Caribbean Premier League 2024 | एका ओव्हरमध्ये टाकले 13 बॉल्स, ‘या’ गोलंदाजाच्या नावावर झाली लाजीरवाण्या विक्रमाची नोंद…

Caribbean Premier League 2024 : क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये 6 बॉल टाकण्याचा नियम असला तरी काही वेळा नो बॉल किंवा वाईड मुळे 6 बॉलची ओव्हर 7-8 बॉल्सची होते. पण जेव्हा गोलंदाज एकाच ओव्हरमध्ये 2 ओव्हरचा कोटा पूर्ण करतो तेव्हा काय होते. क्रिकेटमध्ये हे क्वचितच पाहायला मिळते. पण बॉलरची लाईन आणि लेन्थ बिघडल्यावर 6 बॉल्सची ओव्हर 2 किंवा त्याहून अधिकची केव्हा होते ते कळतच नाही. असेच काहीसे सीपीएल (CPL) 2024 च्या 13व्या सामन्यात पाहायला मिळाले. सीपीएलच्या या सामन्यात बार्बाडोस रॉयल्स आणि अँटिग्वा अॅण्ड बारबुडा फाल्कन्स आमने-सामने आले होते.
नाणेफेक गमावल्यानंतर अँटिग्वा अॅण्ड बारबुडा फाल्कन्स संघ प्रथम फलंदाजीला आला. सलामीवीर जस्टिन ग्रीव्हज आणि सॅम बिलिंग्ज यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर बारबुडा फाल्कन्स संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 176 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यानंतर, जेव्हा बार्बाडोस रॉयल्स संघ फलंदाजीला मैदानात उतरला तेव्हा अँटिग्वा अॅण्ड बारबुडा फाल्कन्सच्या गोलंदाजाची लाइन लेन्थ इतकी बिघडली की 6 बाॅल्सची ओव्हर त्याने 13 बाॅल्समध्ये संपली. वास्तविक, डावाची 12वी ओव्हर टाकण्यासाठी रोशॉन प्राइमस आला आणि त्याच्यासमोर क्विंटन डी कॉक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी क्रीजवर उभा होता.
रोशॉन प्राइमसने (Roshon Primus) 2 वाइड बॉलने ओव्हरची सुरुवात केली. यानंतर नो बॉल टाकला आणि त्यानंतर फ्री हिटवर क्विंटनने षटकार ठोकला. यानंतर पुढचा बाॅलही वाईड पडला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बाॅल्सवर सिंगल्स धावा निघाल्या. रोशॉन प्राइमसने अर्धी ओव्हर पूर्ण करण्यासाठी 7 बाॅल्स घालवले. त्यानंतर चौथ्या बाॅलवर क्विंटन बाद झाला पण पाचवा बाॅल पुन्हा नो बॉल टाकला. पाचव्या बाॅलवर चौकार आला. ओव्हर संपायला अजून 1 बाॅल बाकी होता पण रोशन प्राइमस आणखी गोलंदाजी करण्याच्या मूडमध्ये दिसत होता. शेवटचा बाॅल वाईड आणि नो बॉलनंतर आला ज्यावर डेव्हिड मिलरने चौकार लगावला. अशाप्रकारे रोशॉन प्राइमसने एका ओव्हरमध्ये एकूण 13 बाॅल्स टाकले आणि 23 धावा दिल्या.
या 13 बाॅल्सच्या मोठ्या ओव्हर्ससह रोशॉन प्राइमसच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. खरं तर, प्राइमसने टी-20 क्रिकेटमधील दुसरी सर्वात मोठी ओव्हर टाकण्याच्या लाजीरवाण्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठी ओव्हर 14 बाॅल्सची होती जी या वर्षी मंगोलियन गोलंदाजाने टाकली होती.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठी ओव्हर टाकणारे गोलंदाज…
1. लुवसानझुंडुई एर्डेनेबुलगन (मंगोलिया) विरुद्ध जपान, एका ओव्हर्समध्ये 14 बाॅल्स : 1 विकेट 20 धावा (2024)
2. थिनले जामत्शो (भूटान) विरुद्ध मालदीव, एका ओव्हर्समध्ये 14 बाॅल्स : 13 धावा (2019)
3. टांगेनी लुंगेमनी (नामिबिया) विरूध्द केनिया, एका ओव्हर्समध्ये 13 बाॅल्स : 11 धावा (2018)
4. रोशॉन प्राइमस (अँटिग्वा अॅण्ड बारबुडा फाल्कन्स) विरूध्द बार्बाडोस रॉयल्स, एका ओव्हर्समध्ये 13 बाॅल्स : 1 विकेट 23 धावा (2024)
5. रहकीम कॉर्नवॉल (सेंट लुसिया किंग्स) विरुद्ध त्रिनबागो नाइट रायडर्स, एका ओव्हर्समध्ये 12 बाॅल्स : 11 धावा (2021)


