nagar | कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम – काटे

शेवगाव, (प्रतिनिधी) – सध्याचा लोकसभा निवडणुकीचा माहोल लक्षात घेऊन भाजप सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली. मात्र, ती अत्यंत फसवी आहे. उलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्याचेच काम भाजपने याद्वारे केले असल्याची टीका केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी येथे केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ तालुक्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या कोपरा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तालुकाध्यक्ष हरिष भारदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकास माजी सरपंच एजाज काझी, राहुल मगरे, राहुल वरे, सुनिल रासने , वजीर पठाण, बाळासाहेब डाके यांचेसह कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष पाटील लांडे, कॉ. संजय नांगरे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे आदी अनेक कार्यकर्ते होते.
काटे म्हणाले, भाजप सरकारने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. गुजरातमधील कांदा निर्यात होऊ शकतो आणि महाराष्ट्रातील कांद्याला मात्र निर्यातबंदी लादण्यात आली. ही बाब सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात योग्य नसल्याचे लक्षात येताच मोदींनी घाईघाईने महाराष्ट्रात देखील कांदा निर्यातबंदी आदेश उठवल्याची घोषणा नुकतीच केली मात्र ही घोषणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली.
प्रत्यक्षात निर्यातीची वेळ आल्यानंतर निर्यातकराच्या बडग्यामुळे व सरकारने ठरवलेल्या निर्यात मूल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताच्या कांद्याला मागणी राहिली नाही. श्रीलंकेत स्थानिक बाजारात ४६ रुपये किलो दराने कांदा विकला जात असताना भारताचा ६४ रुपये किलो दराच्या कांद्याला गिऱ्हाईक कसे मिळणार ? हा साधा प्रश्न आहे .
निर्यातबंदी उठवण्याची घोषणा झाल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ रुपये किलोवर पोहोचलेला कांदा आज १२ ते १४ रुपयांवर घसरला आहे. कोणत्याही अटी शर्ती रहित नुसती निर्यातबंदी उठवली असती तरी कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला असता पण हे भाजपाला होऊच द्यायचे नव्हते. आज जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या कांद्याला १२ ते १४ रुपये किलोचा भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असल्याचे ते म्हणाले.





