NIA Action: भारतात दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी सात परदेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या कारवाईने मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात यश मिळाले आहे. गेल्या आठवड्यात एनआयएच्या विविध पथकांनी केलेल्या कारवाईत आरोपींना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) कलम १८ आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली. नुकतेच या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला. कोलकाता विमानतळ येथे इमिग्रेशन ब्युरोने अमेरिकन नागरिकाला ताब्यात घेतले, तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन युक्रेनियन नागरिकांना अटक करण्यात आली. NIA Action बेकायदेशीरपणे भारतात ड्रोन आणले NIA Action: समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी वैध व्हिसावर भारतात आले होते. मात्र, त्यांनी आवश्यक ‘प्रतिबंधित क्षेत्र परवाना’ न घेता मिझोराममध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते म्यानमारमध्ये गेले. ज्याठिकाणी त्यांनी भारतविरोधी वांशिक सशस्त्र गटांशी संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. तसेच, युरोपमधून ड्रोनच्या अनेक खेपा मिझोराममध्ये पोहोचवल्याचाही संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. NIA Action: अटक केलेल्या संशयितांना दिल्लीत आणून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ड्युटी मॅजिस्ट्रेटने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा सुनावणी होऊन २७ मार्चपर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान , पटियाला हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी, “पुरावे गोळा करणे, गुन्हेगारी कट उघडकीस आणणे, सह-आरोपींची ओळख पटव.णे आणि मोबाईल डेटाचे विश्लेषण करणे यासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक आहे.”असे आदेशात नमूद केले. भारतीय बंडखोर संघटनांना शस्त्रे पुरवत NIA Action: एनआयएनुसार, आरोपी युरोपमधून ड्रोनचा मोठा साठा भारतामार्गे म्यानमारमध्ये बेकायदेशीरपणे पाठवत होते. हे ड्रोन कथितरित्या वांशिक सशस्त्र गटांच्या वापरासाठी होते, जे काही प्रतिबंधित भारतीय बंडखोर संघटनांना शस्त्रे, प्रशिक्षण आणि इतर मदत पुरवत होते. या प्रकरणात एनआयएतर्फे विशेष सरकारी वकील राहुल त्यागी, सरकारी वकील अनिल डबास तसेच वकील जतीन आणि अमित रोहिला यांनी बाजू मांडली. आरोपींनी रचलेल्या कटाचा संपूर्ण तपास करण्यासाठी अधिक कोठडीची गरज असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.