Ramdas Athawale – राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता महायुतीतल घटक पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 10 ते 12 जागांची मागणी केली आहे. यामुळे महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गटाचे (आरपीआय-ए) अध्यक्ष रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. या तयारीची डोकेदुखी भाजपला होताना दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला 10 ते 12 जागा देण्याची मागणी केली आहे. रामदास आठवले यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने ‘ऊसधारी माणूस’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, आमचा पक्ष स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. विदर्भात तीन ते चार जागांवर लढण्याची आमची तयारी आहे. यामध्ये नागपूर, उमरेड (नागपूर), यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि वाशिम विधानसभेची जागा आरपीआयला सोडावी. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार असे म्हटले जात आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यामध्येय जागांची रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या जागांवर अडून आहेत. भाजपने सर्वाधिक जागांवर लढण्याची तयारी चालवली आहे, त्यात आरपीआयनेही आपल्या जागांची मागणी केल्याने भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.