Ajit Pawar : “आदरयुक्त भीती अन् प्रचंड आपुलकी…”, रुपाली चाकणकरांनी व्यक्त केला शोक
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले असताना लँडिंगवेळी अजितदादांचे विमान कोसळले आणि स्फोट होऊन ही दुर्घटना घडली.
त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या पाच जणांचा देखील मृत्यू झाला आहे. दादांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक राजकीय नेतेमंडळींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत.
रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं कि, आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली, असं त्यांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar Plane Crash
तसेच सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची.
आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे, असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते.
आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..! असं रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.





