RTE Admission : ९२ हजार अर्ज दाखल, पण पालकांमध्ये चिंतेचं वातावरण; ‘या’ एका चुकीमुळे अर्ज बाद होऊ शकतो
RTE Admission : आरटीई २५ टक्के राखीव जागावरील प्रवेशासाठी आतापर्यंत ९२ हजार १५६ बालकांचे अर्ज त्यांच्या पालकांकडून ऑनलाइन दाखल झाले आहेत.

RTE Admission – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागावरील प्रवेशासाठी आतापर्यंत ९२ हजार १५६ बालकांचे अर्ज त्यांच्या पालकांकडून ऑनलाइन दाखल झाले आहेत. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. संबंधित बालकांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून संबंधित शाळांना दिली जाते. मात्र, ती वेळेवर मिळत नसल्याने शाळांकडून सतत नाराजी व्यक्त होते.
त्यात आता बालकांना निवासस्थानापासून प्रवेशासाठी १ कि.मी.पर्यंतच्या शाळा उपलब्ध होणार आहेत. याबाबतही पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी लागणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी राज्यातील ८ हजार ६५१ शाळांनी नोंदणी केली असून, त्यात १ लाख १२ हजार ७७२ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. यासाठी ९२ हजार १५६ अर्ज दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील ९०५ शाळांमध्ये १७ हजार ५०९ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी १७ हजार ६७१ प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत. पालकांना आपल्या बालकांचे अर्ज दाखल करण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.



