Rupali Chakankar: ‘एनसीपी’च्या वर्धापन दिनाला रुपाली चाकणकरांची दांडी, राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
Rupali Chakankar: अजितदादांच्या निधनानंतर पक्षाचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. अशा वेळी पक्षाच्या एका बड्या महिला नेत्याची अनुपस्थिती सर्वांच्याच डोळ्यात खटकणारी ठरली.

Rupali Chakankar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) २७ व्या वर्धापन दिन सोहळ्याला पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गैरहजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजितदादांच्या निधनानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापनदिन होता. अशा मोठ्या प्रसंगी चाकणकर यांनी मारलेली दांडी पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादाची साक्ष देत असल्याची चर्चा आहे.
अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या एकाही सार्वजनिक किंवा पक्षाच्या कार्यक्रमात दिसलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा आज (११ जून) मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला आहे.
‘त्या’ प्रकरणावरून चाकणकर अडचणीत? (Rupali Chakankar)
अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. मात्र, या वादावर त्यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती.
“सदर प्रकरणाशी किंवा त्यात झालेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. या प्रकरणाचा तपास पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा, म्हणूनच मी स्वतःहून पदाचा राजीनामा देत आहे,” असे चाकणकर यांनी म्हटले होते.
या राजीनाम्यानंतर तब्बल दोन महिने चाकणकर सार्वजनिक जीवनातून दूर होत्या. वर्धापनदिनाच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडली होती, मात्र तरीही त्यांनी मुख्य कार्यक्रमाला येणे टाळले.
पक्षांतर्गत नाराजी आणि अंतर्गत धुसफुस – (Rupali Chakankar)
अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पक्षाच्या आतूनच मोठा विरोध सुरू झाला होता. पक्षातील काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. इतकेच नव्हे तर, चाकणकर यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावे, अशा मागणीचे पत्र काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठवले होते. स्वकीयांनीच घेतलेल्या या भूमिकेमुळे चाकणकर कमालीच्या नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
चाकणकरांनी पाठ का फिरवली? (Rupali Chakankar)
अजितदादांच्या निधनानंतर पक्षाचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. अशा वेळी पक्षाच्या एका बड्या महिला नेत्याची अनुपस्थिती सर्वांच्याच डोळ्यात खटकणारी ठरली. चाकणकरांच्या या ‘नाराजी नाट्य’ मागे पक्षातील अंतर्गत धुसफस आहे की आणखी काही कारण, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र, आगामी काळात या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





