रूपगंध : पॉनमॅन – मल्याळम इंडस्ट्रीतील गोल्ड

– अक्षय भुजबळ
लग्नात देण्याघेण्याची प्रथा किंवा आहेराची पद्धत अनेक ठिकाणी पाहायला मिळते. कित्येक जण तर समोरच्याने आपल्या लग्नात आहेरात काय दिले आहे हे पाहूनच त्याच्याही लग्नात तसाच आहेर घेऊन जातात. लग्नातील याच देण्याघेण्याच्या पद्धतीवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे पॉनमॅन. फक्त या सिनेमातील देण्याघेण्याच्या केंद्रस्थानी कपडे, भांडी अशा गोष्टी नसून सोन (गोल्ड) आहे. मल्याळम इंडस्ट्रीमधील हा सिनेमा नुकताच जिओ हॉटस्टारवर हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे.
सुरुवात काहीशी संथ असूनही सिनेमा विविध सांस्कृतिक, आर्थिक आणि कौटुंबिक बाबी स्पष्ट करतो. केरळमधील कोल्लम ठिकाणी राहणार्या एका कुटुंबातील स्टेफी (लिजो जोसे) नामक मुलीचे लग्न ठरलेले आहे. लग्नात मुलीला 25 तोळे सोने घालून पाठवायचे हे देखील दोन्ही कुटुंबीयांनी निश्चित केलेले आहे. मुलीकडची परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने तिचे कुटुंबीय पैशांची जमवाजमव करण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु इतक्या सोन्यासाठी पैशांची जमवाजमव होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत असतात.
अशात स्टेफीच्या भावाची अजेश (बसिल जोसेफ) नामक व्यक्तीशी भेट होते जो लग्नांमध्ये सोने भाड्याने देत असतो. लग्न झाल्यानंतर त्या कुटुंबाला सोने भाड्यासह परत करायचे असते. स्टेफीच्या लग्नात कुटुंबीय भाड्याचे सोने वापरतात आणि लग्न पार पडते. यानंतर सुरू होतो खरा राडा. स्टेफी हे सोनं परत न करता थेट दूर आडगावात असलेल्या आपल्या सासरी जाते आणि अजेश देखील तिच्या मागे मागे त्याठिकाणी जायला निघतो.
कथा आणि लोकेशन्स
लेखक जी आर इंदुगोपन आणि जस्टिन मॅथ्यू यांनी केलेले लिखाण आणि त्यानुसार दिग्दर्शक ज्योतिष शंकर यांनी उभा केलेला संपूर्ण सिनेमा एक दर्जेदार कलाकृती ठरला आहे. मल्याळम इंडस्ट्रीमधील असूनही प्रेक्षकांना लग्नाचा माहोल त्यादरम्यान होणार्या घटना चांगल्याच आपल्याशा वाटतात. दिग्दर्शकाने कथेसह लोकेशन्सचा केलेला अद्भुत वापर चित्रपट लो बजेट असल्याचे जाणवू देत नाही. मल्याळम इंडस्ट्रीमधील पात्रांची नावे, विविध स्थळांची नावे ऐकताना, पाहताना काहीसा अडसर जाणवत असला तरी दिग्दर्शकाने विविध धार्मिक परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम हे अत्यंत बारकाईने मांडल्याने प्रेक्षक कथेशी चांगलाच समरस होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जशी जशी कथा पुढे सरकते तसे तसे पाहणार्यांचे तर्क संपत जातात. आता पुढे काय होईल हे सांगणे कठीण होऊन जाते आणि सिनेमा एका वेगळ्याच वळणावर पोहचतो.
अभिनय आणि संगीत
कथेनंतर चित्रपटात लक्षात राहतो तो म्हणजे सर्व पात्रांचा अभिनय. जोसेफ यांनी साकारलेला गोल्ड भाड्याने देणारा अजेश शांत राहून इमानदारी आणि खरेपणाची रेषा शेवटपर्यंत सोडत नाही. अनेकदा पाहणार्याला याचेच सर्वकाही असून देखील हा इतका संयमी कसा याचा प्रश्न पडतो. दुसर्या बाजूला स्टेफीचा पती साकारलेला मारियानो (सजिन गोपू) मात्र सतत जिंकत जाताना दिसतो. ही दोन्ही पात्रे एकमेकांच्या विरोधात असूनही चांगलीच लक्षात राहतात. कौटुंबिक ड्रामा पाहताना मारामारी सुरू होते आणि बॅकग्राउंडला सतत सुरू राहणार्या संगीताचे महत्त्व समजते. आजूबाजूची परिस्थिती आणि पात्रांची गरज ओळखून वाजणारे पार्श्वसंगीत हे प्रत्येक सिनची प्रगल्भता आणखी वाढवते.
चित्रपटाची सुरुवात झाल्यानंतर हा एक कौटुंबिक ड्रामा आहे असे वाटते. मात्र स्टेफी लग्नातील सर्व ज्वेलरी घेऊन माहेरी गेल्यावर अजेश तिच्यामागे अशा आडगावात जातो जिथे पोहोचण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. मग दिसतो इमानदारी विरोधातील लबाडपणा. प्रादेशिक प्रथांसोबतच कौटुंबिक ओझ्याखाली दडलेली पात्रे समोर येतात आणि विषय गोल्ड, पैसा यांच्या कितीतरी पुढे जातो. नातीगोती एकमेकांपासून इतकी दूर जातात की मरण देखील शुल्लक वाटते. अजेशला त्याचे सोने परत मिळते का? स्टेफीचे लग्न टिकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये मिळतात आणि हा सिनेमा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचतो.
सिनेमाचे नाव : पॉनमॅन
दर्जा : ****
का पहावा : आगळ्यावेगळ्या परंपरेच्या नावीन्यपूर्ण कथेसाठी
का पाहू नये : मल्याळम धाटणीचे सिनेमे आवडत नसल्यास
उपलब्ध : जिओ हॉटस्टार





