Rupali Chakankar : अशोक खरातची पाद्यपूजा का केली? महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं
Rupali Chakankar : नाशिकमधील वादग्रस्त स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणामुळे आणि महिला शोषणाच्या गंभीर आरोपांनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी तब्बल सात महिन्यांनंतर या प्रकरणावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

Rupali Chakankar : नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं आहे. अशोक खरातची पाद्यपूजा का केली, त्याच्याशी ओळख कशी झाली, तसेच महिलांना त्याच्याकडे नेल्याच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. (Rupali Chakankar)
महिला शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तब्बल सात महिन्यांनी त्यांनी या विषयावर पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त आहे. (Rupali Chakankar)
अशोक खरातशी ओळख कशी झाली?
रुपाली चाकणकर यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणवून घेत होता आणि आपण नौदलात काम केल्याचे सांगत होता. तो अंकशास्त्राबाबत माहिती देत असल्यामुळे त्याच्याशी ओळख झाली. गुरुपौर्णिमा आणि महाशिवरात्रीच्या कार्यक्रमांसाठी त्या शिवनिका संस्थानच्या मंदिरात जात होत्या. (Rupali Chakankar)
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अशोक खरातने अंकशास्त्रावर भाषण केले होते. त्या कार्यक्रमाला अनेक मंत्री, राजकीय नेते तसेच आयएएस आणि आयपीएस अधिकारी उपस्थित होते. अंकशास्त्र हे वास्तुशास्त्राप्रमाणेच असल्याचे वाटल्याने त्यावेळी आपल्याला त्यात कोणतीही बुवाबाजी जाणवली नाही, असे चाकणकर यांनी सांगितले. (Rupali Chakankar)
खरातची पाद्यपूजा का केली?
पाद्यपूजेबाबत स्पष्टीकरण देताना चाकणकर म्हणाल्या की, २०१८-१९ पासून त्या शिवनिका संस्थानच्या कार्यक्रमांना जात होत्या. २०२१-२२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला त्या कुटुंबासह उपस्थित होत्या. कार्यक्रमाला पोहोचण्यास उशीर झाल्याने त्या मागे बसल्या होत्या. त्यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांच्यापैकी काहींनी आधीच खरातची पाद्यपूजा केली होती. (Rupali Chakankar)
आपल्यालाही पाद्यपूजा करण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र, आपली ती पूजा करण्याची इच्छा नव्हती. तरीही उपस्थित लोकांच्या आग्रहामुळे आणि विरोध केल्यास वेगळा संदेश जाईल, या विचाराने आपण पाद्यपूजा केली, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यापुढे आपण काहीही केले नसल्याचा दावाही त्यांनी केला. (Rupali Chakankar)
‘कोणत्याही महिलेला खरातकडे नेलं नाही’
या प्रकरणात आपल्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आपण अशोक खरातसोबत कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही किंवा जमिनीचा व्यवहारही केलेला नाही. तसेच कोणत्याही महिलेला खरातकडे नेले नसल्याचा दावा त्यांनी केला. खरातकडे आपला कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ नसल्याचेही त्यांनी मुलाखतीत सांगितले. (Rupali Chakankar)
‘फक्त मलाच का लक्ष्य केलं जातंय?’
या प्रकरणात अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या इतर मंत्री, अधिकारी आणि राजकीय नेत्यांनाही प्रश्न विचारले गेले पाहिजेत, अशी भूमिका चाकणकर यांनी मांडली. २०२१-२२ मधील पाद्यपूजेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यावेळी इतर अनेक मान्यवरांनीही पाद्यपूजा केली होती. मग प्रश्न केवळ आपल्यालाच का विचारले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Rupali Chakankar)
दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील गंभीर आरोप आणि त्याच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या दाव्यांबाबत तपासातून काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे. (Rupali Chakankar)





