रूपगंध : पदार्पणवीर

आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात पाच वर्षांनंतर नवा विजेता मिळाला. गुजरात टायटन्स या नव्या संघाने बलाढ्य संघांचा पराभव करून पहिल्याच सहभागात विजेतपद मिळवण्याची एतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत नवा संघ अशी गुजरातची ओळख असली तरीही त्यांच्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा मोठा अनुभव होता व त्यांनी कोणा एकाच्या कामगिरीवर अवलंबून न राहता सांघिक कामगिरीच्या बळावर हे यश प्राप्त केले.
2008 सालापासून ही स्पर्धा लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना यंदा त्यात दोन नवे संघ दाखल झाले. गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघांनी यंदाची आयपीएल स्पर्धा गाजवली. लखनौ संघानेही सरस कामगिरी केली. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला मात्र, मोक्याच्या क्षणी त्यांची कामगिरी खालावली व त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र, गुजरातने हार मानली नाही व तुल्यबळ संघांनाही दडपणाखाली ठेवत थाटात अंतिम फेरी गाठली. इतकेच नव्हे तर अंतिम फेरीत राजस्थानवर 7 गडी राखून मात केली व स्वप्नवत यश प्राप्त केले. हा झाला या संपूर्ण प्रवासाचा पहिला अंक.
आता दुसरा अंक पाहू, गुजरात संघाला स्पर्धेत पदार्पण केल्यापासूनच संभाव्य विजेता मानले जात होते. तसे पाहायला गेले तर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज या सर्वात यशस्वी ठरलेल्या संघांनी यंदा साफ निराशा केली. स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज या संघांनीही यशस्वी कामगिरी केली. मात्र, साखळी स्पर्धेतील सातत्य त्यांना अखेरच्या काही लढतींमध्ये राखता आले नाही. जे या संघांचे झाले तेच रॉयल चॅलेंजर बेंगळरूचे झाले. सुरुवातीचे सामने गमावले व अन्य संघांच्या कोष्टकावर प्लेऑफमध्ये कसेबसे स्थान मिळाले.
संघात जागतिक दर्जाचे अव्वल खेळाडू होते मात्र, अत्यंत कमकुवत नेतृत्व, विराट कोहली व फाफ डुप्लेसीचा संमिश्र फॉर्म पाहता ते विजेतेपदाच्या शर्यतीत नव्हतेच, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. थोडी आशा कोलकाता व दिल्लीबाबत वाट होती. मात्र, त्यांनाही महत्त्वाच्या सामन्यातील सुमार कामगिरीचा फटका बसला. पंजाब संघाची कामगिरी पाहिली तर वैयक्तिक स्तरावर त्यांचे खेळाडू यश मिळवत होते मात्र, त्यांना सांघिक कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत राजस्थानही सरस संघ वाटत नव्हता, कारण त्यांची फलंदाजी केवळ जोस बटलर व कर्णधार संजू सॅमसन याच दोघांवर अवलंबून होती. अंतिम लढतीत हेच दोघे अपयशी ठरले व राजस्थानला विजेतेपदापासून दूर राहावे लागले. या सगळ्यात गुजरातने मात्र, आपले सातत्य अगदी काही सामन्यांचा अपवाद वगळता सिद्ध केले. तेच विजेतेपदाचे खरे दावेदार होते व बनले देखील.
पंड्या ठरला शिल्पकार
भारतीय संघातून दुखापतीमुळे बाहेर पडलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या याला नेतृत्व सोपवण्यावर सुरुवातीलाच टीका सुरू झाली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पाठदुखीने जायबंदी झालेला पंड्या तंदुरुस्तीसाठी प्रचंड मेहनत घेत होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याने कसून सराव केला व आपली तंदुरुस्ती सिद्ध करत आयपीएल स्पर्धेत पुनरागमन केले व थेट संघाला विजेताही बनवले. पंड्या जर गोलंदाजी करणार नसेल तर त्याच्या जागी अन्य अष्टपैलू खळाडूला संघात घ्या अशी ओरडही सुरू होती, मात्र, गुजरात संघव्यवस्थापन व संघ मालक यांनी त्याच्यावर विश्वास टाकला व त्यानेही तो सार्थ ठरवला.
अंतिम सामन्यातही त्याने 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. खरे तर त्याची गोलंदाजी जास्त सरस ठरली. गोलंदाजीत त्याने तीन गडी बाद केले. त्यातही जोस बटलर व संजू सॅमसन यांना बाद करत राजस्थानच्या फलंदाजीलाच उद्ध्वस्त केले. हेच दोन बळी या सामन्याला कलाटणी देणारे ठरले. सॅमसन आक्रमक फलंदाजी करतो, त्याच्याकडे सातत्यही नाही हे मान्य, परंतु तो धोकादायकच आहे, त्यामुळे त्याचे बाद होणे गुजरातसाठी लाभदायक ठरले. सर्वात मोठा अडसर होता तो बटलरचा. यंदाच्या मोसमात बटलरने आठशेपेक्षा जास्त धावा केल्या. त्यात चार शतके व चार अर्धशतके आहेत. त्याला पंड्याने बाद केले व तिथेच सामना गुजरात जिंकणार याची प्रचिती आली. 2016 साली बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने जे केले होते त्याचीच पुनरावृत्ती बटलरने यंदा केली. विशेष म्हणजे कोहलीच्या संघाला जसे त्यावेळी विजेतेपदापासून दूर राहावे लागले तेच बटलर व राजस्थानबाबतही घडले हा एक योगायोग.
स्वप्नवत वाटचाल
26 मार्चला ही स्पर्धा सुरू झाली व 29 मे रोजी संपली. या स्पर्धेने अनुभवी खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीची अखेर जवळ आल्याचे संकेत दिले, तर काही संघातील नवोदितांवरच येत्या काळात भारतीय संघाचीही मदार राहणार याचेही सुतोवाच केले. गुजरातचा संघ नवोदित व अनुभवी यांच्या समावेशाने संतुलित होता. पंड्यासह वृद्धिमान साहा व डेव्हीड मिलर यांचा अनुभव मोलाचा ठरला, तर रशिद खान, राहुल तेवतिया, मॅथ्यु वेड व शुभमन गिल या तशा नवोदितांनीही खास कामगिरी केली. यंदाच्या स्पर्धेत लखनौ व गुजरात या दोन नव्या संघांमध्येच त्यांची या स्पर्धेतील सलामीची लढत झाली. वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना 5 गडी राखून जिंकला व त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी साखळीत 14 सामने खेळताना केवळ 4 पराभव पत्करताना 10 सामने जिंकत 20 गुणांची नोंद करत सर्वात पहिल्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
त्रिकुट यशस्वी ठरले
कर्णधार पंड्या, रशिद खान व राहुल तेवतिया हे त्रिकुट या स्पर्धेत प्रचंड यशस्वी ठरले. काही सामन्यात प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यावरही या तिघांनी आपल्या संघाची डगमगणारी नौका तटावर सुखरूप परत आणली. पंड्याही काही लढतीत अपयशी ठरला तेव्हा रशिद व तेवतियाने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. या स्पर्धेत रशिद व तेवतियाने फटकावलेले षट्कार अविश्वसनीय ठरले. तेवतिया परिपूर्ण फलंदाज आहे, त्याला आयपीएलचा मोठा अनुभवही आहे; पण रशिद तसा नवखा आहे. त्याच्याकडे फलंदाजीची क्षमता आहे हे अनेकदा यापूर्वीही दिसून आले आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याने जी फलंदाजी केली ती पाहता जगभरातील मोठ्या फलंदाजांनाही आश्चर्य वाटले असेल. त्याचे खडे खडे मारलेले षट्कार जागतिक दर्जाच्या गोलंदाजांनाही क्लब दर्जाचे ठरवणारे ठरले. अफगाणिस्तानचा हा अफलातून खेळाडू गुजरातच्या विजेतेपदाच्या प्रवासात मोलाचा ठरला.
हुशार व धूर्त नेतृत्व
जगभरात महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, फाफ डुप्लेसी यांना सर्वोत्तम कर्णधार मानले जाते. पंड्या हा नेतृत्वाच्या शर्यतीत कधीही नव्हता. तसेच त्याला संघातील 11 खेळाडूंमध्ये केवळ अष्टपैलू खेळाडू म्हणूनच स्थान दिले जात होते. यंदाची स्पर्धा त्याच्या नव्या रूपाची ओळख निर्माण करणारी ठरली. कोणालाही अपेक्षा नसताना त्याने भल्या भल्या कर्णधारांनाही लाजवेल अशी कामगिरी केली. समोरच्या संघाचे कच्चे दुवे, खेळाडूंची बलस्थाने व आपल्या योजना त्यानुसार तयार करण्यात पंड्याने अन्य कर्णधारांच्या तुलनेत बाजी मारली.
स्पर्धेचे हेच यश
संपूर्ण जागतिक क्रिकेटला नवा आयाम देणारी ही आयपीएल स्पर्धा केवळ भारतीय संघासाठीच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांच्या संघांसाठी सेकंड बेंच पुरवणारी ठरत आहे. 2008 सालापासून आजवर 15 मोसमांत अनेक असे खेळाडू या स्पर्धेने त्यांच्या देशांना दिले. पंड्या देखील याच आयपीएल स्पर्धेचे फाइंड होता. त्याने भारतीय संघाकडून सरस कामगिरी करत आपले एक स्थानही निर्माण केले होते. मात्र, कधी त्याचा अहंकार, आक्रमक स्वभाव त्याला फटका देणारा ठरत होता.
पंड्याने संघहित लक्षात घेत नव्या जुन्यांचे योग्य संतुलन ठेवत, आपल्या स्वभावाला मुरड घालून या स्पर्धेत सगळ्यांना एकत्र घेत नेतृत्व केले. हेच या स्पर्धेचे यश मानले पाहिजे की, बेदरकार व बेजबाबदार खेळाडूंना देखील स्वकर्तृत्वाची, जबाबदारीची व सरस कामगिरीची जाणीव करून देते. ही स्पर्धा आता येत्या काळात आणखी नव्या रूपात व नव्या यशाने लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडीत काढेल व दरवर्षी स्पर्धेला नवा विजेता मिळाला, तर प्रत्येक संघाकडे तगडी फौज असेल. पदार्पणवीर खेळाडू प्रत्येक संघात पाहायला मिळतात मात्र, यंदाच्या स्पर्धेने पदार्पणवीर संघ पाहिला. आता येत्या काळात असे पदार्पणवीर संघ स्पर्धेत सातत्याने पाहायला मिळाले पाहिजेत, हीच अपेक्षा आहे.
अमित डोंगरे





