Dipali Sayyad : “मला रुपाली चाकणकर मेंटली टॉर्चर करत आहेत” ; अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Dipali Sayyad : या पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि शिंदे सेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देत गंभीर आरोप केला आहे.

Dipali Sayyad : नुकताच ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, या चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेत अनेक आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि शिंदे सेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देत गंभीर आरोप केला आहे.
मला रुपाली चाकणकर मेंटली टॉर्चर करत आहेत, असा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चाकणकरांनी चित्रपटावर घेतलेल्या आक्षेपावर बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या “रूपाली चाकणकर यांच्यासंदर्भात मी कुठल्याही अश्लील पोस्ट सोशल मीडियावर टाकलेल्या नाहीत. मी फक्त माझं टीजर पोस्ट केले. तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या गोष्टी तुम्ही आता करत आहात. दुसरं टीजर आल्यानंतरच तुम्ही गुन्हा दाखल केला. माझा उदरनिर्वाह या चित्रपटावर आहे, मी कलाकार आहे, मला रुपाली चाकणकर मेंटली टॉर्चर करत आहेत.” या आरोपावर आता रुपाली चाकणकर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
काहीही झालं तरी चित्रपट प्रदर्शित होणारच
पुढे बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटातील कोणतेही पात्र रुपाली चाकणकर यांचे आहे, असे कुठेही म्हटलेले नाही. तरीही रुपाली चाकणकर या हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म स्टेकहोल्डर्सवर दबाव टाकत आहेत, असा आरोपही दिपाली सय्यद यांनी केला आहे. पण काही झालं तरी चित्रपट प्रदर्शित होणारच, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मी काय बदनामी केली? दिपाली सय्यद यांचा सवाल
रूपाली चाकणकर यांनी बदनामीचा २५ कोटीचा दावा माझ्यावर टाकला. आम्ही आता नोटीस पाठवली आहे आणि ५०० कोटींचा दावा रूपाली चाकणकर यांच्यावर टाकला आहे. त्या माझी बदनामी करत आहेत. रुपाली चाकणकर यांची मी काय बदनामी केली? हे त्यांनी सांगावे, असा सवालही दिपाली सय्यद यांनी विचारला केला आहे.
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स २ अॅाक्टोबरला रिलीज होणार
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक अधोरिखेत करणारा चित्रपट म्हणून ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद मुख्य भूमिकेत असून येत्या २ अॅाक्टोबर या दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.





