Satara: कोंढवली पाणी योजनेसाठी ८४ लाख ९३ हजार रुपये; ना. शिवेंद्रसिंहराजे
Satara कोंढवली या पुनर्वसित गावठाणातील नळ पाणीपुरवठा योजना या नागरी सुविधा कामाच्या २४.८५ लाख एवढ्या अंदाजपत्रकास पुणे विभागीय आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता देऊन हा निधी वितरित करण्यात आला होता.

Satara: धोम प्रकल्पांतर्गत मौजे कोंढवली (लिंब, ता. जि. सातारा) या पुनर्वसित गावठाणातील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या योजनेच्या नागरी सुविधा कामाच्या ८४ लाख ९३ हजार २८२ रुपयांच्या अंदाजपत्रकास विशेष बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आभार मानले आहेत.
कोंढवली या पुनर्वसित गावठाणातील नळ पाणीपुरवठा योजना या नागरी सुविधा कामाच्या २४.८५ लाख एवढ्या अंदाजपत्रकास पुणे विभागीय आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता देऊन हा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, या निधीमधून या योजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या उदभवास पाणी कमी पडत असून तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या कामासाठी सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंत्यांनी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता.
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने कोंढवली लिंब येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या ८४ लाख ९३ हजार २८२ रुपये इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास विशेष बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे भरीव निधी उपलब्ध झाला असून कोंढवली येथील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. याबद्दल कोंढवली ग्रामस्थांनी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.





