी अंदाज प्रणाली कमी प्रभावी ठरू शकते. महासागर क्षेत्रातील चक्रीवादळे अचानक तीव्र होतात आणि त्यांचा वेग आणि दिशा लवकर बदलते. त्यांचा अचूक अंदाज वर्तवला न गेल्यास मोठा फटका बसू शकतो. हे लक्षात घेता हवामान अंदाजासाठी सुपरकॉम्प्युटर,डॉप्लर रडार, सॅटेलाईट सेन्सर यांसाठी अधिक गुंतवणूक आवश्यक आहे. गाव आणि तालुका स्तरावरील हवामान अंदाज प्रणालीही प्रभावी करणे गरजेचे आहे.
अनेक वेळा लोक हवामान अंदाज चुकीच्या पद्धतीने समजतात किंवा दुर्लक्ष करतात. याबाबतही प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन यामधील समन्वय अद्याप प्रभावी नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य वेळेत उपाययोजना करताना अडचणी निर्माण होतात. पुण्यामध्ये गतवर्षी काही तासांत पडलेल्या पावसाने उडालेली दाणादाण सर्वांनी पाहिली. जागतिक तापमानवाढीचा आलेख उंचावत चालल्याने आणि हवामानाचे एकंदरीत चक्रच बदलत गेल्याने येणार्या काळात त्यातील अनपेक्षितता वाढत जाणार आहे. अशा वेळी अचूक अंदाजांचे महत्त्व अधिक वाढणार आहे. अर्थात, गेल्या दहा वर्षांमध्ये हवामान अंदाजांमधील अचूकता वाढत आहे, हेही नाकारता येणार नाही. अन्यथा पूर्वी हवामान विभागाने पाऊस पडणार म्हणून जाहीर केले की हमखास ऊन पडत असे. तशी स्थिती आज नाही. परंतु अद्यापही सुधारणांचा पल्ला मोठा आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रचंड वेगाने तप्त होत चाललेल्या वसुंधरेवरील वायूप्रदूषण कमी करुन इथले हवामान जीवसृष्टीला, मानवसृष्टीला सुसह्य होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकामागून एक येणारे उष्ण महिन, उष्ण वर्षे यामुळे निसर्गचक्र बाधित होत चालले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरीस करारातून माघार घेण्याची घोषणा करताना जागतिक तापमानवाढीच्या समस्येचे गांभीर्य नाकारले असले तरी ही प्रगत, विकसित राष्ट्रांची सुनियोजित खेळी आहे. हवामान बदलांचा सर्वाधिक फटका विकसनशील राष्ट्रांना बसणार आहे. त्यामुळे अधिकाधिक निसर्गपूरक जीवनशैली अंगिकारुन आपली जबाबदारी पार पाडणे हेच आपले इतिकर्तव्य आहे.





