RTE Admission 2026 – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर आतापर्यंत सुमारे ७३ हजार ८७५ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, आता ८ मे पर्यंत पालकांना कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठीची आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले. ६ एप्रिल रोजी प्रवेशासाठीची सोडत काढण्यात आली. त्यानंतर १० एप्रिल रोजी निवड यादी जाहीर करून निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले. २० एप्रिल रोजी मुदतवाढ जाहीर करून ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे निवड यादीत नाव असलेल्या असलेल्या आणि अद्याप प्रवेश न घेतलेल्या आणखी काही विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ९१६ शाळांमध्ये १८ हजार ६० प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या. त्यासाठी ५४ हजार ६८३ अर्ज दाखल झाले होते. १७ हजार ७२८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यातील १२ हजार ७०४ बालकांचे प्रवेश झाले आहेत. सर्वाधिक प्रवेश हे पुणे जिल्ह्यातच झालेले आहेत. ठाणे जिल्ह्यात ७ हजार २८१, नाशिक जिल्ह्यात ५ हजार ३२६, मुंबईमध्ये ४ हजार ९४१, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ हजार ४१८, रायगड जिल्ह्यात ४ हजार ३४५, तर अहिल्यानगर जिल्ह्यात २ हजार ७८९ प्रवेश झाले आहेत.