Government Job – सरकारी नोकरी भरतीमध्ये नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असते. एखादा उमेदवार पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला गैरहजर राहिल्यास तो उमेदवार ही चाचणी पुन्हा घेण्याची मागणी करू शकत नाही. त्याने शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यासाठी अर्ज केला असेल आणि त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नसेल, तरीही तो उमेदवार आम्हाला दुसरी संधी द्या असा दावा करू शकत नाही. सरकारी भरतीत नियम सर्वांसाठी सारखेच असतात, तिथे वैयक्तिक अडचणींना महत्त्व दिले जात नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. या प्रकरणी न्या. दिपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. दिल्ली पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात संबंधित उमेदवार पात्र ठरला होता. त्याची शारीरिक चाचणी १४ जानेवारी २०२४ रोजी होणार होती. मात्र, ताप, सर्दी, खोकला आणि चक्कर येत असल्याचे कारण देत तो चाचणीला गैरहजर राहिला. त्यानंतर त्याने चाचणी पुढे ढकलण्यासाठी तीन विनंती अर्ज केल्याचा दावा केला होता. प्रशासकीय न्यायाधिकरणाने त्याला पुढील बॅचमध्ये सहभागी करून घेण्याचे आदेश दिले होते, ज्यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. याविरोधात दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.