राजुरी : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने जुन्नर तालुक्यात नागरिक पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचे चित्र मंगळवारी (दि. १०) दिसून आले. इंधन कमतरतेची अफवा ग्रामीण भागात वेगाने पसरल्यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठा ताण आला असून, बेल्हे, राजुरी, निमगाव सावा यांसह अनेक गावांमध्ये नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, तालुक्यात कोणतीही टंचाई नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, मंगरूळ, पारगाव, आणे, नळावणे आणि बोरी बुद्रुक यांसारख्या गावांमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आळेफाटा आणि बेल्हे परिसरातील पेट्रोल पंपांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधन पुरवठा भविष्यात बंद होईल या चर्चेमुळे अनेक नागरिक साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे साठेबाजीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या गोंधळामुळे नियमित वितरण व्यवस्थेत अडथळे निर्माण होत असून सर्वसामान्य नागरिकांची धावपळ होत आहे. या परिस्थितीबाबत जुन्नर पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे की, जुन्नर तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची गॅस किंवा इंधनाची टंचाई नाही. गॅस आणि इंधनवितरण व्यवस्था सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करू नये आणि गॅसचा अनावश्यक साठा करू नये. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पुरवठा सुरळीत राहील याची खात्री देण्यात आली आहे. हेही वाचा : Indapur News : इंदापुरात महसूलची लेखणी बंद! तहसीलदारांना मारहाणीचा निषेध; आरोपींवर कारवाई करा