समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा फेरा; ‘एनसीबी’चे पथक आज मुंबईत होणार दाखल; बदलीच्या चर्चांना जोर

नवी दिल्ली : आर्यन खान प्रकरणामुळे चांगलेच वादात अडकरणारे अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर चौकशी झाली यावेळी त्यांनी आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी बुधवारी मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चौकशीमुळे वानखेडे यांच्या बदलीच्या चर्चांना जोर आला असल्याचेही दिसत आहे.
समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि त्यांचे विभागीय संचालक दर्जाचे तीन सहकारी बुधवारी दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहेत. हे अधिकारी या प्रकरणाचे साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईल या दोघांचीही चौकशी करणार आहेत.
मुंबईत क्रुझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणातील साक्षीदार व पंच प्रभाकर साईल याने लाचखोरीचा आरोप केला असून, त्यात वानखेडेंचाही समावेश असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वादात सापडलेल्या वानखेडे यांना ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीत बोलावून घेतले होते. वरिष्ठांच्या आदेशामुळे वानखेडे यांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठली. मात्र, आपण ‘एनसीबी’च्या नियमित बैठकीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते.
मंगळवारी सकाळी वानखेडे यांनी ‘एनसीबी’च्या मुख्यालयात वरिष्ठांची भेट घेतली. सुमारे दीड तासांच्या भेटीनंतर वानखेडे मुख्यालयातून निघून गेले. वानखेडेंना पाठिंबा देण्यासाठी मुख्यालयासमोर समर्थकांनी गर्दी केली होती. एनसीबीचे पंच प्रभाकर साईलचा एनसीबी जबाब नोंदवणार आहे. हा जबाब गुरुवारी नोंदण्यात येणार असल्याचे सूत्रांजडून सांगण्यात आले आहे. या पथकाकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा बुधवारी जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.





