RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

RR vs PBKS Rajasthan Royals set IPL 2025 records with fastest 50 : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल २०२५ चा ५९ वा सामना जयपूरमध्ये खेळला जात आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी दमदार सुरुवात दिली. या दोघांच्या वादळी खेळीच्या राजस्थान रॉयल्सने पॉवर प्लेमध्येच मोठी कामगिरी केली आहे.
यशस्वी-वैभवने पॉवर प्लेमध्ये घातला धुमाकूळ –
यशस्वी आणि वैभने पहिल्याच षटकात जलद फटके मारून आपले हेतू स्पष्ट केले. या दोन सलामीवीर फलंदाजांमुळे राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ मध्ये सर्वात जलद ५० धावा पूर्ण करणारा संघ बनला आहे. रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध राजस्थान रॉयल्सने फक्त २.५ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने तीन षटकांत ५० धावा केल्या होत्या. तर आरसीबीने दिल्लीविरुद्ध हा पराक्रम केला होता.
राजस्थान रॉयल्स संघाचे आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक –
Halla Bol! 🔥💗 pic.twitter.com/BGobPjgk1U
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 18, 2025
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स संघाचे हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला. पंजाबविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने ८९ धावा केल्या. चालू हंगामाच्या सुरुवातीला, संघाने गुजरातविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ८७ धावा केल्या होत्या.
हेही वाचा – RR vs PBKS : कर्णधार असावा तर असा! दुखापतीनंतरही श्रेयसने पंजाबसाठी साकारली महत्त्वपूर्ण भागीदारी
पंजाब किंग्जने उभारला २१९ धावांचा डोंगर –
तत्पूर्वी या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. पंजाबने २० षटकांत ५ गडी गमावून २१९ धावा केल्या. या डावात नेहल वधेराने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३७ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७० धावा केल्या. त्याच वेळी, शशांक सिंगने ३० चेंडूत ५९ धावा काढत नाबाद राहिला. प्रभसिमरन सिंग आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनी २१-२१ धावांचे योगदान दिले.





