आरटीओ अधिकाऱ्याची दुचाकीला धडक; 2 जण जखमी

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी भागात प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) एका अधिकाऱ्याने दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. 3 जुलै रोजी ही घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरटीओ अधिकार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी गावडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरटीओ अधिकार्याचे नाव आहे. अपघातात निखिल बाळासाहेब पवार ( 26, राहिंज वस्ती, लोणी काळभोर) व विकास नामदेव राठोड ( 32, वायकर वस्ती, कुंजीरवाडी) हे दोन तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गावडे हे अकलूज येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कर्तव्यावर आहेत. तीन जुलै रोजी कुंजीरवाडी येथून त्यांच्या चारचाकी कार मधून ते निघाले होते. या दिवशी येथून पालखी जाणार असल्याने रस्त्यावरील एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. तर दुसऱ्या एकाच लेन वरून वाहतूक सुरू होती, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.
यावेळी गावडे यांच्या कारची धडक समोरून येणाऱ्या दुचाकीला बसली. अपघातात दुचाकीवरील राठोड आणि पवार जखमी झाले. राठोड यांच्या गुडघ्याला तर पवार यांच्या पायाला आणि डाव्या खांद्याला मार बसला. त्यानंतर तात्काळ दोघाना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात आता कारचालक गावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करत आहेत.





