RR vs RCB : ‘मला माहित होते की….’, सॅमसनने स्वतः सांगितले की आरसीबीने कुठे मारली बाजी?

RR vs RCB Sanju Samson Statement on RR defeat : आयपीएल २०२५ मधील २८व्या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा ९ विकेट्सनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने मान्य केली की, सवाई मानसिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवर १७३ धावांचा बचाव करणे शक्य होते. परंतु आरसीबीच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजी करत धावांचा सहज पाठलाग केला. या सामन्यात फिल सॉल्टच्या ६५ धावांच्या स्फोटक खेळीमुळे पाया रचला गेला आणि कोहलीच्या अर्धशतकाने विजयाचा कळस चढवला.
संजू सॅमसनने स्वतः सांगितले की आरसीबी कुठे बाजी मारली?
संघाच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सॅमसन म्हणाला, “स्लो विकेटवर टॉस गमावल्यानंतर, सुमारे १७० धावांचा स्कोअर खरोखरच चांगला स्कोअर होता. पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करणे कठीण होते.” पंरतु, आरसीबीने त्याच खेळपट्टीवर उत्कृष्ट कामगिरी केली आणि १५ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकण्यात यश मिळवले. सॅमसन म्हणाला की राजस्थानने पॉवरप्लेमध्येच सामना गमावला. तो म्हणाला, “मला माहित होते की सॉल्ट आणि कोहली आम्हाला कठीण लढत देतील. त्यांनी पॉवरप्लेमध्येच सामना जिंकला होता.”
‘सामना १९व्या-२०व्या षटकापर्यंत नेयाला आवडला असता’
अनेक झेल सोडल्याबद्दल सॅमसनने त्याच्या क्षेत्ररक्षकांना दोष दिला नाही. राजस्थानचा कर्णधार म्हणाला, “त्यांनी (आरसीबी खेळाडूंनी) आमचे झेल सोडले, आम्हीही त्यांचे झेल सोडले. काही हरकत नाही, त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे विजयाचे श्रेय आरसीबीला जाते. त्यांचा इंटेट चांगला होता. नाणेफेकीने मदत केली असे म्हणायला हरकत नाही, पण मला हा सामना १९ व्या किंवा २० व्या षटकापर्यंत घेऊन जायला आवडला असता.”
हेही वाचा – SRH vs PBKS : ट्रॅव्हिस हेड-ग्लेन मॅक्सवेल मैदानात भिडले, व्हायरल VIDEO ने सोशल मीडियावर खळबळ
कर्णधार रजत पाटीदारला काय विशेष वाटले?
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने कोहलीच्या योगदानाचे कौतुक केले. ज्याने त्याच्या अफाट अनुभवाचा वापर करून हा सामना एकतर्फी बनवला. तो म्हणाला, “विकेट फलंदाजीसाठी सोपी नव्हती, आम्ही १५०-१७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. सॉल्टला डगआउटमधून फलंदाजी करताना पाहणे आनंददायी होते. व्हीके (कोहली) भाई ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करत होते ते खूप खास होते. आम्ही खेळपट्टीकडे पाहणारा संघ नाही, आम्हाला सकारात्मक आणि चांगले क्रिकेट खेळायचे आहे.”





