रूपगंध : चर्चेत; म्यानमारमधील हाहाकाराचा धडा

– राजीव मुळ्ये
तुर्कस्तान, हिंदुकुश पर्वत यांसह अलीकडील काळात वाढत चाललेल्या धरणीकंपांबाबत भूगर्भशास्त्राचे अभ्यासक संशोधन करत असताना आणि जगभरातील सरकारे, सामाजिक संस्था भूकंपांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपाने हाहाकार उडवून दिला. म्यानमारच्या घटनेवरून भारताने धडा घेण्याची गरज आहे.
म्यानमारमध्ये आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपाने 1700 हून अधिक लोकांचे प्राण घेतले आणि 2500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या भूकंपामुळे बहुमजली इमारती कोसळल्या, रस्ते, पूल आणि धरणे तुटली, तसेच वीज आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्या. हा भूकंप वाढत्या शहरीकरणासाठी एक गंभीर इशारा आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथेही काही सेकंदांच्या धक्क्यांमुळे संपूर्ण शहर हादरले.
दरम्यान, अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने इशारा दिला आहे की मृतांचा आकडा 10 हजारांच्या वर जाऊ शकतो. या भूकंपाचे धक्के भारतातील ईशान्य राज्ये आणि पश्चिम बंगालमध्येही जाणवले. चीन, व्हिएतनाम, तैवान, लाओस आणि श्रीलंकेतही भूकंपाच्या लहरींची नोंद झाली. हे लक्षात घ्यावे की, 24 वर्षांपूर्वी भारताच्या भूजमध्येही असाच 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आणि दीड लाखांहून अधिक लोक जखमी झाले होते. त्याचप्रमाणे, तीन लाखांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली होती.
म्यानमारमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या केवळ 10 किमी खोलीवर होता. हा संपूर्ण प्रदेश आधीपासूनच संवेदनशील मानला जात असतानाही येथे मोठ्या प्रमाणावर गगनचुंबी इमारती आणि उद्योग उभारले जात आहेत. म्यानमार 2021 पासून संकटमालिकांचा सामना करत आहे. त्या वर्षी लष्कराने आंग सान सू की यांच्या निवडून आलेल्या सरकारला हटवून सत्ता काबीज केली. शांततापूर्ण निदर्शनांवर लष्कराने कठोर कारवाई केली, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना हत्यार उचलण्यास भाग पाडले. आज म्यानमारमधील अनेक भाग गृहयुद्धाच्या विळख्यात आहेत.
म्यानमारमध्ये चीनचाही प्रभाव आहे. 2023 च्या अखेरीस चीनने सीमावर्ती भागातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी लष्करी हालचालींना पाठिंबा दिल्याचे दिसले. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भूकंप होण्यापूर्वीच 30 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले होते. सध्या देशातील 1.86 कोटी लोकांना तातडीच्या मानवी मदतीची आवश्यकता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय मदतीतील कपातीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
अमेरिका सरकारने 90 दिवसांसाठी परदेशी मदत रोखल्याने म्यानमारमधील निर्वासितांना वैद्यकीय सेवा मिळणेही कठीण झाले आहे. वर्ल्ड ङ्गूड प्रोग्रॅमच्या अहवालानुसार, म्यानमारमध्ये 1.52 कोटी लोकांना त्यांच्या मूलभूत अन्नाच्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे, तर 23 लाख लोक तीव्र उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. निधीअभावी एप्रिलपासून अन्नसहाय्य थांबवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामला आपले मदतकार्य सुरू ठेवण्यासाठी 60 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 500 कोटी रुपये) आवश्यक आहेत.
सध्या केवळ 35 हजार गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे. आज या देशातील आरोग्यसेवा जवळपास ठप्प झाली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेनुसार, क्षयरोग आणि एचआयव्ही रुग्णांना मागील अनेक आठवड्यांपासून औषधे मिळत नाहीत. दिव्यांग मुलांना पुनर्वसन केंद्रांमधून बाहेर काढण्यात आले आहे. अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही कमी झाला आहे. अशा दुष्टचक्रात असतानाच हा विनाशकारी भूकंप म्यानमारला पूर्णपणे हादरवून गेला आहे.
हा भूकंप भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करमुळे झाल्याचे मानले जात आहे. भारतातही 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 5:36 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. धक्क्यांसोबतच काही ठिकाणी स्फोटासारख्या आवाजांचीही नोंद झाली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अहवालानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतील धौलाकुआं येथील झील पार्क भागात जमिनीच्या 5 किमी खोलीवर होता. त्यामुळे त्याची तीव्रता भूगर्भातच कमी झाली आणि भूपृष्ठावर फारसा परिणाम झाला नाही.
बिहारमध्येही अशाच प्रकारचे हलके भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीच्या 10 किमी खाली होता. भविष्यातील संभाव्य धोक्यांचा विचार करता, हा भूकंप दिल्लीसाठी एक मोठा इशारा मानला जात आहे. कारण दिल्ली, हरिद्वार, महेंद्रगड, देहराडून हे अशा भूभागांवर वसले आहेत, जिथे भूकंपाची तुटलेली रेषा (फॉल्ट लाइन) आहे. शिवाय, यमुना नदीच्या परिसरातील मृदू मातीमुळे येथे भूकंपाचा धोका अधिक आहे. तथापि, 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपासाठी टेक्टॉनिक प्लेट्समध्ये मोठा बदल कारणीभूत नव्हता, तर तो स्थानिक भूगर्भीय हालचालींमुळे झाला, असे तज्ज्ञांचे मत आहे.
7 जानेवारी 2025 रोजी चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशातील शिगात्सेच्या तिंगरी काउंटीमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपामुळे 126 लोकांचा मृत्यू झाला. सुदैवाने, तिबेटमध्ये कोणत्याही धरणाला किंवा जलाशयाला मोठे नुकसान झाले नाही. विशेषतः तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याच्या चीनच्या योजनेने भारत आणि बांगलादेशची चिंता वाढवली आहे. कारण, भारत आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या टकरावामुळे चीनच्या दक्षिण-पश्चिम भागात, नेपाळमध्ये आणि उत्तर भारतात वारंवार भूकंप होत असतात.
अनेक देशांत भूकंपाचा इशारा देणार्या प्रणाली कार्यरत आहेत, पण त्या भूगर्भातील घडामोडींची अचूक पूर्वसूचना देण्यात अपयशी ठरतात. अमेरिका, जपान, भारत, नेपाळ आणि चीनमध्ये भूकंप वारंवार होतात. त्यामुळे भूकंपाच्या अचूक अंदाजाची समस्या गंभीर बनली आहे. आज विज्ञानाने चंद्र आणि मंगळावर मानवी वसाहतींचे स्वप्न पाहिले आहे, परंतु पृथ्वीच्या गर्भात होणार्या हालचालींची अचूक माहिती मिळवण्यात अजूनही अपयश आले आहे. अनेक देशांनी हवामान आणि भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह पाठवले असले, तरी भूकंपासंबंधी अचूक पूर्वसूचना मिळवण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले नाही.
जागतिक भूगर्भशास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, सर्व भूकंप नैसर्गिक नसतात. काहीवेळा मानवी हस्तक्षेपामुळे ते अधिक विनाशकारी होतात. जेव्हा मोठमोठ्या काँक्रिटच्या इमारती कोसळतात, तेव्हा मानवी जीवनाला सर्वाधिक धोका असतो. हे लक्षात घेता भारतासारख्या देशाने भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील असणार्या भागांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मजबूत आणि सुरक्षित इमारती बांधणे आवश्यक आहे. ‘रबर-बेअरिंग’ किंवा ‘शॉक-अब्जॉर्बर’ प्रणालीचा वापर यासाठी केला जातो.
तसेच मोठ्या इमारतींसाठी ‘सेस्मिक इन्सुलेशन’ म्हणजेच जमिनीपासून इमारतीला विभक्त ठेवणार्या तंत्राचा अवलंब केला जातो. लहान आणि मध्यम उंचीच्या इमारती अधिक सुरक्षित असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच अधिक दरवाजे आणि खिडक्यांची योजना असल्यास भूकंपाच्या वेळी बाहेर पडण्यासाठी जागा मिळते. याखेरीज छताचा भार संतुलित असल्यास भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत एका बाजूला झुकत नाही. इमारतीच्या तळभागावर कंपनशोषक प्रणाली बसवली जाते. यामुळे भूकंपाच्या धक्क्यांपासून संरक्षण होते. याखेरीज विशेष प्रकारचे ‘डॅम्पर्स’ वापरून इमारतीला बसणारे धक्के कमी करता येतात.
हिमालयीन पट्टा, उत्तर भारत, नेपाळ आणि जिथे वारंवार भूकंप होतात अशा ठिकाणी या प्रकारच्या बांधकाम तंत्राचा वापर होणे ही काळाची गरज आहे. याखेरीज लोकांमध्ये भूकंपाच्या हादर्यांनंतर सुरक्षित राहण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जागरूकता वाढवणे महत्त्वाचे आहे. लोकांना सुरक्षित घरांची महत्त्वाची माहिती देणे आणि नवीन तंत्रज्ञानाची जाणीव करून द्यायला हवी. जपान, अमेरिका आणि इतर विकसित देशांकडून भूकंप-संरक्षित तंत्रज्ञान आत्मसात करता येऊ शकेल. तसेच भूगर्भीय संशोधन अधिक प्रभावी करून भूकंपाचे पूर्वानुमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर करणे गरजेचे आहे.
हिमालयातील धोका
वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, सुमारे साडेपाच कोटी वर्षांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाला जोडणार्या भूगर्भीय प्लेट्स वेगळ्या झाल्या आणि युरेशियन प्लेटला धडकल्या. यामुळे हिमालय पर्वत निर्माण झाला आणि पृथ्वीच्या विविध भूस्तरांमध्ये तडे गेले. हिमालयाच्या परिसरात आजही ही टेक्टॉनिक क्रिया सुरूच आहे, त्यामुळे येथे वारंवार भूकंप होतात. याच भागात बहुतेक आशियाई देश वसले आहेत.





