पिंपरी | आरपीआयकडून विधानसभेसाठी ८ जागांची मागणी : आठवले

लोणावळा, (वार्ताहर) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळ्यात रिपब्लिकन उद्योग परिषदेची बैठक संपन्न झाली.
उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्रित आणून सूक्ष्म आणि लघु व्यवसाय, खादी ग्रामोद्योग, स्टार्टअप योजना, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या सारख्या ज्या अनेक योजना आहे.
त्यांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना, कार्यकर्त्यांना व्हावा यासाठी आरपीआयची एक उद्योग विंग स्थापन करून त्यामाध्यमातून किमान १० लाख तरुण तरुणींना उद्योग मिळवून द्यायचा असा निर्णय घेण्यात आला.
लोणावळ्यातील वलवण व्हिलेज याठिकाणी संपन्न झालेल्या या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली.
यात प्रामुख्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आठवले यांनी आरपीआय ही महायुतीचा घटक पक्ष म्हणूनच ही निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.
तसेच महायुतीकडे आपण ७ ते ८ जागांची मागणी करणार असल्याचे सांगितले. यात जागा कमी जास्त होऊ शकतील.
सध्या महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये जागा वाटपावरून वाद विवाद सुरू असला तरीही लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. इतर पक्षातून तिकीट मिळणार नसल्याने अनेक जण शरद पवार गटात जात आहेत.
हर्षवर्धन पाटील हे त्याचं उदाहरण आहे. पण त्याचा फार फायदा होणार नाही. शिवाय दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र कुणीही जात नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बाबा सिद्धिकी यांच्या हत्येबद्दल बोलताना रामदास आठवले यांनी दुःख व्यक्त केले. या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की हल्ल्याच्या आशा घटना अचानक घडतात. माझ्यावर ही दोन वेळा हल्ला झाला होता.
कुणाचं ही राज्य असलं तरी अशा घटना घडू नयेत. यासाठी गुप्तचर यंत्रणा ऍक्टिव्ह असली पाहिजे. विरोधकांनी या घटनेवरून राजकारण करू नये. त्यांच्या ही कार्यकाळात अशा घटना घडल्या आहेत.
मराठा आरक्षणावर बोलताना आठवले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे आणि यासाठी सर्वात आधी मागणी मी केली असल्याचे सांगितले. पण मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळणं कठीण आहे.
कमिटी आणि सर्वोच्च न्यायालया हे मान्य करणार नाही असं सांगतानाच ८ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील कुटुंबाला आरक्षण मिळावं ही आमची सातत्याने मागणी असल्याचे ते म्हणाले. किंवा ओबीसींमधून दुसरी कॅटगीरी करून त्यात मराठा समाजाला टाकलं गेलं पाहिजे.
तसं आरक्षण महाराष्ट्रात मिळू शकतं पण हे महाराष्ट्रपुरतं मर्यादित ठेवू शकता येणार नाही. देशभरातील जाट, क्षत्रिय यांना ही आरक्षण अशा पद्धतीने द्यावं लागेल असेही आठवले म्हणाले.





