रूपगंध: जीवन जगण्याची साधना

कुठलीही ओबडधोबड वस्तू एखाद्या कलावंताच्या हातात आली तर तो त्यातले सौंदर्य हुडकून काढतो आणि आपल्या हाताने, आपल्या औजाराने, उपकरणाने त्यापासून सुंदर कलाकृती बनवतो, त्याला बहुमोल बनवितो. एखादा कुंभार मातीचे सुंदर खेळणे बनवितो, मूर्तिकार दगडाच्या ओंगळ स्वरूपाला टाकीचे घाव देऊन त्याची सुंदर मूर्ती बनवितो. त्याला देवपण देतो.
एखादा वादक बांबूच्या एका तुकड्याला बासरीचे रूप देतो व त्यातून कर्णमधुर संगीताचा ध्वनी निनादून टाकतो. एखाद्या सोनाराच्या हाती धातूचा तुकडा लागला तर तो त्यापासून सुंदर दागिने घडवितो. कागद, रंग आणि कुंचले यांच्या मदतीने एखादा चित्रकार सुंदर चित्र बनवितो. त्याची ही कला पाहून पाहणार्याला आनंद होतो. त्याच्या कलेच्या चमत्कारापुढे तो माथा नमवितो.
जीवन हे एक मुळात ओबडधोबड तत्त्व आहे. पण बहुतेक जण त्याचा त्याच रूपात अंगीकार करतात आणि कसेतरी करून हलाखीच्या परिस्थितीत दुर्दशेच्या अवस्थेत आपले जीवन जगत असतात. त्यापासून लाभ मिळविणे, आनंद मिळविणे तर दूरच राहिले, कसा तरी भार म्हणून, कंबरेवर पडलेले असह्य ओझे कसेतरी रखडत वाहून घेऊन जाण्यासारखे, मानेवर जोखड असल्यासारखे हे दुर्दैवाने भरलेले जीवन जगत राहतात.
आयुष्य म्हणजे काय असे रडत रखडत, कुंथत कण्हत कसे तरी घालविणे हा एवढाच त्याचा उपयोग आहे? खरे पाहता एखाद्या अडाणी माणसाच्या हातात एखादा हिरा जरी चुकून पडला तरी त्याला त्याची किंमत करता येऊ शकत नाही, मग हे अमूल्य जीवन अशा अडाण्याला लाभले तर तेसुद्धा त्याला भार वाटेल यात काहीच नवल नाही. पण हेच जीवन जर एखाद्या कलावंताच्या पारखी नजरेने सावरले गेले तर त्याला देवासारखे पूजनीय बनविता येऊ शकते. स्वर्गासारखी परिस्थिती उत्पन्न करता येऊ शकते व त्याचा खराखुरा आनंद घेत जीवन मनसोक्त जगता येऊ शकते.
जीवन जगण्याची कला ही एक साधनाच आहे. मानवाच्या आयुष्याचा गौरव ज्याला कळला त्याला हेच जीवन उत्तम प्रकारे घडविता येऊ शकते. त्याला सुसंस्कृत बनविता येऊ शकते व तोच सर्वश्रेष्ठ कलाकार व साधक म्हणून आपली जगाला ओळख पटवून देऊ शकतो. आणि हे कसं जगायच हेच आपण या पुढील भागांमध्ये बघणार आहोत
– पं. श्रीराम शर्मा आचार्य





