इंदापूर : तालुक्यात शासकीय कारवाईदरम्यान तहसीलदारांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. १०) एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला. तसेच संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निमगाव केतकी परिसरात सोमवारी (दि. ९) शासकीय कामकाज सुरू असताना तहसीलदार जीवन बनसोडे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तहसीलदार बनसोडे यांच्या फिर्यादीवरून वरकुटे खुर्द येथील संतोष रामदास मोरे याच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथील प्रशासकीय भवनातील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज ठप्प ठेवत लेखणी बंद आंदोलन केले. या वेळी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात काही जण सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत असले तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रकार वाढत आहेत. खोट्या तक्रारी, धरणे-आंदोलन व उपोषणाच्या धमक्या देऊन शासकीय यंत्रणेवर दबाव आणण्याचे प्रकार घडत असल्याची बाबही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. तहसीलदारांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरच अशा प्रकारे हल्ला होत असेल, तर सामान्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, गावकामगार तसेच महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.